Saturday, December 23, 2023

चिलट

आज सांच्यापारी रानातून घरी येताना एक चिलाट खापकन डोळ्यात घुसलं. लगीच डोळा चुळीत चुळीतच म्या गाडी साईडला घितली. चिलटाला जित्ता डोळ्याबाहिर काढायसाठी वाडुळ झटलो पण ते डोळ्यात गेल्या गेल्याच मेलं व्हतं. ह्ये आसलं मायंदाळ व्हतंय म्हणुंशान गॉगल असतंय डोळ्याला पण त्योबी नेमका आजच घरी ऱ्हायला आन हे चिलाट हाकनाक मेलं. त्येलाबी माहित नसल पुढून गाडी यील आन मलाबी माहीत न्हवतं पुढून ती यील. एवढ्या मट्या पिरतमीवर ह्या बोटावर जीव सुडून पडल्याल्या ह्या चिलटाची कुठं गणती व्हइल का ?


आवं ही चिलाट काय आन माणूस काय. ऊगं जमिनीवर थोडं वरीस फिरायला आल्याली पाव्हणं हायती. एकदा का दिस भरलं की आसच चिलटासारखं मरून जायचंय. तवा आजचा दिस आपला म्हणून जगा लेकानो. सगळं उद्या उद्या करत बसलाव तर जगायचं ऱ्हाऊन जाईल. ही चिलटाची बॉडी रस्त्याच्या कडंला कुठं पडली आसल ह्यजी कोण नोंद ठिवील का ? आरं ह्या भर्मांडात माणूसबी एक चिलाट हाय, जवा जवा त्यो निसर्गावर चढाई करल तवा तवा निसर्गबी ह्या चिलाटासारखी माणसं मारील; मग दोष देणार कुणाला ?


विशाल गरड

२३ डिसेंबर २०२३, पांगरी




Saturday, December 16, 2023

तोड - पोस्टर रिलीज

 एवढ्या सगळ्या धबडग्यात माझ्यासारख्या पामराने अजून काय काय करावं. तरीबी स्वतःमधला दिग्दर्शक आणि अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मेंदूच्या काही न्युरॉन्सला गुत्त देवून ठेवलंय. मी व्याख्यानात, लिखाणात, चित्रकलेत, कॅलिग्राफित कितीही बिझी असू द्या. नवनवीन विषयांवरील पिच्चरची स्टोरी डोक्यात सुरुच असते; त्यापैकीच ‘दैना’ आणि ‘बुचाड’ नंतरची माझी पुढील कलाकृती म्हणजे“तोड”. गेल्या वर्षी याच महिन्यात आम्ही चित्रीकरण सुरू केले होते. तोडच्या संपूर्ण शूट पैकी सुमारे सत्तर टक्के शूट आम्ही अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केले पण नंतर काहीच सीन साठी जवळपास चार पाच महिने लागले. एडीटींगलाही मग मिळेल तसा वेळ देवून बसू लागलो. सरतेशेवटी ऊसतोड कामगारांचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारा तोड पूर्ण झालाय. एकाने लिहिलेल्या गोष्टीवर जेव्हा सर्वजण काम करतात तेव्हाच पिच्चर तयार होतो. तोडच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या जीवतोड मेहनतीमुळे माझ्या मनातल्या गोष्टीला मुर्त स्वरूप प्राप्त होवू शकले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. 


या लघुचित्रपटाची पहिली स्क्रिनिंगही आम्ही काही दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुरांच्या पाड्यावर जाऊन केली. लवकरच त्याचा व्लॉग यूट्युबवर टाकेन पण तूर्तास हे आमच्या तोडचे प्रोमोशनल पोस्टर मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. लघुचित्रपटाबद्दल त्याच्या निर्मितीच्या आणि चित्रीकरणाच्या प्रवासाबद्दल डोंगरभर गोष्टी आहेत. हळू हळू मी त्या सांगणारच आहे पण तूर्तास माझ्या आयुष्यातला हा तिसरा लघुचित्रपट राज्यातील आणि देशातील विविध फिल्म फेस्टिव्हलमधे जाण्यास सज्ज झालाय. लवकरच आणखीन काही स्पेशल स्क्रिनिंग करण्याचाही आमचा मानस आहे. प्रिय रसिक श्रोतेहो, तुमच्या आभाळभर प्रेमातला ढगभर गारवा जरी ‘तोड’ला मिळाला तरी ही कलाकृती बुचाडचेही रेकॉर्ड तोडेल अशी आशा आहे. 


विशाल विजय गरड

(लेखक,दिग्दर्शक,अभिनेता : तोड)






Wednesday, December 13, 2023

टॅक्टरचा नाद

टॅक्टरवरची ही जागा म्हंजी जणू बरक्यापणीचं आमचं  सिंव्हासनच व्हतं. सुट्ट्याला कधी शेलगावच्या लता मावशीकड गेलाव की घरात पिशवी टेकवायच्या आधीच दारात असलेल्या ह्या टॅक्टरवर बसायला तरफाडायचाव आमी. तवा आमच्या पावण्या रावळ्यात जास्त कुणाकडं वाहणं नव्हती म्हणून मग टॅक्टर हीच समद्यात आवडीचं वाहन आसायचं. “आमच्या मावशीच्या घरी टॅक्टर हाय” आसं सांगायलाबी आभिमान वाटायचा. कदी कदी टिरिंगवर बसून ती फिरवत फिरवत ब्रिइऽऽऽम, ब्रिइऽऽऽम आवाज काढताना टॅक्टर चालीवल्याचा आनंद मिळायचा.


आमचा मावस भाऊ बापू न्हायतर तात्या जर कदी टॅक्टर घिऊन निघाले तर मग आमची एक चक्कर फिक्स आसायची. त्यात बापू म्हणायचा “ऐ पोरांनो, गच्चीम धरा दांड्याला न्हायतर ट्रायलीच्या चाकाखालीच जाचाल बगा” धडाडांग व्हतडांग करत एक चक्कर मारली की आमी मग ईळभर हुंदडायला रानात रिकामं व्हायचाव. एकदा मला सायकल पायजेल म्हणून आमच्या उत्तम काका ऊर्फ भऊनी त्येंची एक जुनी सायकल नीट करून शेलगावपसून पांगरीपस्तोर चालवीत आणली व्हती. तवा त्या सायकलवर शायनिंग मारत म्या आणलेली पहिली चक्कर अजूनबी ध्यानात हाय. 


आता मावशी गेल्यापसून लय काय जाणं व्हत नाय पण काल लय दिसांनी शेलगावला गेल्यावर रानात धक्क्याला लावून ठिवल्याला त्योच टॅक्टर बघितला आन त्येच्या मडगार्डवर बसून फुटू काढायचा मोह मला न्हाय आवरला. आज जरी फोर्ड मधी फिरत आसलो तरी लहानपणी हितं बसून फिरायचा आनंद काय औरच व्हता. बारक्यापणी लै छोट्या-छोट्या गुष्टीत म्होटा-म्होटा आनंद व्हता पण म्होट्ट झाल्यावर आसल्या छोट्या छोट्या गुष्टी आठिवण्यात आन जपण्यातसुदा तितकाच आनंद आसतंय म्हणूनच ह्यो फुटू काढून त्येज्यावर शबुद शिपडल्यात. 


विशाल गरड

१३ डिसेंबर २०२३, शेलगाव (जहागीर)



सोनवणे सरांना अखेरचा सलाम.

​ सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...