Thursday, September 3, 2026

सोनवणे सरांचे अभिष्टचिंतन

आमच्या संजीव सोनवणे सरांचे आडनाव सोनवणे का पडले असावे हे माहीत नाही पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांच्या आयुष्याचे सोने करून ते आडनाव सार्थकी लावलंय. वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर सरांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि सोनं काय घेवून बसलात मी हिरा झालो हिरा. माझ्या व्यक्तिमत्वाला जेवढे केवढे पैलू पडले असतील ते आमच्या उक्कडगांवच्या सोनवणे कॉलेजमधेच. आजवर डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात माझी तब्बल दिड दशकांची सलग सेवा झाली पण फक्त नोकरी म्हणून कधी ती केलीच नाही. एका दृष्ट्या माणसाने गोरगरिबांची लेकरं AIIMS आणि IIT ला लावण्याचे स्वप्न पाहिलं आणि या श्रेष्ठ कार्यात आपण कुठे खारीचा वाटा उचलू शकतो म्हणूनसाठी नोकरीच्याही पलीकडे जावुन योगदान देत आलो आणि अजूनही देत आहे. 


शिक्षण क्षेत्रात सोनवणे सरांनी उभा केलेला हा दीपस्तंभ तेवत ठेवण्यासाठी कधी वात बनून, कधी तेल बनून तर कधी त्या दिव्याची काजळी बनून आम्ही विद्यार्थ्यांना सदैव प्रकाशमान करत आहोत. आम्ही सर्व प्राध्यापक चंद्र आहोत आणि सोनवणे सर म्हणजे आमचा सूर्य. या सूर्याने आम्हाला इतके प्रकाशमान करून टाकलंय की आम्ही फक्त पौर्णिमेलाच नव्हे तर भर अमावास्येत सुद्धा प्रकाशित राहतो. आता तुम्ही म्हणाल अमावास्येत कुठे चंद्र असतो, अहो असतो हो; फक्त तो आपल्याला दिसत नाही इतकंच. त्याचे काय आहे आमचे सोनवणे सर म्हणजे फिजिक्सचे जानेमाने प्राध्यापक म्हणून मग त्यांचावर लेख लिहिताना हे असे खगोलशास्त्रीय संदर्भ आपसूकच येतात. त्यांच्याच संगतीचा हा परिणाम आहे. जगात जो काही चमत्कार घडतो तो फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमुळेच घडत असतो बाकी सब अंधश्रद्धा है असे त्यांचे ठाम मत असते. त्यांनी उभारलेल्या संकल्प सेवा संस्थेतून आजवर शेकडो प्राध्यापक नावारूपाला आलेत अन हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर झालेत. यात कितीतरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा आहेत की सरांनी त्यांना दत्तक घेवून शिकवले होते. आणि कितीतरी प्राध्यापक असे आहेत की त्यांचं जे काही मोठेपण आहे ते सोनवणे सरांमुळेच.


आज घडीला मी माझ्या अनेक वेगवेगळ्या ओळखी तयार केल्या आहेत पण प्राध्यापक ही माझी पहिली ओळख मला सोनवणे सरांमुळे मिळाली. आजवर मला शिक्षणकार्यासाठी जेवढे केवढे पुरस्कार मिळाले असतील आणि भविष्यात मिळतील ये सभी सोनवणे सर की बदौलत है. आज आमचे सोनवणे सर वयाची पासष्टी पूर्ण करत आहेत. जे त्यांच्या सहवासात आहेत त्यांना चांगले ठावूक आहे की त्यांच्यासाठी “Age is just a number” कारण पासष्ट वर्षांच्या या तरुणाला आजही जर हातात पेन दिला तर सलग चार पाच तास ते फिजिक्स शिकवू शकतात इतके ते पॅशनेट आहेत. सोनवणे सर म्हणजे फक्त फिजिक्स शिकवणारे प्राध्यापक नसून ते फिजिक्समधे जगणारे आणि विद्यार्थ्यांनाही फिजिक्समधे जगायला शिकवणारे प्राध्यापक आहेत. भविष्यात जर विद्यार्थ्यांच्या मनातून फिजिक्स विषयाची भीती घालवायची असेल तर त्यावर सोनवणे सरांएवढे भारी शिक्षकरूपी जालिम औषध दुसरे नाही. आमचं हे दुर्मिळ औषध असंच चिरतरुण राहो आणि आमच्या रिटायरमेंटपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत राहो हेच त्यांच्या  ६५ व्या वाढदिवसानिमित्त माझे अभिष्टचिंतन !


प्रा.विशाल गरड.

डॉ.चंद्रभानू सोनवणे क.महाविद्यालय, उक्कडगांव.

सोनवणे सरांचे अभिष्टचिंतन

​ आमच्या संजीव सोनवणे सरांचे आडनाव सोनवणे का पडले असावे हे माहीत नाही पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांच्या आयुष्याचे सोने करून त...