आज सांच्यापारी रानातून घरी येताना एक चिलाट खापकन डोळ्यात घुसलं. लगीच डोळा चुळीत चुळीतच म्या गाडी साईडला घितली. चिलटाला जित्ता डोळ्याबाहिर काढायसाठी वाडुळ झटलो पण ते डोळ्यात गेल्या गेल्याच मेलं व्हतं. ह्ये आसलं मायंदाळ व्हतंय म्हणुंशान गॉगल असतंय डोळ्याला पण त्योबी नेमका आजच घरी ऱ्हायला आन हे चिलाट हाकनाक मेलं. त्येलाबी माहित नसल पुढून गाडी यील आन मलाबी माहीत न्हवतं पुढून ती यील. एवढ्या मट्या पिरतमीवर ह्या बोटावर जीव सुडून पडल्याल्या ह्या चिलटाची कुठं गणती व्हइल का ?
आवं ही चिलाट काय आन माणूस काय. ऊगं जमिनीवर थोडं वरीस फिरायला आल्याली पाव्हणं हायती. एकदा का दिस भरलं की आसच चिलटासारखं मरून जायचंय. तवा आजचा दिस आपला म्हणून जगा लेकानो. सगळं उद्या उद्या करत बसलाव तर जगायचं ऱ्हाऊन जाईल. ही चिलटाची बॉडी रस्त्याच्या कडंला कुठं पडली आसल ह्यजी कोण नोंद ठिवील का ? आरं ह्या भर्मांडात माणूसबी एक चिलाट हाय, जवा जवा त्यो निसर्गावर चढाई करल तवा तवा निसर्गबी ह्या चिलाटासारखी माणसं मारील; मग दोष देणार कुणाला ?
विशाल गरड
२३ डिसेंबर २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment