Thursday, September 6, 2018

डोंगरातला संसार

रोजच्यागत काॅलेज सुटल्यावर घरी निघालो. डोंगरवाटच्या कडंला खडकावर बसुन निवांत गप्पा मारताना नाना आन् काकी दिसल्या. रस्त्यानं जाताना रामराम घालत जायच्या सवयीमुळं समदी शेतकरी वळखत्यात मला. सकाळ संध्याकाळ नानाच्या कोट्यापसुनच माझ्या काॅलेजचा रस्ता जातुय त्यज्यामुळं कोट्यावर न्हायतर मग गुरं राखताना डोंगरात नानाची भेट हामखास आस्ती. पण आज सांच्यापारी नानाला काकीसोबत गप्पा मारताना बगून जरा लांबूनच ह्यो फोटू काडला.

ह्या वयातही संसाराचा आनंद घेत पिरतमीच्या हिरव्यागार गालीचावर बसुन बायकुसोबत निवांत येळ घालिवताना बघून भारी वाटलं. माजा संसार सुरू हुन ईन बीन दहा पंदरा दिस झाल्यात पण संसाराची चाळीशी पुर्ण हुनबी नाना आन् काकीच्या संसारातला गोडवा कनभरबी कमी नाय झाला हे शिकण्यासारखं वाटलं. बायकु साथ देणारी मिळाली तर माणसाच्या कर्तृत्वाचा येग दुप्पटच व्हतो मग ते नौकरीत आसु, धंद्यात आसु न्हायतर शेतात. संसारातला आनंद घ्यायला लय मोठ्ठा बंगला, ईम्पोर्टेड गाडी, फाईव्ह स्टार रेस्टाॅरंटच असाव असं काय बी नस्तय. गवताचा गालीचा, स्वच्छ खडक, आभाळाचा छत आणि मंद वाहणारा रानवारा आसला की डोंगरातल्या रोमॅन्सला सुद्धा सेवन स्टारचा दर्जा मिळतुय.

फोटो काढल्यानंतर त्यंच्याजवळ जाऊन म्या ईच्चारलं "काय नाना काय चाल्यात गप्पा मालकीनीसोबत" तेवढ्यात नाना म्हणलं "आवं काय नाय, हि आपलं रोजचंच शेतातलं आमचं काय नवीन आस्नाराय, तेवढ्यात काकी म्हणल्या "आवं ती आज कडबा न्ह्याल्ता ईकायला बाजारात चांगला भाव मिळाला म्हणून सांगत व्हतं". काकीचं हे बोलनं ऐकुन खरंच शेतकरी केवढ्याशा गोष्टीचा किती मोठा आनंद घेत आस्तो ह्यची जाणिव झाली. पोटच्या लेकरागत संबाळलेल्या धानाला जवा बाजारात चांगला भाव मिळतो तवा हरएक शेतकरी आसाच आनंदी व्हतो.

नानाला कडबा ईकुन मिळाल्यालं पैसं एकांद्या नोकरदाराच्या फक्त एका दिसाच्या पगारी हितकंच आस्त्यालं पण त्यातुन मिळाल्यालं समाधान महिण्याभराच्या पगारी एवढं मोठ्ठ हाय. कारण सुख मिळिवण्यासाठी लय पैसं आसावं लागत्यात आसं नाय; तर मिळाल्याल्या पैशात समाधानी आसनं जास्त महत्वाचं आस्तंय हे जरी खरी आसलं तरी पण दुःख ह्यजंच जास्त हाय की बाजारात शेतमालाला कवडीमोल भाव मिळूनबी तिवढुशा भावातच बळजब्रीनं समाधानी राहायची जणु सवयच शेतकऱ्याला लागली हाय. त्याच्यामागचं हे ईगीन कधी संपायचं कुणास्ठाव ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०६ सप्टेंबर २०१८



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...