Tuesday, December 13, 2016

| मेलेला बैल ©

आज सकाळी काॅलेजला निघालो होतो. माझ्या नेहमीच्या वाटेवर एक लहान मुलगा अनवाणी पायाने चालत चाललेला दिसला मी क्षणार्धात गाडी थांबवली व त्याला गाडीवर बसवुन निघालो. कुठं जायचंय असं विचारल्यावर शेतातल्या कोट्यावर निघालोय असं तो म्हणाला. डोंगरी वाटेने गाडी हालत डुलतच चालत असल्याने त्याच्या दोन्ही हातांनी त्याने माझ्या पोटाला घट्ट पकडलं होतं. चालता-चालता आमच्या गप्पा मात्र सुरूच होत्या. मी त्याला त्याचे नांव विचारले तो म्हणाला "गौरव" मग मी लगेच त्याला त्याच्या वडीलांचे नांव विचारले त्यावर तो म्हणाला "पप्पा". त्याच्या या उत्तरावर मी खुप मनमुराद हसलो. कितवीत आहेस ? तो म्हणला "आंगीणवाडीत".
थोडंसं पुढे गेल्यानंतर तो बोलला "ओऽ मामा, तुम्हाला म्याल्याला बैल दाकवु का ? मी उत्सुकतेने विचारले कुठाय? तो म्हणाला "तिकाय तिथं वड्याच्या कडला टाकलाय, कुत्री तोंड घालुन-घालुन खायल्याती बगा त्यला" मी गाडी थांबवुन ते दृष्य पाहिलं खरंच एक काळ्या रंगाचा बैल तिथे मृतावस्थेत उघड्यावर टाकला होता आणि फिरस्ती कुत्री आणि कावळे त्यावर तुटुन पडले होते. मी पाहत असतानाच गौरव म्हणाला "ह्याला बैल पोळयाला लई भारी सजीवलं व्हतं ढाल लावुन आन् मेल्यावर बगा कि कसं टाकुन दिलंय" त्याचे हे वाक्य ऐकुण मी अचंबीत झालो.
मुळात एका अंगणवाडीत शिकणाऱ्या या गौरवच्या विचारांना मी सलाम ठोकला कारण माझ्याही मनात बरोबर तोच विचार घुटमळत होता. कि एखादा बैल जिवंत असताना कसलाही रोजगार न घेता, मिळलं ती काडी वैरण खावुन या काळ्या आईची सेवा करतो आणि मेल्यानंतर मात्र त्याच मातीच्या कुशीत जाण्याचं भाग्यही त्याच्या पदरात पडंत नाही. शेवटी एवढंच वाटतं कि जे त्या अंगणवाडीतल्या गौरवला कळलं तेच जर त्या बैलाच्या मालकाला कळलं असतं तर आज तो बैल नक्कीच मातीच्या कुशीत असला असता.
त्या पडलेल्या मुक्या जिवाला श्रद्धांजली अर्पन करून गौरवला त्याच्या शेतातल्या कोट्यावर सोडलं आणि मी काॅलेजवर पोहोचलो. साडे दहा ते सव्वा अकरा  असे लेक्चर घेऊन मनातले शब्द मोबाईलवर टाइपीत बसलोय. सरतेशेवटी आजच्या या प्रसंगातुन मी एक गोष्ट शिकलो की, कृतज्ञता हि फक्त शिक्षण आणि जाणतेपणावर अवलंबुन नसुन, ती लहाणपणी मनावर झालेल्या संस्कारांवरच अवलंबुन असते.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १३ डिसेंबर २०१६
वेळ : सकाळी ११:३० ते १२

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...