Friday, November 25, 2016

| शेतमजुर ©

म्या हाय एक शेतमजुर, खाली दिसणारा ह्यो फुटु  माझाच हाय. म्या कोण हाय हे नाय सांगणार पर माझा ह्यो फुटु पांगरीच्या प्रा.विशाल गरड ह्यंनी काढलाय. दिसभर भटकंती करून ह्ये एक लाकडाचं ख्वाड घिऊन म्या आपलं सायकलीवर घरी निघालु व्हतु. घरात नुसतं सामान आसुन उपेग नाय त्याला शिजवायला जळानबी लागतया; म्हणुन यो आट्टाहास. आमच्या पांगरीच्या स्टॅण्डजवळ आल्यावर म्हागुन ईशाल सरांची गाडी आली आन त्यंनी माझा कधीनकाच फुटु काढला ह्ये कळलंच नाय. फकस्त पुढी गेल्यावर माझ्याकडं बगुन गालातल्या गालात हासत-हासत सलाम ठुकुन निघुन गेलं. म्या कोण हाय, काय करतो, कुठुन आलो आन् कुठं चाललोय ह्ये त्यांस्नी जराबी माहीत नाय तरीबी त्यंनी माझा फुटु काढुन माझ्यासारख्या मजुराला का बरं सलाम ठोकला आसलं ? कारण माझ्या आजवरच्या जगण्यात आसा सायकलवर सरपान न्हेताना कधीच कुणी फुटु नाय काढल्याला म्हणुन म्या जरा ईचारात पडलुया. जाऊद्या ! घरी लई कामं हायती पुन्ह्यांदा कधी भेटल्यावर ईचारिन मी त्यास्नी फुटु का काढला म्हणुन.
मित्रहो, हा संवाद जरी काल्पनिक असला तरी यातले शब्द मात्र त्या शेतमजुराच्या चेहऱ्याकडे मी क्षणभर टाकलेल्या कटाक्षातुन निर्माण झाले आहेत. नेहमीप्रमाणे आज काॅलेज सुटल्यानंतर पांगरीकडे येत असताना स्टॅण्डच्या अलीकडे, माळ्याच्या विहिरीपाशी एक शेतमजुर त्याच्या जुन्या सायकलवर एक लाकडी ओंडका आणि कुऱ्हाड घेऊन जाताना दिसला. दुपारची झोप त्याने कुठेतरी शेतात निवांत घेतली होती; हे त्याच्या पाठीला लागलेली मातीच सांगत होती. त्याच्या घरी गॅस नाही आणि ब्लॅकचे राॅकेल घ्यायला पैसेपण नाहीत हे तो लाकडाचा ओंडका सांगत होता, त्याच्याकडे मोबाईल नाही हे त्याचा फाटलेला खिसा सांगत होता, त्याच्याकडे गाडी नाही हे त्याची जुनी सायकल सांगत होती, गेल्या वर्षभरात त्याने कोणती खरेदी केली नाही हे त्याची झिजलेली चप्पल सांगत होती, सरपन गोळा करणे हेच त्याचे रोजचे जिने आहे हे त्या कुऱ्हाडीचा रूळलेला दांडा सांगत होता.
त्या शेतमजुराशी एकही शब्दाचा संवाद न साधता फक्त एका नजरेवरून मला दिसलेलं आणि ह्रदयाला भिडलेलं शब्दात उतरवलंय. खरंतर "एखाद्या व्यक्तीचे जगणे समजुन घ्यायला त्याच्याशी संवादच साधावा लागतो असे काही नाही. कधी-कधी त्याच्या कष्टाच्या निशाण्याच त्या व्यक्तीचं जिणं मांडतात फक्त त्या समजुन घेण्याची दृष्टी असली पाहीजे एवढंच."

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २५ नोव्हेंबर २०१६
सायंकाळी : ५ ते ६  वाजता

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...