Saturday, October 3, 2026

दुष्काळाच्या उंबरठ्यावर.

​

१९७२ नंतर पहिल्यांदाच आपली पिढी दुष्काळ पाहणार आहे. स्विमिंग टॅंक मधे पोहणाऱ्या, टब बाथमधे आंघोळ करणाऱ्या, शॉवर खाली बसणाऱ्या पिढीला दुष्काळ समजून सांगणे कठीण काम आहे. हाही लेख त्यांच्या दृष्टीने शेअर वगैरे करण्याचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नसू शकतो. त्यांनी जे कधी अनुभवलेच नाही त्यांची अनुभूती तरी त्यांना कशी होणार म्हणा. एखाद्या नर्तिकेने मारलेल्या चार पाच ठुमक्यांना मिलियन व्हू देणाऱ्या पिढीकडून दुष्काळाच्या उपाययोजना म्हणून लिहिलेला वैचारिक लेख जनमानसात व्हायरल करण्याची कितपत अपेक्षा ठेवावी ? असो तरीही उंबऱ्याच्या आत पाय ठेवायच्या आधी समाजप्रबोधन म्हणून काही गोष्टी पोट तिडकीने मांडाव्या वाटत आहेत म्हणून या विशाल गरडचा हा लेखप्रपंच. महाराष्ट्र सध्या भयंकर संकटाच्या सीमारेषेवर उभा आहे इथे सरकारसहित सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. “सध्या गिलासात पाणी हाय म्हणून मजा सुरू हाय, जवा ती संपल ना तवाच घशाला कोरड पडणार हाय”. मग आपण कधी जागे होणार आहोत?


नोकरदार वर्गाने गावाकडे शेती करणाऱ्या भाऊ बंधांची काळजी घ्यायला हवी. एरवी धान्यांची चुंगडी पाठवणाऱ्या हातांनाच आत खरी मदतीची गरज भासणार आहे. जास्त काही नाही पण प्रत्येक नोकरदाराने किमान त्याच्या शेतकरी भावांची जरी थोडी काळजी घेतली तरी त्याला मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने देखील हजारो लाखो कोटींच्या योजनासाठीचा पैसा फक्त काही महिने दुष्काळ उपाययोजनासाठी वापरावा. कितीही वाईट परिस्थिती आली तरी पाण्यावाचून माणसं मरतील एवढी वेळ कधीच आपल्यावर येणार नाही. बंद बाटल्या विकणाऱ्या कंपन्या धांद्यासाठी परदेशातूनही पाणी आणतील, आता दुष्काळात त्यांचीही किंमत ३० रुपये, ५० रुपये होवू नये म्हणजे मिळवले. 


कमी पावसामुळे हिवाळ्याला यंदा सुट्टी मिळणार असून इथून पुढे आपल्याला आठ महिन्यांचा उन्हाळा अनुभवायचा आहे. या दुष्काळात खरीप तर हातचा गेलाच पण रब्बीसुद्धा जावून हजारो हेक्टरवरील फळबागाही जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची तहान कशीही भागवता येईल पण सांडपाणी आणि शेतीचे पाणी आजपासूनच काटकसरीने वापरायला सुरुवात करायला हवी. धरणे आणि तळ्याच्या भरोशावर तर राहून अजिबात चालणार नाही कारण अतिवृष्टी होवूनही ती मार्च एप्रिललाच तळ गाठतात आणि तसेही त्यात ४०% हून अधिक गाळ आणि वाळूच असल्याने त्या पाणी साठ्यांची क्षमता तशीही फार कमी झाली आहे. शहरात तर सरासरी दर दोन तीन प्लॉटपैकी एकाकडे बोअर आहे, एका बाटलीत घातलेल्या हजार नळ्याचा उपसा दुष्काळात किती तग धरेल? त्यामुळे त्यांनीही उगं घरी बोअर आहे म्हणून पाण्याचा वारेमाप वापर टाळावा. 


श्रीमंतांचे काय ते परदेशात जाणून राहतील, जिथे मुबलक पाणी आहे तिथे विस्थापन करतील पण गुरा ढोरात जीव अडकलेला गरीब शेतकरी त्यांना वाऱ्यावर सोडून जाणार नाही. येणाऱ्या दुष्काळाचे भान ठेवून गावातील सर्वांनीच पैसा पाणी काटकसरीने वापरायला हवा. सण उत्सव येतच राहणार आहेत त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करून ऐन दुष्काळात मदतीसाठी इतरांकडे हात पसरावे लागतील. फक्त मिरवणुकासाठी गावपातळीवरचे युवक वर्गण्या गोळा करून सरासरी २ ते १० लाख एका रात्रीत बुकणा करून टाकत आहेत त्याने फक्त त्यांची झिंग होतेय पण पोटापाण्याचे काय? तोच पैसा जर वाचवून ठेवला असता तर किमान त्या गल्लीतील, गावातील दुष्काळग्रस्तांना काहीतरी मदत करता आली असती. भविष्याचे भान आणि जाण असणारी युवा पिढी निर्माण होणे ही काळाची गरज असणार आहे त्यासाठी प्रबोधन हाच एकमेव पर्याय असेल. 


कोरोना काळ जसा काहीजणांसाठी सेवा तर काहीजणांसाठी धंदा होता तसाच हा येणारा दुष्काळ सुद्धा असणार आहे. सरकारने देखील अवास्तव खर्चांना कात्री लावून तो निधी शेतकऱ्यांसाठी वळवायला हवा. माणूस हुशार प्राणी आहे सहज विस्थापन करून जगू शकतो पण मुक्या जीवांचे काय? राज्यातील पशूधन वाचवणे काळाची गरज आहे जर या दुष्काळात त्यांची जीवितहानी झाली तर मग पुढच्या वर्षी सर्वांना कृत्रिम केमिकल मिश्रित दूध प्यावे लागेल. पाण्याची भूजल पातळी लांब ४००, ५०० फुटाखाली जाईल. तरीही जमिनीची चाळणी करत बोअरवेलच्या गाड्या महाराष्ट्राच्या छाताडावरून फिरत राहतील. शेतात पाणी मुरवण्यासाठी कधी १० हजार खर्च न केलेले जमिनीतील पाणी उपसण्यासाठी आता लाखो रुपये खर्च करतील. काही टॅंकरवाले माफक दरात सेवा देण्यासाठी पुढे येतील तर काही पैसे छापण्यासाठी माफियागिरी करतील. ज्याची त्याची निती ज्याच्या त्यांच्यासोबत राहील. 


नैसर्गिक संकटांना सर्वांनी मिळून, एकजुटीने सामोरे जायला हवे. संकट मानगुटीवर बसल्यावर शहाणे होण्यापेक्षा ते दाराबाहेर आहे तोवरच शहाणे होणे सर्वांच्या हिताचे आहे. ज्या गावाजवळ एकही तळे नाही आणि नदी नाही त्या गावांचा उन्हाळा तर आज पासूनच सुरू झालाय असे समजावे. लोक डिझेल पेट्रोलसाठी, दारू, तंबाखूसाठी जसे तडफडतात तसे आता पाण्यासाठी तडफडावं लागणार आहे. “पाणी आडवा, पाणी जिरवा”. “पाणी जपून वापरा” असे संदेश देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचे आजवर आपण किती ऐकले ? आता झकमारून त्यावरच जास्त काम करावं लागणार आहे. आपल्या गावाकडे जेवढं तळ्यात पाणी असतं तेवढं तर फक्त एका मुंबई शहराला एका दिवसाला हागायला लागतं मग विचार करा महाराष्ट्रातील सर्व शहरांना दिवसाला किती पाणी लागेल? भयाण वास्तव आहे हे, काळाचा रोख ओळखून वागा जनहो. वैयक्तिक हेवेदावे, राजकीय जातीय मतभेद बाजूला सारून तहानलेल्या जीवांसाठी एकजुटीने काम करूयात आणि दुष्काळाला तोंड देवूयात. वाटलीच भगवंताला आपली काळजी तर अधून मधून तो अवकाळी सरी बरसवेल तोवर आपण आपल्या माणुसकीच्या सऱ्या बरसवूयात. 


प्रा.विशाल गरड.

लोकव्याख्यानकार, चित्रकार तथा लेखक. 

दुष्काळाच्या उंबरठ्यावर.

​ १९७२ नंतर पहिल्यांदाच आपली पिढी दुष्काळ पाहणार आहे. स्विमिंग टॅंक मधे पोहणाऱ्या, टब बाथमधे आंघोळ करणाऱ्या, शॉवर खाली बसणाऱ्या पिढीला दुष्क...