Saturday, July 4, 2026

शिवरायांच्या महाराष्ट्रात, नर्तिकांचा हैदोस.


सध्या बीभत्स नृत्याविष्कार सादर करणाऱ्या काही नर्तिकांनी महाराष्ट्रभर नुसता हैदोस माजवलाय. संतांचा अभंग आणि ओव्यात न्हावून निघणारा महाराष्ट्र अलीकडील काळात नर्तिकांच्या फडात रेंगाळताना दिसतोय. जत्रा, यात्रा, उरुस, दहीहंडी किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रमाण गेल्या सात आठ वर्षात प्रचंड वाढलंय. अशात अश्लील हावभाव करणाऱ्या आणि अवयवांची संमोहित हालचाल करणाऱ्या नर्तिकांना जास्त डिमांड आलय. मुळात त्याला नर्तन म्हणता येईल का इतक्या खालच्या थराला जावून काही नर्तिका नृत्याच्या नावाखाली अंग प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि भविष्याला न शोभणारा हा वर्तमानकाळ आहे. याला जेवढ्या त्या नर्तिका जबाबदार आहेत तेवढेच आयोजकही आहेत. अशातही सार्वजनिक आचारसंहिता समजून पारंपारिक वस्त्र परिधान करून शुद्ध नृत्य करणाऱ्या नर्तिकांबद्दल आम्हाला आदरच आहे अन पुढेही राहील. करून करून भागले अन देव पूजेला लागलेल्यांचाही थोड्याफार प्रमाणात आहे पण “अमुक तमुक बाईसारखंच मलापण व्हायचंय, तिच्यासारखा स्टारडम मलाही मिळवायचाय या येडापायी तिचीच री ओढत या व्यवसायात नव्याने आलेल्या नर्तिकांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला या कुठपर्यंत रसातळाला नेतील याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.


एखाद्या गावात किंवा शहरात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवायचा म्हणलं की काही गावकरी वर्गणी द्यायला इवळतात पण तिथंच जर नर्तिकेचा कार्यक्रम होणार असेल तर मात्र एका रात्रीत फक्त व्हॉट्सअपवर तीन चार लाख गोळा करतात. कमी जास्त प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळेल. त्या कातील नृत्यांगणेला आणण्यासाठी तर पोरा ठोरांसोबत पार म्हातारी कोतारीसुद्धा कात टाकून तयार असतात. जुन्या काळातले तमाशे हे अत्ताच्या डान्स शो पेक्षा कितीतरी पटीने सरस होते. लावण्या असायच्या पण झाकून चोपून. त्यातूनही श्रोते घायाळ व्हायचेच की पण ते फक्त अदाकरीतूनच. चेहरा, कोपरापासूनचा हात, पायांचा पंजा अन चार बोट कंबर; बस यापलीकडे त्यांचे शरीर दिसत नसायचे पण कला मात्र उठून दिसायची. आता महाराष्ट्राच्या लावणीला परप्रांतीय नर्तिकांच्या बीभत्स नृत्याने पछाडले आणि एक नवीनच मादक व्हर्जन तयार झाले ज्यात छाती अन ढुंगणाच्या हालचाली म्हणजेच लावणी म्हणू लागलेत. त्याला ना शेंडा आहे ना बुड, बीट वाजले की लागले हलायला.. ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ, ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ.


अहो पहिले गावात तमाशे यायचे तेव्हा त्या तमाशाचा फड गावाबाहेर असायचा. पण हल्ली मात्र गावातील भर चौकात, सार्वजनिक ठिकाणी डान्स शोच्या नावाखाली हा मादक नृत्याचा हैदोस सुरू असतो. त्या तमाशाला सुद्धा बाहेरून पडदा असतो पण इथे मात्र सगळा खुल्लम खुल्लाच. अगदी रस्त्यावर जाणारे, शेजारच्या अपार्टमेंट किंवा घरातले, चौकातले, पारावरचे ह्या सगळ्यांनाच तो फ्री असतो. कुणीही या बघायला हरकत नाही. मुळात फक्त प्रौढांनी चार भिंतीच्या आत बघण्याच्या लायकीचे मादक नृत्य आता काही आयोजकांनी पार सार्वजनिक चौकात आणि भर रस्त्यावर आणून ठेवलेत. पुढच्या पिढी साठी हे किती भयंकर ठरेल याची पुसटशीही कल्पना त्यांना नाही. तुम्ही असे कार्यक्रम बघायला जाताना लहान लेकरांना सुद्धा घेवून जात आहात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेली पोरं तर या मोह कुंडात दणादण उड्या घेत आहेत. आपण समाज म्हणून फक्त हे पाहत आहोत किंबहुना असे थिल्लर कार्यक्रम आयोजित करून त्यांना उड्या मारण्यास बळ देत आहोत. 




हे असले कार्यक्रम आधी महाराष्ट्रात होत नव्हते. ऑर्केस्ट्रा वगैरे असायचे पण त्यात इतरही बरेच कार्यक्रम, संस्कृती बघायला मिळायची पण अलीकडील काळात मात्र एका नर्तिकेचे यश पाहून अनेक नवोदित नर्तिकांनीही या कुंडात उड्या घेतल्यात. आता तर अशा कार्यक्रमात बीभत्सता दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली की काय इतक्या टोकाचे थिल्लर डान्स होताना दिसत आहेत. असे कार्यक्रम कोणत्याही चौकात होवू द्या, त्याच दिवशी त्या नर्तिकेचे शे पाचशे रिल्स सोशल मीडियावर पडतात. ज्यांनी पाहायला नको त्यांच्या पण फीड मधे ते पुन्हा पुन्हा दिसत राहतात. नर असलेला प्रत्येक देह क्षणभर का होईना पण ते लटके झटके बघतोच. मुळातच हे आकर्षण नैसर्गिक आहे त्यामुळे त्याला बळी पडण्यापासून वाचताच येत नाही. अगदी लहान लहान लेकरांच्या हातात सुद्धा तासन्नतास मोबाईल आहेत, नकळत त्यांच्यापर्यंतही हा कंटेंट सहज पोहोचत आहे. 




नाचता नाचता एखादं लहान पोरगं स्टेजवर जातं अन ती नाचणारी नर्तिका सर्व गर्दीसमोर त्याला तिचा पापा घायला लावते. त्याने तिचा पापा घेतला की मग उपस्थित गर्दीही त्याने मर्दुंगी दाखवल्याप्रमाणे टाळ्या पिटते, शिट्ट्या फुकते. पुढे तर ती नर्तिकाच त्या लेकराची तोंड धरून पप्पी घेते. अरे नृत्या सारख्या पवित्र आणि श्रेष्ठ कलेला अशा तथाकथित नर्तिकांनी पार गटारीत ढकलून दिलंय. लावणी सारख्या नृत्यात हात अन पाय सर्वात जास्त नाचत असतात पण लावणीच्या पोशाखात हल्लीच्या काही नर्तिका नको त्याच अवयवांचे जास्त नृत्य करतात मग आंबट शौकिनांचा मेळा तिथे का बरे नाही भरणार ? पार एका मेकांच्या बोकांडी बसून, गाड्यावर, पत्र्यावर, गच्चीवर, झाडावर बसून त्यांचे लटके झटके बघायला का बरे नाही गर्दी होणार ? लहान वयातच पोरांच्या नजरा वासनांध का बरं नाहीत होणार ? जिभल्या चाटत शाळकरी पोरं कशी बरं नाहीत नाचणार ? थांबा ! विचार करा, मुळापासून नासत चाललेलं हे सगळं समाजात पडणारं विषारी विरजण जर वेळीच थांबवलं नाही तर विचारशील पिढी नासून जायला वेळ लागणार नाही हे ध्यानात असू द्या.


नृत्य कलेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे पण या दशकात जेवढे केवढ्या अश्लील हावभाव आणि लटक्या झटक्यांनी तिच्यावर अतिक्रमण केलंय त्याने नृत्यकला बदनाम होत आहे. विवेक सोडून दिलेल्या काही प्रसिद्धीपिपासू नर्तिकांमुळेच नृत्य कलेत हे अतिक्रमण झालंय. आता तर देव देवतांच्या गाण्यांना सुद्धा रिमिक्सचा तडका देवून या आधुनिक हाडळणी बीभत्सरित्या थैय्या थैय्या नाचत आहेत आणि तथाकथित धर्म रक्षणावर वगैरे गप्पा मारणारे डोळे बंद करून झोपले आहेत. स्टेजच्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो आहेत पण याचे ना नाचणाऱ्यांना भान ना नाचवणाऱ्यांना. शिवरायांचा महाराष्ट्र आहे म्हणणाऱ्यांनो हे तुम्हाला पटतं का ? देव अन धर्माची आचार संहिता माहीत असणाऱ्यांनो तुम्हाला हे रुजते का ? शिवभक्तांनो आपल्या राजाच्या एकाही किल्ल्यावर नर्तिकालयासाठी इंचभर सुद्धा जागा नव्हती हे तुम्हाला ठाऊक नाही का ? नर्तिका ही एक स्त्री असते तिच्यातील त्या स्त्रीचा कायम आदरच असेल पण ती जर गैरनृत्य करून इथल्या युवापिढीला नादावून सोडत असेल तर तिच्या त्या कलेचा निषेध करावाच लागेल की. 


अशा डान्स शो च्या परवानग्या देतानाच पोलीस स्टेशन स्तरावर कठोर निर्बंध घालायला हवे. सदर कार्यक्रमात जर  युवकांना उकसावणारी बीभत्स नृत्य झाली तर संबंधित आयोजक आणि नर्तिकेवरही गुन्हे दाखल व्हायला हवे. मुळात असे कायदे आहेतही पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही हेच दुर्दैव. असले कार्यक्रम आयोजित करणारेही मोठे मासे असताना आणि त्यांच्यामागे त्याहून मोठे शार्क मासे असतात मग अशा अवस्थेत पोलीस प्रशासनाकडून तरी कारवाईची काय अपेक्षा ठेवायची ? अन्यथा आजवर जे डान्स शो झालेत त्या रीतसर परवानग्या घेवूनच झाले असतील की, मग तरीही एवढा नंगा नाच कसा पचवला जातो ?




मी एक लोकव्याख्यानकार आहे. समाजात चांगला विचार रुजवणं आणि वाईट विचारांना मूठ माती देणं माझं काम आहे. माझ्या व्याख्यानातून तर मी या गोष्टींवर नेहमीच आसूड ओढत आलोय पण एक लेखक म्हणूनही गेली काही वर्ष मनाला खटकत असलेली आणि माझ्या विवेकी मेंदूला न पटणारी गोष्ट इथे परखडपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. माझ्या लिखाणाशी आपण सहमत असाल नसाल पण बिथरत चाललेली युवा पिढी मी खूप जवळून अनुभवत आहे. विभयभंग, छेडछाड, बलात्कार या सारख्या घटना वाढण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातलेच एक हे देखील आहे. या नर्तिका नाचत असताना स्टेजच्या अवती भवती उभा राहून तिच्यावर खिळलेल्या नजरा एकदा निरखून बघा. तुम्हाला त्या डोळ्यात या लेखाचे तात्पर्य दिसेल. 


बाकी हा लेख कोणत्याही विशिष्ठ एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिला नसून तो एका बीभत्स वृत्तीबद्दल लिहिला आहे. या विषयाबद्दलच्या तुमच्याही काही भावना असतील, अनुभव असतील तर कमेंटबॉक्समधे अवश्य नोंदवा. पोस्ट वाचणाऱ्यांचे कमेंट वाचूनही प्रबोधन होईल याची खात्री आहे. काही आवली पोरांनी जर वाकड्या तिकड्या कमेंट केल्याच तर चांगल्या तेवढ्या वाचा, लय इरसाल अन बिलिंदर असतील तर दुर्लक्ष करा. शक्यतो वृत्तीबद्दल लिहा, विशिष्ठ व्यक्तीबद्दल लिहिणे टाळा. आणि मी लेखात उल्लेख केलेल्या तथाकथित नर्तिकांचे फोटो/व्हिडिओ वगैरे पोस्ट करणे टाळा. सार्वजनिक स्थळी नाचण्याची आचार संहिता आधुनिक नर्तिकांना कळेल का नाही माहीत नाही पण किमान त्यांना बोलवणाऱ्यांनी तरी ती पाळावी म्हणून हा अट्टाहास.


विशाल गरड.

लेखक तथा लोकव्याख्यानकार (महाराष्ट्र)

Thursday, June 25, 2026

आरोग्यदायी तुकाराम

दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शक्य झाले. बाजारातील डुप्लिकेट दूध बंद झाले त्यामुळे आपोआपच ओरिजनल दुधाची किंमत वाढली. जर मुंढे साहेबांनी काही दिवसात एवढे जबरदस्त काम केले असेल तर या आधी अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त काय फक्त भेसळखोरांचे आणि गुटखा माफियांचे हाफ्ते खावून ढेकरा देत होते का? या आधी आयुक्त पदावर काम केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या आरोग्याचे काळजी न घेतल्याबद्दल दोषारोप दाखल करून त्यांची चौकशी व्हायला हवी तसेच इडी ने अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची जरा मन लावून माहिती काढायला हवी. 


राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या थेट आरोग्याशी संबंधित असलेल्या विभागावर कुचकामी, भ्रष्टाचारी आणि हतबल अधिकारी बसवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. आजवर कमी वयात जे अटॅक येवून मेले, फुड पॉयझनिंगने गेले, लहान लेकरे दगावली, कॅन्सरची वाढ झाली, बीपी आणि मधुमेहाची जणू लाटच आली याला मुख्य कारण आहार आहे. शहरात तर पॅकिंग शिवाय काहीच घरात येत नाही. जन्मापासून जर प्रिझर्वेटिव्हचा रतीब पोटावर होणार असेल तर शरीराचे काय होत असेल. 


सध्या गावागावातले गाई म्हशींचे गोठे दिसेनासे झालेत. गावातील कळप ची कळप संपले आहेत. एकीकडे दुधाचे उत्पन अति प्रचंड प्रमाणात घटले असताना दुधाची मागणी मात्र अति प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तरीही अगदी कोणत्याही दुकानात पिशवीतले दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध कसे ? समाजातील उच्चभ्रू व्यक्ती तीनशे चारशे रुपये किमतीने दूध पित असतात. मुळात शुद्ध गाई म्हशीच्या कासेतून निघालेल्या दुधाची हीच खरी किंमत असते. जे ओरिजनल असते ते महाग असते मग चाळीस पन्नास रुपये लिटर मधे मिळणारे ते काय असले ? इथे दुधाचीच जर ही गत आहे तर खवा आणि पनीर बाबत किती भेसळ असेल ?


आपला जीव हा कोणताही पक्ष, नेता आणि सरकारपेक्षा मौल्यवान असतो. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारचे परम कर्तव्य असायला हवे. मागे भलत्याच प्रकरणामुळे चर्चेत आलेले या खात्याचे मंत्री त्यांच्याच खोलीत सापडलेल्या वस्तूंवरून या खात्याला कितपत न्याय देवू शकतात यावर प्रश्नचिन्ह आहे. पण तुकाराम मुंढे साहेबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे भविष्यात त्यांचा आपोआपच कार्यक्षम मंत्री म्हणून उल्लेख होईल. भविष्यात त्यांनीही मुंढे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे म्हणजे त्यांच्या समोरील प्रश्न चिन्ह निघून जाईल. 


सरकार तुम्ही जनतेचे पालक आहात. आपली लोकसंख्याच इतकी आहे की भेसळ करूनही उत्पादनांची कमतरता भासेल. पण जर भेसळचा माल बंद झाला तर आपसूकच शेतकऱ्यांचा शंभर नंबरी अस्सल माल थेट ग्राहकांना मिळू लागेल. भाव चांगला मिळू लागल्यास शेतकरी नव्याने उत्पादन वाढीवर भर देतील. शिकलेली पोरं सुद्धा शेतीकडे वळतील अन महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करतील. सुरुवातीला ग्राहकांना पडल थोडी झळ पण शरीरापेक्षा महत्वाचं दुसरं काय आहे ? रोड, बिल्डिंग, कार्यालये, उड्डाणपुले, स्मारके यासोबतच लोकांच्या आरोग्याचा विकास करण्यासाठीही सरकारने मजबूतीने तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभा राहायला हवे. आता जर या पदावरून त्यांची उचलबांगडी झाली तर जनतेच्या रोषास सरकारला सामोरे जावे लागेल. अन जर कार्यकाळ पूर्ण होण्याआधी साहेबांची बदली केली तर जनता समजून जाईल भेसळखोर आणि गुटखा माफियांनी सरकार विकत घेतले. 


बाकी विविध विभागांच्या आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनीही जर मुंढेंची री ओढली तर एक महिन्यात महाराष्ट्र धुवून निघेन. भ्रष्टाचारातून पैसा कमवून स्वतःच्या दहा पिढ्यांचा उद्धार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील पुढच्या दहा पिढ्यांनी तुमचे नांव घेतले पाहिजे असे कार्य करा. फार काही नाही फक्त कायद्याने जे अधिकार दिलेत तेवढेच तत्परतेने वापरा, गोरगरीबांचे कल्याण होईल. FDA मधे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनो, एक आई जेव्हा तिच्या दोन वर्षाच्या बाळाला पिशवीतले दूध पाजत असते ते फक्त तुमच्या विश्वासावर. आजवर इथल्या व्यवस्थेने तुमचे हात बांधले होते आता तुकाराम मुंढे साहेबांनी जनहितार्थ त्याला मोकळीक दिली आहे. “भले तरी देवू कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी”- तुका म्हणे. याप्रमाणे आपल्या पदाशी इमान राखून तुम्हीही तुमचे योगदान द्यावे हीच अपेक्षा.


विशाल गरड 

लोकव्याख्यानकार तथा लेखक. 

२५ जून २०२६, पांगरी 

शिवरायांच्या महाराष्ट्रात, नर्तिकांचा हैदोस.

​ सध्या बीभत्स नृत्याविष्कार सादर करणाऱ्या काही नर्तिकांनी महाराष्ट्रभर नुसता हैदोस माजवलाय. संतांचा अभंग आणि ओव्यात न्हावून निघणारा महाराष...