Wednesday, December 28, 2016

| लग्न ©

व.पु.काळे म्हणतात की, कलावंताशी लग्न करताना कायम त्याच्याकडे कलावंत म्हणून पहायची इच्छा आणि शक्ती असेल तर करावं. संसारात, व्यवहारात तो सामन्यापासून निराळा वागणार आहे हे गृहीत धरूनच करावं. त्याचं वागणं विक्षिप्त वाटेल पण त्याच्या विश्वात त्याला , त्याची अशी संगती असेल. ते आकलन होणार असेल तरच करावं. कलाकाराच्या सगळ्याच वृत्ती आणि विकार उत्कट असतात. राग, प्रेम, लोभ, अभिलाषा, माया या सगळ्याच संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात आणि त्यातल्या त्यात कुठल्या संवेदना केव्हा उफाळून येतील याचे संकेतही सामान्या पेक्षा निराळे असतात.  अमुक एक भावना या वेळीच का ? असा प्रश्न त्या कलाकाराला रुचत नाही. त्याला त्या क्षणी फक्त साथ हवी असते....

लेखक : व. पु. काळे 👆

खरंच आहेत व.पु चे हे शब्द. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा. भविष्यकाळाची दिशा ठरवणारा सर्वात महत्वाचा निर्णय. फक्त वंश वाढवायचा, वासना मिटवायची, सोबत मिळवायची एवढंच ध्येय ठेवुन लग्न करणाऱ्यांसाठी जोडीदार निवडण्याचं एवढं टेंशन नसतं, पण एखाद्या कलाकाराला मात्र बायको घरात आणणे म्हणजे त्याच्या कलेला सवत आणल्यासारखंच असतं. शेवटी बायको सांभाळणे ही सुद्धा एक कलाच आहे. मुळात स्वतःच्या कलेवर बायकोपेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्यांसाठीतर त्याहुन अवघड असतं. मुली पाहण्याचे कार्यक्रम जितके जास्त होतील तितकीच मनाची घालमेल सुद्धा जास्त वाढते; त्यातच पुन्हा लोकांचा तगादा असतोच आरं करं की एखादी पसंद, आशी काय आप्सरा मिळणाराय तुला ! त्यात मुलगी बघायला वगैरे जाणे म्हणजे खुपच फाॅरमॅलिटी असतात. अलिकडे थोडा बदल तरी झालाय नाहीतर काही वर्षापुर्वी मुली पहाण्याच्या कार्यक्रमात; तिने आपल्यावर व आपण तिच्यावर टाकलेल्या फक्त एका कटाक्षावरच ठरवावे लागायचे पसंत का नापसंत. सोबतची लोकं उंबरा ओलांडायच्या आतच विचारतात काय मग कशी वाटली मुलगी ? आयुष्यातला हा महत्वाचा निर्णय खरंच एवढ्या जलद गतीने घ्यायचा असतो का? दोन शरिरा सोबतच जेव्हा दोन मनांचही मिलन होतं तेव्हाच खरं नवरा बायकोचं नातं निर्माण होतं नाहीतर दोन्हीही अतृप्त शरिरच असतात. डोळ्यांनी एका क्षणात शारिरीक सौदर्य ठरवता येते पण मनाचे सौदर्य पाहण्यासाठी अभिव्यक्तींचा संवाद व्हावा लागतो.
वेळेत लग्न नाही केले तर लोक नावं ठेवतात. मित्र चेष्टा मस्करी करतात. पाहुणे रावळे टोमने मारतात अशा गोष्टींपासुन सुटकारा मिळवण्यासाठीही काहीजन लग्न करतात. कोणी फसतात तर कोणी यशस्वीही होतात. आयुष्यात भेटणारी माणसं लग्नाआधी विचारणार आरे लग्न कधी करणार? लग्नानंतर विचारतील अरे पाळणा कधी हालणार? पाळणा हालल्यावर विचारतील अरे पोराला कोणच्या शाळेत घालणार? शाळा झाल्यावर विचारतील कोणत्या काॅलेजला घालणार? शिक्षण संपल्यावर विचारतील अरे पोराच्या नोकरीचं कधी बघणार? मुलगी असेल तर विचारतील अरे पोरीच्या लग्नाचं कधी बघणारं? विचारणाऱ्यांचे हे असले प्रश्न अखेरच्या श्वासापर्यंत बंद नाहीत होणार ती एक रित आहे परंतु सरतेशेवटी आपलं आयुष्य कसं जगायचं याचा पुर्ण अधिकार आपल्यालाच असतो कोणी कितीही युक्तीवाद केला तरी निर्णय आपणच घ्यायचा असतो.
नवऱ्यावरच्या प्रेमापेक्षा त्याचे त्याच्या कलेवर किंवा छंदावर असलेल्या प्रेमावर प्रेम करणारी जर बायको असेल तर त्या कलाकाराकडुन समाजाला दुहेरी योगदान मिळेल हे नक्की. कारण एकापेक्षा जास्त कला एका शरिरात सांभाळणे सोपे आहे पण एका घरात सांभाळणे कठीण.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २८ डिसेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६  वाजता

Tuesday, December 13, 2016

| मेलेला बैल ©

आज सकाळी काॅलेजला निघालो होतो. माझ्या नेहमीच्या वाटेवर एक लहान मुलगा अनवाणी पायाने चालत चाललेला दिसला मी क्षणार्धात गाडी थांबवली व त्याला गाडीवर बसवुन निघालो. कुठं जायचंय असं विचारल्यावर शेतातल्या कोट्यावर निघालोय असं तो म्हणाला. डोंगरी वाटेने गाडी हालत डुलतच चालत असल्याने त्याच्या दोन्ही हातांनी त्याने माझ्या पोटाला घट्ट पकडलं होतं. चालता-चालता आमच्या गप्पा मात्र सुरूच होत्या. मी त्याला त्याचे नांव विचारले तो म्हणाला "गौरव" मग मी लगेच त्याला त्याच्या वडीलांचे नांव विचारले त्यावर तो म्हणाला "पप्पा". त्याच्या या उत्तरावर मी खुप मनमुराद हसलो. कितवीत आहेस ? तो म्हणला "आंगीणवाडीत".
थोडंसं पुढे गेल्यानंतर तो बोलला "ओऽ मामा, तुम्हाला म्याल्याला बैल दाकवु का ? मी उत्सुकतेने विचारले कुठाय? तो म्हणाला "तिकाय तिथं वड्याच्या कडला टाकलाय, कुत्री तोंड घालुन-घालुन खायल्याती बगा त्यला" मी गाडी थांबवुन ते दृष्य पाहिलं खरंच एक काळ्या रंगाचा बैल तिथे मृतावस्थेत उघड्यावर टाकला होता आणि फिरस्ती कुत्री आणि कावळे त्यावर तुटुन पडले होते. मी पाहत असतानाच गौरव म्हणाला "ह्याला बैल पोळयाला लई भारी सजीवलं व्हतं ढाल लावुन आन् मेल्यावर बगा कि कसं टाकुन दिलंय" त्याचे हे वाक्य ऐकुण मी अचंबीत झालो.
मुळात एका अंगणवाडीत शिकणाऱ्या या गौरवच्या विचारांना मी सलाम ठोकला कारण माझ्याही मनात बरोबर तोच विचार घुटमळत होता. कि एखादा बैल जिवंत असताना कसलाही रोजगार न घेता, मिळलं ती काडी वैरण खावुन या काळ्या आईची सेवा करतो आणि मेल्यानंतर मात्र त्याच मातीच्या कुशीत जाण्याचं भाग्यही त्याच्या पदरात पडंत नाही. शेवटी एवढंच वाटतं कि जे त्या अंगणवाडीतल्या गौरवला कळलं तेच जर त्या बैलाच्या मालकाला कळलं असतं तर आज तो बैल नक्कीच मातीच्या कुशीत असला असता.
त्या पडलेल्या मुक्या जिवाला श्रद्धांजली अर्पन करून गौरवला त्याच्या शेतातल्या कोट्यावर सोडलं आणि मी काॅलेजवर पोहोचलो. साडे दहा ते सव्वा अकरा  असे लेक्चर घेऊन मनातले शब्द मोबाईलवर टाइपीत बसलोय. सरतेशेवटी आजच्या या प्रसंगातुन मी एक गोष्ट शिकलो की, कृतज्ञता हि फक्त शिक्षण आणि जाणतेपणावर अवलंबुन नसुन, ती लहाणपणी मनावर झालेल्या संस्कारांवरच अवलंबुन असते.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १३ डिसेंबर २०१६
वेळ : सकाळी ११:३० ते १२

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...