Sunday, October 1, 2017

| पेपरात नांव ©

पेपरमध्ये आपलं नांव यावं असं मला लहाणपणी खुप वाटायचं. पण ते केव्हा व कसे येते हेच माहित नसायचे. वडील राजकारणात असल्याने त्यांचे नांव नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन पेपरात यायचे. साधारणतः सहा सात वर्षापुर्वीची हि गोष्ट एकदा जि.प. च्या निवडणुकीची आढावा बैठक आमच्या पांगरीच्या निलकंठेश्वर दुध डेअरीत ठेवली होती. तालुक्याच्या माजी आमदारांसह अनेक नेतेमंडळी व गांवपुढारी उपस्थित होते. मी पण वडीलांसोबत उपस्थित होतो. लहाणपणापासुन मला भाषणं ऐकायची फार आवड होती. त्यावेळेस व्याख्यानांचे वगैरे कार्यक्रम फार कमी असायचे तेव्हा राजकीय नेतेमंडळींचीच भाषणे ऐकुन हौस भागवायचो.
त्यादिवशी सर्वांनी भाषणे केली. मग मी पण स्वयंप्रेरणेने बोलायला उभा राहिलो. जसं जमलं तसं तोडक्या मोडक्या भाषेत पण निर्भिडपणे बोललो उपस्थितांनी टाळ्या वाजवुन दाद दिली. वडीलांनी आणि नेतेमंडळींनीही कौतुक केलं. त्या दिवशी मी खुप खुश होतो. खरंतर त्या दिवशी मला कोणी बोलवलं नव्हतं व कोणी बोल पण म्हणलं नव्हतं परंतु ज्यावेळेस मी उभा राहुन बोलाय लागलो तेव्हा कुणीच बस म्हणलं नाही. संधी सहजासहजी मिळत नसते ती मिळवावी लागते याची पहिल्यांदा प्रचिती आली. ईथुनच एक नवी प्रेरणा मिळाली वक्तृत्वाची.
अशा कार्यक्रमात बोलले की पेपर मध्ये नांव येत असतंय हे माहिती झालतं म्हणुन दुसऱ्या दिवशी स्टॅण्डवर जाऊन सगळं पेपर घेऊन आलो. मी आणलेल्या कोणत्याच पेपरमध्ये नांव नव्हतं आलं पण आमचं आण्णा "पुढारी" पेपर घेऊन आलं त्यातली बातमी वाचली आणि पेपरात माझं नाव बघुन खुप आनंद झाला. "विशाल गरड यांनी मनोगत व्यक्त केले" हिच ती माझ्या आयुष्यातली पहिली लाईन जी पेपरात छापुन आली होती. आणि माझं नांव पेपरात छापणारा पहिला पत्रकार म्हणजेच गणेश गोडसे. आज त्यांचा वाढदिवस म्हणुनच जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटल्याने हा शब्दप्रपंच.
आजतागायत पेपरात छापलेल्या माझ्या बातम्यांच्या कात्रणांनी तीन फाईली भरल्या आहेत परंतु आजही पहिल्याच पानावर गणेश गोडसेंनी लावलेली ती बातमी पाहिली कि हि आठवन ताजी होते. हॅप्पी बर्थडे अॅण्ड थँक्स गणेशराव.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक  : ०१ ऑक्टोबर २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...