टॅक्टरवरची ही जागा म्हंजी जणू बरक्यापणीचं आमचं सिंव्हासनच व्हतं. सुट्ट्याला कधी शेलगावच्या लता मावशीकड गेलाव की घरात पिशवी टेकवायच्या आधीच दारात असलेल्या ह्या टॅक्टरवर बसायला तरफाडायचाव आमी. तवा आमच्या पावण्या रावळ्यात जास्त कुणाकडं वाहणं नव्हती म्हणून मग टॅक्टर हीच समद्यात आवडीचं वाहन आसायचं. “आमच्या मावशीच्या घरी टॅक्टर हाय” आसं सांगायलाबी आभिमान वाटायचा. कदी कदी टिरिंगवर बसून ती फिरवत फिरवत ब्रिइऽऽऽम, ब्रिइऽऽऽम आवाज काढताना टॅक्टर चालीवल्याचा आनंद मिळायचा.
आमचा मावस भाऊ बापू न्हायतर तात्या जर कदी टॅक्टर घिऊन निघाले तर मग आमची एक चक्कर फिक्स आसायची. त्यात बापू म्हणायचा “ऐ पोरांनो, गच्चीम धरा दांड्याला न्हायतर ट्रायलीच्या चाकाखालीच जाचाल बगा” धडाडांग व्हतडांग करत एक चक्कर मारली की आमी मग ईळभर हुंदडायला रानात रिकामं व्हायचाव. एकदा मला सायकल पायजेल म्हणून आमच्या उत्तम काका ऊर्फ भऊनी त्येंची एक जुनी सायकल नीट करून शेलगावपसून पांगरीपस्तोर चालवीत आणली व्हती. तवा त्या सायकलवर शायनिंग मारत म्या आणलेली पहिली चक्कर अजूनबी ध्यानात हाय.
आता मावशी गेल्यापसून लय काय जाणं व्हत नाय पण काल लय दिसांनी शेलगावला गेल्यावर रानात धक्क्याला लावून ठिवल्याला त्योच टॅक्टर बघितला आन त्येच्या मडगार्डवर बसून फुटू काढायचा मोह मला न्हाय आवरला. आज जरी फोर्ड मधी फिरत आसलो तरी लहानपणी हितं बसून फिरायचा आनंद काय औरच व्हता. बारक्यापणी लै छोट्या-छोट्या गुष्टीत म्होटा-म्होटा आनंद व्हता पण म्होट्ट झाल्यावर आसल्या छोट्या छोट्या गुष्टी आठिवण्यात आन जपण्यातसुदा तितकाच आनंद आसतंय म्हणूनच ह्यो फुटू काढून त्येज्यावर शबुद शिपडल्यात.
विशाल गरड
१३ डिसेंबर २०२३, शेलगाव (जहागीर)
जुन्या आठवणींना उजाळा दिला
ReplyDeleteEk number ♥️
ReplyDeleteलई जुण्या गोष्टीची सवय झाली बघा मास्तर.
ReplyDelete