Saturday, November 5, 2016

| भेट भैयासाहेबांची ©

धनेश्वरी मानव विकास मंडळाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॅ.प्रतापसिंह पाटील यांनी आज माझ्या पांगरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मनाने आणि विचाराने प्रचंड श्रीमंत असणारे भैयासाहेब हे परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री.वेदप्रकाशजी पाटील यांचे सुपुत्र तर परभणीचे आमदार राहुल पाटील यांचे थोरले बंधु आहेत. महाराष्ट्रासह परराज्यातही भैयासाहेबांची शेकडो शैक्षणिक संकुले उभी आहेत. राजकारणाचा आणि शिक्षणाचा प्रचंड मोठा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. गतवर्षीपासुनच आमची विचारांची नाळ जुळल्याने स्वतःचा मोठेपणा बाजुला सारून आज त्यांनी माझ्यासारख्या शब्दवेड्याची आवर्जुन भेट घेतली. त्यांच्या मनाचा हाच मोठेपणा कुणालाही जिंकु शकतो.
उंचपुरं रूबाबदार व्यक्तीमत्व, दमदार आवाज, विश्लेषणात्मक बोलणं, दिलखुलास हसणं आणि टाळी देऊन दाद देणं हे भैयासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे अलंकारच म्हणावे लागतील. याहुन विशेष आहे त्यांची शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटुंबियांप्रतिची आस्था. उंबऱ्याच्या आत पाऊल टाकल्यापासुन ते बाहेर पडेपर्यंत याच विषयावर आमची चर्चा झाली. "शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीतच परंतु युवकही जर आत्महत्या करायले तर देशाचे भविष्य धोक्यात येईल" असे ते म्हणाले. त्यांच्याच मतदार संघातील एका गावातील तब्बल दहा युवकांनी क्षुल्लक कारणावरूण आत्महत्या केली आहे. हि गोष्ट ऐकुण मन सुन्न झालं परंतु हि सगळी परिस्थिती फक्त बघत बसण्यापेक्षा त्या युवकांचे व शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी समाजप्रबोधनातुन प्रयत्न व्हायला हवा अशी ईच्छाही त्यांनी व्यक्त केली. आजवर मी प्रत्येक व्याख्यानातुन ह्या गोष्टी मांडत आलोय परंतु भैयासाहेबांसारख्या व्यक्तीने दिलेल्या अशा अभिप्रायामुळे भविष्यात ते आणखीन प्रकर्षाने मांडेन हे नक्की.
त्यांच्यामधली समाजसेवी वृत्ती मला भावली. फक्त भेट देऊन न थांबता एक सुंदर सामाजिक संदेश देणारी प्रतिमा देऊन आणि फेटा बांधुन त्यांनी माझा यथोचित सन्मान केला. आजवर शेकडो ठिकाणी माझे सत्कार झाले परंतु आमच्या निवासस्थानी येऊन सर्व कुटुंबीयांसमोर माझा सत्कार करणं हे माझ्यासाठीतर अविस्मरणीय होतंच; त्यासोबतच माझे आजोबा, वडील, चुलते, भाऊ यांच्यासाठीही ते अभिमानास्पद होतं. प्रदिर्घ चर्चेनंतर भैयासाहेबांनी माझं "ह्रदयांकित" हे पुस्तक स्विकारून प्राचार्य सतिश मातने आणि दत्तात्रय घावटे यांच्यासह आमचा निरोप घेऊन बार्शीकडे प्रयान केले. भैयासाहेबांच्या समाजकार्यास माझ्या लक्ष-लक्ष शुभेच्छा !
"जयास असे आपुला अभिमान
राखलाच पाहीजे तयाचा मान"

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ०५ नोव्हेंबर २०१६
वेळ : सकाळी ११ ते १२ वाजता

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...