Thursday, April 5, 2018

| दूध ©

आज सकाळी लवकर काॅलेजला निघालो होतो. उक्कडगांवचा ओढा ओलांडला तोच एका गाईच्या गोठ्याशेजारी दोन लहान मुलं गाडीला टेकून कुत्र्याच्या पिलाजवळ थांबलेली दिसली. रस्त्यानी धावणारी गाडी बघून चवताळून मागे लागणारी कुत्री त्या लेकरांपाशी मात्र शेपटी हलवत उभी होती. मी गाडी थांबवून त्यांचा फोटो घेतला. कुत्रीची पिल्ली दूध पिण्यासाठी तिच्या सडावर तुटून पडली होती. हे दृष्य पाहत उभी असलेली ती लहान पोरं कुत्रीच्या अंगावरून हात फिरवत उभी होती. गावरान लेकरं असल्याने ते धाडस आपसुकच असतं त्यांच्यात. मी पोरांना त्यांची नावे विचारल्यावर जरा लाजत आळुखे पिळुखे घेत त्यातला एक जण बोलला "मी बप्प्या हाय आन् हि सार्थक, पप्पासोबत दूध प्ययला आलाव लानात" अशा बोबड्या स्वरात त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तेवढ्यात धार काढून त्या मुलांचे वडील गाडीजवळ आले. मग मी त्यांना विचारले. का हो रोज आणता का यांना शेतात ? तेव्हा ते म्हणाले "येत्याती रोज म्हागं लागून निरसं दूध प्यायला" एकिकडे गाईचं निरसं दूध पिण्यासाठी ही ईवलीशी पोरं रोज वडीलांच्या मागे लागून शेतात येतात तर दुसरीकडे काही लेकरं दिवसाची सुरूवात कोल्ड्रींक्स आणि मॅगी खाऊन करतात. युवा पिढी तंदुरूस्त करायची असेल तर आजमितीला दूधासारखं दुसरं टाॅनिक नाही. लेकरांमध्ये आईचे दूध पितानाची सवय कालांतराने गाईचे दूध पिण्यात बदलते आणि मग नंतर तीही तुटुन जाते. लहानपणी दूध पिण्यासाठी आईमागे धावणारी लेकरं मोठी झाल्यानंतर मात्र यांनाच दूध पाजण्यासाठी आईलाच दूधाचा ग्लास हातात घेऊन यांच्या मागे पळावं लागतं हे दुर्देवच म्हणावे लागेल. एकिकडे शीतपेय कंपण्यांनी भंपक जाहिराती दाखवून युवापिढीला ताबडं विष पाजण्यासाठी शर्तीचे प्रयत्न लावले आहेत. अशातच ग्रामिण संस्कृतित मात्र दुधाचा संस्कार अजुनही टिकून असल्याचे पाहून समाधान वाटले.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ एप्रिल २०१८

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...