Friday, April 13, 2018

| रेप ©

काल काश्मिरमध्ये असिफा या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मिळून केलेल्या बलात्काराची बातमी समजली आणि माणूस जातीत जन्म घेतल्याचीच लाज वाटू लागली. हा प्रकार जानेवारी महिण्यात घडला असुन अद्याप त्या नराधमांना शिक्षा झाली नाही उलट काही लोक त्याचे समर्थन करत आहेत. त्या अत्याचार करणाऱ्यांचा निषेध नोंदवायला बस्स माझ्याकडे एवढेच शब्द आहेत कारण अशा माणसावर थुंकणे म्हणजे थुंकण्याचा अपमान आहे, त्यांच्या अंगावर विष्ठा टाकणे हा त्या विष्ठेचा अपमान आहे, अशांना जनावरांची उपमा देणे हा जनावरांचा अपमान आहे. जनावरं माणसापेक्षा हजार पटीने संयमी असतात कारण मादीने माज केल्यावरच ती उडतात पण मानवाने मात्र या बाबतीत जनावराला केव्हाच मागे टाकलंय. असिफासारख्या चिमुकल्या जिवाकडे बघताना या लिंगपिसाट नराधमांची लिंग उठतातच कशी ? चांगलं चुंगलं खाऊनही या मानवी शरिरात हे नासकं वीर्य उत्पन्न होतेच कसे ? अशा लोकांच्या अंडाशयातल्या गोट्या ठेचुन काढायला हव्यात. अशा प्रकारच्या अत्याचाराचा विकार डोक्यात येणाऱ्या मेंदुचा खिमा करून गिधाडांना खायला टाकायला हवा. जिवंतपणीच यांच्या अंगावरची चामडी काढुन हे नागडे देह तळपत्या उन्ह्यात पशु पक्षांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकायला हवेत. अशा लोकांचे मांस खाताना त्या पशुपक्षांनाही उल्टी येईल एवढा वाईट विचारांचा वास त्या नरदेहातुन सुटलेला असेल.

निसर्गाने असिफाला दिलेलं निरागस सौदर्य या नराधमांनी झाडाची कोवळी कळी हुंगुन, तिच्या कोवळ्या पाकळ्या कुस्करून चिरडुन टाकाव्या तसं तोडुन टाकलंय. अशा कित्येक असिफा रोज चिरडल्या मुरडल्या जात आहेत. कोपर्डीच्या घटनेतल्या आरोपींनाही फक्त फाशी करार दिलेला आहे पण अजुनही ते श्वास घेत आहेत. जेव्हा मदतीचे सर्व रस्ते संपतात तेव्हा हात जोडुन आपण देवाकडे न्याय मागतो पण ईथेतर देवासमोरच अत्याचार झालाय आता न्याय मागायचा कुणाला. अत्याचारी बलात्कारी नरधमांना या वाईट कृत्यानंतरही श्वास घेण्याची परवाणगी देणाऱ्या मंद न्यायव्यवस्थेचा विजय असो.

कोणाचे गं कोणाचे सुंदर डोळे कोणाचे
त्या पाण्यातील माशाचे कि माझ्या बाळाचे ?

या शेवटच्या दोन ओळी लिहिताना हुंदका आलाय मोठा. अश्रूंचे दोन थेंब मोबाईलच्या स्क्रिनवर पडलेत ते पुसत पुसत लिहितोय, कारण पुन्हा अशी गोंडस असिफा कुण्या लांडग्यांची शिकार होऊ नये म्हणून.

#JusticeForAsifa #HangTheRapist #Asifa_bano

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ एप्रिल २०१८



Thursday, April 5, 2018

| माझी आय ©

आवं म्या कुठला बीजी माझ्यापरीस तर माझी आय जास्त बीजी हाय. घरातली समदी काम करता-करता पार झाक पडती पण हिजी कामं काय उरकत न्हायती. हिला निवांत बोलायचं म्हणलं की एकतर भाकऱ्या थापताना न्हायतर भांडी घासताना. आजबी आमच्या हौदापशी आय भांडी घासत व्हती आन् म्या आपलं गप्पा मारीत व्हतो त्येज्यातच फुटू काढायल्यालं बघून आयनं दोन खमंग डायलाॅग मारलं. "आरंय ! तस्लं काय फुटू काढतोच रं, बाप शिव्याच घालीन तुला", "चांगली साडी चुळी घातल्यावर कुठं जातुस रं" तरीबी म्या तसंच दोन फ्लॅश मारलं. आव मी कुठला आलोय साहित्यिक माझी आय आसल्या पाच पन्नास पुस्तकांचा आर्क एका वाक्यात सांगत अस्तीया. मी तर सायन्स ग्रॅज्युएट माणुस है पण आर्टची डिग्री म्या ह्याच चुलीम्होरच्या ईद्यापीठातुन घेतल्याली हाय. कामाला लईच खंबीर खट्ट हाय माझी आय. तीज्या पोटातुन आल्याचा मईंदाळ आभिमान वाटतंय मला म्हणुनच तर एकाच टायमात बहुआघाड्यावर काम करायची हिम्मत ठिवतो म्या. ती तसलं प्रेरणा, ईन्सिपीरीशन वगैरे घ्ययला लईमटी पुस्तकं नाय मी वाचत बसत फकस्त आईकडं काम करताना बघीतलं की दहा हात्तीच बळ येतंय आपसुक.
लई लई लई मजी लईच काम केलंय माझ्या आय ना आजवर आन् आजुनबी करतीया. तीला माझ्यापाठी आजुन एक दोन पोरं पायजे व्हती पण पोरीच झाल्या; तरी नाय काय वाईट वाटून घेतलं तीनं उलट सारखं म्हणायची "आसुंदे ! ईकुलता एकच हाय माझा ईस्ल्या; तरीबी चार पाच पोरांच्या बरूबरीचं नांव कमवील". खरंच हाय की तीचं, म्या हाय ईकुलता एक पण आता माजी आय सांगत आस्ती समद्यास्नी की; माझं एक पोरगं माईकवर बोलतंय, दुसरं चित्र काढतंय, तिसरं लेखक हाय आन् चौथं कवीता करतंय. बास की आजुन काय पायजेल. पोरं किती हायती ह्ये नाय महत्वाचं ती काय हायती आन् काय करत्याती हे जास्त महत्वाचं हाय, आसं मी नाय माझी आय म्हणतीया.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ एप्रिल २०१८

| दूध ©

आज सकाळी लवकर काॅलेजला निघालो होतो. उक्कडगांवचा ओढा ओलांडला तोच एका गाईच्या गोठ्याशेजारी दोन लहान मुलं गाडीला टेकून कुत्र्याच्या पिलाजवळ थांबलेली दिसली. रस्त्यानी धावणारी गाडी बघून चवताळून मागे लागणारी कुत्री त्या लेकरांपाशी मात्र शेपटी हलवत उभी होती. मी गाडी थांबवून त्यांचा फोटो घेतला. कुत्रीची पिल्ली दूध पिण्यासाठी तिच्या सडावर तुटून पडली होती. हे दृष्य पाहत उभी असलेली ती लहान पोरं कुत्रीच्या अंगावरून हात फिरवत उभी होती. गावरान लेकरं असल्याने ते धाडस आपसुकच असतं त्यांच्यात. मी पोरांना त्यांची नावे विचारल्यावर जरा लाजत आळुखे पिळुखे घेत त्यातला एक जण बोलला "मी बप्प्या हाय आन् हि सार्थक, पप्पासोबत दूध प्ययला आलाव लानात" अशा बोबड्या स्वरात त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तेवढ्यात धार काढून त्या मुलांचे वडील गाडीजवळ आले. मग मी त्यांना विचारले. का हो रोज आणता का यांना शेतात ? तेव्हा ते म्हणाले "येत्याती रोज म्हागं लागून निरसं दूध प्यायला" एकिकडे गाईचं निरसं दूध पिण्यासाठी ही ईवलीशी पोरं रोज वडीलांच्या मागे लागून शेतात येतात तर दुसरीकडे काही लेकरं दिवसाची सुरूवात कोल्ड्रींक्स आणि मॅगी खाऊन करतात. युवा पिढी तंदुरूस्त करायची असेल तर आजमितीला दूधासारखं दुसरं टाॅनिक नाही. लेकरांमध्ये आईचे दूध पितानाची सवय कालांतराने गाईचे दूध पिण्यात बदलते आणि मग नंतर तीही तुटुन जाते. लहानपणी दूध पिण्यासाठी आईमागे धावणारी लेकरं मोठी झाल्यानंतर मात्र यांनाच दूध पाजण्यासाठी आईलाच दूधाचा ग्लास हातात घेऊन यांच्या मागे पळावं लागतं हे दुर्देवच म्हणावे लागेल. एकिकडे शीतपेय कंपण्यांनी भंपक जाहिराती दाखवून युवापिढीला ताबडं विष पाजण्यासाठी शर्तीचे प्रयत्न लावले आहेत. अशातच ग्रामिण संस्कृतित मात्र दुधाचा संस्कार अजुनही टिकून असल्याचे पाहून समाधान वाटले.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ एप्रिल २०१८

Wednesday, April 4, 2018

| रामभऊ ©

आज घरी निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात आमच्या वाड्यातल्या दरवाजाजवळ उभा राहुन कुणीतरी आवाज दिला. वहिनी दादा हायतं का ? मी उठुन पाहिलं तर आमच्या पेठेतलं रामभाऊ कदम उर्फ भऊ व्हतं. घरात आल्या आल्या आमच्या आईला म्हणलं "लई दिसं झालं दादाला भिटुन तवा मनलं कसं हायतं ती बगावं म्हणुनशीन आलुया". एवढ्या आपुलकीने ख्याली खुशाली बघायला आलेल्या भऊला पाहुण मला खुप कौतुक वाटलं. आमचे दादा घरी नसल्याने भऊ लगेच निघाले होते पण मीच थांबवून घेतले व चहाचा आग्रह केला. काही वेळात दादापण आले मग ढाळजत निवांत तक्क्याला टेकुन भऊ, आमचं दादा आणि मी जुन्या आठवणीत बुडून गेलो. भऊंनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे. अंगावर मळकं धोतर, सदरा आणि टोपी परंतु मन अगदी स्पटीकासारखं स्वच्छ आणि निर्मळ. भऊला मी लहान असल्यापासुन बघतोय. हा माणूस मला कधीच निवांत बसलेला दिसला नाही सतत काही ना काही काम. परंतु आज या वयातही हाताची आणि पोटाची गाठ घालण्यासाठी दुसऱ्याच्यात साल काढत आहेत. त्यांच्या आजवरच्या आयुष्यातली दोन वर्ष त्यांनी आमच्यातही पन्नास पैसे रोजाने काढलीत. त्याची जाणिव ते विसरले नाहीत. आज सुद्धा घरी आल्यावर मालक असं, मालक तसं असे माझ्याशी बोलत होते. त्यांच्याकडुन मालक हा शब्द ऐकताना खुप कसनुसं वाटत होतं मला. "भऊ, मला मालक नका म्हणू मी तुमच्या नातवासारखा आहे" असे कित्येकदा विनवूनही भऊचं आपलं बोलणं चालूच होतं. माझे वडील लहान असताना आमच्या शेतात काम केलेले भऊ आजही जर आम्हाला ईतका आदर देऊन बोलत असतील तर या जाणिवेला काय म्हणावे समजत नाही. म्हणूनच या अशा माणसांच्या नावाअधी प्रामाणिक, जिव्हाळ्याची, प्रेमळ, आपुलकीची हि असली सगळी विशेषणं मातीमोलं वाटावी एवढ्या उच्च प्रतीचे प्रेम ती व्यक्त करतात.
भऊला एकुण तेरा मुलंबाळं झाली त्यापैकी आज फक्त दोन मुली हयात आहेत. मुलगा नसल्याने नवरा बायको दोघेही रोजंदारी करून जगत आहेत. जुन्या सर्वेत त्यांचे दारिद्र्य रेषेत नाव नसल्याने घरकुलाचे खरे हक्कदार असतानाही शासनाच्या भंपक सर्वेमुळे ते वंचित आहेत. "मालक, आमास्नी शीती नाय, शिक्षाण नाय आन् कुणाचा आधारबी नाय पण पांडुरंग रोज चतकोर भाकरीची सोयं करतोय", "हात पाय चालतंय तवर राबायचं मेल्यावर कोल्हं न्हिऊ नायतर लांडगं कुणी बगीतलंय" अक्षरशः काळजात धस्स व्हावं असे त्यांचे शब्द काळजात खोलवर रूतत होते. वंशाला दिवा का पाहिजे याचे उत्तर भऊंच्या बोलण्यातून सतत अधोरेखीत होत होते. घरादाराची परिस्थिती अतिशय गरिब असतानाही आमच्या गल्लीतली गौराईची परंपरा त्यांनी आजवर समर्थपणे जोपासली आहे. त्यांच्या पश्च्यात ती सुद्धा नामशेष होईल. मला नेहमी गरिबीत जगणारी अशी श्रीमंत माणसं शोधण्याची सवय आहे आजही बऱ्याच दिवसांनी भऊंसोबत बोलायला मिळाले हे खरं तरं माझंच भाग्य समजतो. "भऊ, कधी काय गरज पडली तर नक्की या माझ्याकडं आय एम प्राऊड ऑफ यु". यातलं अर्धच वाक्य समजलं असल त्यांना परंतु एक गोड हास्य माझ्या पदरी टाकून हातातली बॅटरी सुरू करून भऊंनी उंबरा ओलांडला. ते गेल्यानंतर कितीतरी वेळ मी आणि दादा भऊंच्या आपुलकीचं आणि माणुसचीचं कौतुक करत होतो. खरंच हि नुसती माणसं नसुन ग्रामिण जिंदगीतले खरे रिअल हिरो आहेत. आजही असे कित्येक रामभाऊ आपल्या अवती भवती कष्ट करत आहेत. गरज आहे फक्त त्यांना आपलं म्हणण्याची.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ एप्रिल २०१८



गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...