Thursday, November 17, 2016

| सायकल ते मर्सिडीज ©

लहानपणी नववीपर्यंत माझ्याकडे सायकल नव्हती, पण भाडोत्री किंवा मित्राची सायकल मिळाली की ती हातात घेऊन पळवत न्यायची आणि थोडासा उतार दिसताच तोल सावरत सायकलच्या एका पायंडलवर उभा रहायचे; हि माझ्या ड्रायव्हिंगची मुहुर्तमेढ, पुढे नळीच्या आत पाय टाकुन हाफ पायंडल मग फुल पायंडल मग नळीवरून आणि मग अखेर सिटवर बसुन फुल पायंडेल अशा शृंखलांनी मी माझ्या आयुष्यातले पहिले वाहन शिकलो. आमच्या पांगरीच्या अंबिका सायकल मार्ट, श्रीगणेश सायकल मार्ट, दिपक सायकल मार्ट, वसिम सायकल मार्ट, जय भवानी सायकल मार्ट हि त्याकाळची अग्रेसर दुकाने. घरी आलेल्या पाहुण्यांनी जाताना एक रूपया हातावर टेकवला की पहिल्यांदा सायकलचे दुकान गाठुन तिथल्या रजिस्टर मध्ये नांव व वेळ लिहुन सायकल घ्यायची. एक तासापेक्षा जास्त वेळ होऊ नये म्हणुन त्याच दुकानातले घड्याळ बघायला चारदा चकरा मारायच्या. त्यात जर चुकुन सायकल पम्चर वगैरे झाली तर धर्मसंकट आल्यासारखेच वाटायचे कारण रूपयासोबत पम्चरचे तिन रूपये भरावे लागायचे. प्रत्येक दसऱ्याला अंबिका सायकल मार्ट मध्ये नवीन सायकली दाखल व्हायच्या, त्या नविन सायकली भाड्याने न्यायची खुप उत्सुकता असायची. त्यावेळेस आपल्या जवळच्या मित्राचेही असे एखादे सायकलचे दुकान असावे असे मनोमन वाटायचे. पुढे काही वर्षांनी निळुभाऊंनी श्रीगणेश सायकल मार्टची स्थापना केली. शाळा सुटल्यानंतर भाऊ त्यांच्या दुकानातील लहाण सायकलची चक्कर आवर्जुन द्यायचे सोबत त्यांच्या टपरीच्या काऊंटरवर असलेल्या थरमाॅकाॅलच्या बाॅक्स मधली स्नेहल पेप्सी काॅम्प्लीमेन्ट म्हणुन द्यायचे. कालांतराने अॅटलास सायकल ऐवजी रेंजर सायकली आल्या. गावातुन एखादी रेंजर घेऊन कोणी चालले तर ती न दिसेपर्यंत नजर हटत नव्हती; त्यात जर तिची चक्कर मिळाली मग तर दिवस एकदम जबरीच जायचा. पुढे हिच क्रेझ महाविद्यालयीन जिवनात दुचाकी गाडीबद्दल राहिली व नोकरी लागल्यानंतर चारचाकी आणि आता ब्रॅण्डेड गाड्यांपर्यंत येऊन पोहचली आहे. आपल्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचे आपल्याला नेहमीच आप्रुप असतं त्याला मी काय कुणीचं अपवाद नाही. माझ्या ड्रायव्हिंग क्रेझचा प्रवास एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर "हातातला ब्रेक पायात आला" एवढा साधा आणि सरळ आहे. ड्रायव्हिंगची वाहने जरी बदलली असली तरी त्यातुन मिळणारा आनंद अजुनही तोच आहे. आज मर्सिडीजच्या स्टेअरींगवर बसल्यावर पहिल्यांदा हातात पकडलेला सायकलचा हॅण्डल आठवला. "वर्तमानाच्या सुखात भुतकाळातली दैना आठवणे साहजिकच आहे परंतु यातुनच प्रेरणा घेऊन भविष्यकाळ श्रीमंत करण्याचे बळ मिळते."

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १७ नोव्हेंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...