Monday, August 12, 2024

विलक्षण योगायोग

आज वडिलांसोबत सोलापूरला गेलो होतो. त्यांची प्रशासकीय कामे आटोपून परत फिरताना आमची गाडी दुपारी ३ च्या सुमारास सोलापूर-बार्शी टोल नाक्याच्या थोडे पुढे अचानक बंद पडली. अनेक स्टार्टर मारले पण काही केल्या गाडी उचलत नव्हती. मी बाहेर येवून गाडीचे बोनट उघडून ठेवले. इतक्यात रोडवरून जाणारे दुचाकीस्वार ॲड.राहुल जानराव मला पाहून थांबले. याआधी माझी त्यांची ओळख नव्हती पण ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरुन माझा कंटेंट पाहत असत त्यामुळे त्यांनी मला थांबून त्याबद्दल कौतुकाची प्रतिक्रिया दिली. आमचे थांबण्याचे कारण समजताच वकील साहेबांनी त्यांच्या परिचयाच्या वसीम शेख या फिटरला तात्काळ फोन करून गाडीजवळ बोलावले.

काही मिनिटांत वासिम आला. त्याने गाडी चेक करून लगेच निदान सांगितले. डिझेल सप्लाय व्यवस्थित होत नाही. प्रेशर पंप निकामी झालाय. मी माझ्या नेहमीचा फिटर दयानंद सूर्यवंशीला कॉल करून सेकंड ओपिनियन घेतला तेव्हा त्याचेही तेच म्हणणे आले. आता सर्वात मोठा प्रश्न उभारला की तो पार्ट मिळेल कुठे. कारण गाडी बंद पडण्याचा असा प्रॉब्लेम आधीपासूनच होता. पण गाडी बंद झाल्यावर थोडयावेळाने चालू व्हायची म्हणून जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. फोर्डचे स्पेअर पार्ट सहज उपलब्ध होत नसल्याने तो पार्ट टाकण्यास विलंब होत होता. पण आज ती अशी बंद पडेल याची कल्पना नव्हती. अखेर वसीमने त्याच्या एका मित्राला सेकंद हँड पंप मिळेल का याची विचारपूस केली आणि काय आमचं नशीब थोर म्हणून तो पंप लागलीच उपलब्धही झाला.

एवढ्यात सोलापूरहून पीकअप घेवून निघालेला आमचा गावकरी गणेश बगाडे आमच्याजवळ थांबला. त्याला वाटले बोनट उघडून गाडी कडेला उभी आहे म्हणल्यावर काहीतरी बिघाड झालेला असणार. गणेशच्या येण्याने माझी गाडी टोचण लावून वसिमच्या गॅरेजपर्यंत नेता आली. वासिमजवळ गाडी दुरुस्तीसाठी लावून आम्ही त्याच्या पिकअपमधे वडाळ्यापर्यंत आलो. तिथून सोलापूर परांडा गाडीत बसलो. गाडीत प्रचंड गर्दी होती. तिकीट काढताना कंडक्टर झिरपे साहेबांनी मला ओळखले. त्यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. तुडुंब भरलेल्या गाडीत त्यांनी त्यांची कंडक्टर सीटवर माझ्या वडिलांना बसवले आणि स्वतः माझ्यासोबत उभारले. पुढे बार्शीत उतरताच प्लेटफॉर्मवर कराड-लातूर गाडी उभाच होती. आम्ही लगेच ती गाडी पकडून अंधार पडण्याच्या आत पांगरीला पोहोचलो.

 


आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली ते सांगतो. यातले ॲड.राहुल जानराव यांना मला भेटण्याची खूप ईच्छा होती. माझी आणि त्यांची भेट व्हावी असे त्यांना सतत वाटायचे. माझ्या व्याख्यानाचे ते चाहते आहेत. यातला गणेश बगाडे हा कधीच इतक्या उशिरा सोलापूरहून निघत नाही नेमके आजच त्याला उशीर झाला. एस.टी.कंडक्टर झिरपे साहेबांची कधीच सोलापूर-परांडा गाडीवर ड्युटी नसते. नेमकी आजच त्यांची त्या गाडीवर ड्युटी लागली. फिटर वसिम शेखने त्याच्या गॅरेजचे सगळे सामान दुसरीकडे शिफ्ट केले होते. काहीवेळात तो सोलापूर शहरात चालला होता. आणि मी माझे वडील विजय गरड (दादा) यांच्यासोबत कधीच त्यांच्या राजकीय किंवा प्रशासकीय कामांसाठी सोबत जात नाही. त्यांचे नेहमीचे सारथी रवी काकडे त्यांच्या सोबत असतात पण आज सहजच त्यांच्यासोबत जाण्याचा विचार माझ्या मनात आला आणि मी गेलो. 

यावरून एक गोष्ट अनुभवली. “अगर किसी चीज को तुम दिलो जानसे चाहते हो तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने मे जुटी रेहती है.” हे सगळं नसतं घडलं तर कदाचित आम्हाला  खूप त्रास झाला असता पण संकट आले आणि अगदी दुसऱ्याच क्षणाला ही इतकी माणसं जादू सारखी भेटली आणि सगळं काही सुरळीत होवून आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. या पृथ्वीवर अशी कोणतीतरी एक शक्ती नक्की आहे जी जात, धर्म, पंथ, वर्ण याच्या पलीकडे जाऊन हे सगळं इतक्या पध्दतशीरपणे घडवून आणते. आजच्या दिवशीचा हा अनुभव सदैव स्मरणात राहील. ॲड. राहुल जानराव, गणेश बगाडे, वसीम शेख, झिरपे साहेब, रवी काकडे या सर्वांचे मनापासून आभार. 


विशाल गरड

१२ ऑगस्ट २०२४, (सोलापूर-बार्शी रोडवरून)



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...