Wednesday, November 30, 2016

| पायकुट ©

एखादा प्राणी जर खुप पळत असेल तर तो पळुन दुरवर जाऊ नये म्हणुन त्याच्या दोन पायला एक दोरी बांधली जाते त्यालाच 'पायकुट' असे म्हणतात. थोडक्यात पळण्यातला अडथळाच म्हणा की. आज सकाळी लवकरच काॅलेजवर निघालो होतो. उक्कडगांवच्या आटलेल्या नदी पात्रात असेच पायकुट घातलेली चार खेचरं दिसली. पायातला ब्रेक आपोआप दबला आणि क्षणभर मी त्या खेचरांकडंच पाहत राहिलो. अंगानं धष्टषुप्ट तांबड्या रंगाची हि खेचरं कळपाबाहेर चरायला आली होती. अगदीच हळु-हळु पावलं टाकतं ती चालली होती. मला पाहुन थोडी थबकली पण घाबरली नाहीत. कारण काबाडकष्ट करणे आणि माणसानं हाकिल तसं हाकणे एवढंच त्यांच्या नशिबी असतं.
मी पाहिलेल्या या चार खेचरांपैकी तिन जन एकदम शांतपणे चालत होते परंतु काळ्या शेपटाचं एक खेचर मात्र तो घोडा असल्याची जाणिव करून देत होता. आपण घोड्यासारखं दिसत असतानाही त्याला गाढवासारखं जिणं बहुदा पटत नसावं म्हणुनच पायात पायकुट असतानाही शेपटी उडवुन आणि फुर्रऽऽ, फुर्रर्रऽऽ असा आवाज काढुन पुर्ण ताकदीने तो पळण्याचा प्रयत्न करत होता पण पायातलं पायकुट त्याला अडथळा करत होतं. त्याच्या या प्रयत्नांना पाहुन मला खुप शिकायला मिळालं. आपल्याही आयुष्यात अशी विविध प्रकारची पायकुटं जिवणाच्या विविध टप्प्यांवर बांधली जातात. त्यातली काही पतंगासारखी असतात ज्या मुळे आपण उंच उडत असतो तर काही पायात बांधलेल्या दाव्यासारखी असतात ज्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नसतो.
पायात पायकुट असणं पण चांगलं आणि नसणं पण चांगलंच फक्त ते आयुष्याच्या कोणत्या टप्यावर असावं आणि नसावं हे ज्याला कळतं तोच खरा यशस्वी माणुस होतो.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० नोव्हेंबर २०१६
वळ : सकाळी ८ ते ९ वाजता

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...