Friday, November 4, 2016

| सायकलवरची ईडली ©

आज सकाळी नाष्ट्यासाठी पुणे स्टेशन जवळच्या एका रोडवर सायकलवरची ईडली खायला गेलतो. वीस रूपयाची ईडली खाता-खाता त्या आण्णाच्या निरिक्षणातुन बहुमुल्य विचार अनुभवायला मिळाला. एक सायकल, तिच्या हॅण्डलवर दोन डबे एक चटणीचा आणि एक सांबरचा. कॅरेजवर एक मोठे पातेले त्यात ईडल्या आणि मेंदुवडे, दोन पळ्या, कॅरेजच्या खाली आडकवलेली एक पिशवी; त्या पिशवीत प्लेटा आणि चमचे, सायकलच्या नळीला प्लेटा पुसायला बांधलेला एक रूमाल आणि सायकलच्या थोडे मागे प्लेटा धुण्यासाठी एक प्लॅस्टिकची बाटली. एवढ्या आयुधावर हे आण्णा सकाळी दोनच तासात दिवसभराचा धंदा करतात.
धंद्यासाठी खुप भांडवल लागते, चांगली जागा लागते, स्वच्छता लागते, सर्व्हिस लागते, मनपा ची परवाणगी लागते, गुंडांचे हफ्ते, या सर्व गोष्टींना फाट्यावर हाणुन ह्या आण्णांनी पदार्थाची गुणवत्ता आणि चव या एकाच निकषावर फाईव्ह स्टार हाॅटेलात जाणाऱ्यांना सुद्धा रस्त्यावर उभा राहुन खायला भाग पाडले. मीच नाही तर माझ्यासमवेत अनेक डाॅक्टर्स, इंजिनीअर्स, उद्योजक, नोकरदार मला इथे ईडलीवर ताव मारताना दिसले.
दहा-दहाच्या नोटांनी आण्णाचा खिसा गच्च भरलेला, तरीही त्यातच कोंबुन-कोंबुन त्या नोटा भरत होते. पैसे देणे घेणे आणि ईडली देणे घेणे या दोन्ही क्रिया जलद गतीने सुरू होत्या. "ए आण्णा सांबर डाल", "ए आण्णा थोडी चटणी डाल", "ए आण्णा कितना हुवा", "गडबड मत करो सबको मिलेगा", ए आण्णा इडली वडा मिक्स दे ना", "पार्सल बाद मे", "छुट्टे दे रे", "क्या आण्णा, आज ईडली खतम हो गया" अशा वाक्यांचा भडिमार पुन्हा पुन्हा रिपीट व्हायचा.
एकाच चमचाला शेकडो लोकांचे तोंड लागलेले असते, एकाच पाण्यात पुन्हा-पुन्हा त्या प्लेटा धुतलेल्या असतात, प्लेट पुसण्याचा टाॅवेल काळाकुट्ट पडलेला असतो, हजारो नोटा खिशात कोंबुन खिसा काळसर झालेला असतो त्यासोबतच त्या हातालाही काळपटपणा आलेला असतो, मळकट कपडे, वाढलेली दाढी, अस्वच्छ केस हे सगळं डोळ्यांना स्पष्ट दिसत असतानाही; माझा ईडलीवर ताव मारण्याचा मोह तसुभरही कमी झाला नाही. अस्वच्छतेच्या या चालत्या फिरत्या दुकानात रोज सकाळी ईडली खाऊन-खाऊन आपलं अर्ध आयुष्य काढलेली गिऱ्हाईकं आण्णाकडं आहेत. सकाळच्या नाष्ट्यासाठी लाखभर रूपये खर्च करणारी माणसे पुण्यात राहतात आणि चहाच्या किंमतीत सकाळचा नाष्टा भागवणारी माणसेही पुण्यातच राहतात फक्त सर्व्हिसचा इश्शु आहे पण दोघांची भुक मात्र एकच आहे.
मला इथे अस्वच्छतेचे समर्थन अजिबातच करायचे नाही; परंतु अस्वच्छतेच्या विळख्यात तयार झालेली आणि सर्व्ह केलेली स्वच्छ ईडली खाऊनही माणुस भुक भागवुन ताजा तवाना राहु शकतो बाकी सर्व मनाचे रोग आहेत.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : दिनांक : ०४ नोव्हेंबर २०१६
वेळ : सकाळी ८:०० वाजता (पुणे स्टेशन)

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...