Monday, August 26, 2024

शिवशिल्प उभारताना

खरं सांगू जेव्हा हे उद्घाटन झाले तेव्हाच मी महाराजांच्या या शिल्पाबद्दल लिहिणार होतो. पण आपली माणसं परखड गोष्टी मांडल्यावर सुद्धा टिकेचे धनी करतात. याआधीही जेव्हा महाराजांचा देखावा राजपथावर मिरवला होता त्यावेळी मी “महाराजांची मान खाली का ?” या शिर्षकाखाली लेख लिहिला होता. जो मुंबईच्या नवा काळ या आघाडीच्या दैनिकाने पहिल्या पानावर हेडिंग करून छापला होता. एक कलाकार या नात्याने प्रत्येक कलाकृतीकडे बघण्याची आमची एक नजर असते. आता या फोटोतले शिवशिल्प पाहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला शोभणारे हे शिल्प होते का ? तर अजिबात नाही. अगदी सुमार दर्जाची ही शिल्पकला होती. निसर्गालाच ती बघवली नाही म्हणून वादळाने ते शिल्प ढासळले असावे. त्या कामाचा दर्जा वगैरे काय असेल हे तर पुतळ्याच्या ठेवणीवरूनच समजून येते. खरंच सांगा आजवर तुम्ही जेवढे केवढे अश्वारूढ पुतळे पाहिले असतील त्याहून हा पुतळा तुम्हाला कसा


महाराष्ट्रात शिल्पकलेतील कलकारांची अजरामर नावे असताना हा पुतळा नेमका कोणाकडून बनवून घेतला असेल ? अरे महाराज उभे करताना किमान त्यांच्या कर्तृत्वाची जाण ठेवून तरी त्यांच्या पुतळ्याला न्याय द्यायला हवा. अर्ध्याहून अधिक भारत ज्यांच्या नावावर होता त्यांचे शिल्प उभा करताना सुद्धा तेवढी भव्यता साकारणे शक्य होत असेल तरच धाडस करत जावा. अन्यथा अशी सुमार दर्जाची शिल्पकला उभी न केलेली बरी. पुतळे उभा करण्याचा सरकारचा हेतू जरी चांगला असला तरी बांधकामे पक्की होण्यासाठी जरा वेळ जाऊच द्यावा लागतो. असे नेते वगैरे येणार म्हणून घाई गडबडीत उभारायला तो काय तात्पुरता देखावा वाटला की काय ? सदर पुतळा उभारलेल्या ठेकेदारांनो. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर लावलेला एक दगड सुद्धा प्रचंड ऊन, वारा, पाऊस झेलत अजून जागचा हालत नाही रे पण तुमची कामे ही अशी जर वाऱ्यावर उडून चालली तर कसे चालायचे. आता पुन्हा त्याच जागी शिवशिल्प उभा करायचे असेल तर ते अतिशय सुबक, दर्जेदार आणि महाराजांचा तलवार घेवून उभारल्याचा आवेश आणि आत्मविश्वास लख्ख प्रकट होणारे असावे एवढीच एक शिवविचारांचा सेवक नात्याने माझी माफक अपेक्षा. जय शिवराय !


विशाल गरड

२६ ऑगस्ट २०२४, पांगरी


(टिप : महापुरुषांच्या पडलेल्या किंवा तुटलेल्या पुतळ्याचे फोटो शेअर करणे माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण ते पाहून जर माझ्याच भावना दुखावल्या जात असतील तर इतरांच्याही त्या दुखावण्याचा मला अधिकार नाही. आपणही त्या घटनेचे फोटो शेअर करणे टाळता आले तर टाळा ही विनंती.)






No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...