Sunday, September 9, 2018

आमचा बैलपोळा ©

सकाळी लवकर उठून आण्णांनी (चुलते) आणून ठेवलेले बेगड कागद वारनेस वापरून गाई म्हशींच्या शिंगांना चिकटवायचे, आबा (चुलते) सोबत आदल्या दिवशी खांदे मळणी करायची. दादा (वडील) आपल्या बैलालापण ढाल घ्या की असा आग्रह करायचा आणि पोळ्यादिवशी पांगरीच्या कारी चौकातुन घरापर्यंत गाई आणि बैलं वाजवीत आणायचो. मग बापू (आजोबा) त्यांच्या पहाडी आवाजात मंगळअष्टीका म्हणायचे; मी परात हातात घेऊन चौर चौर चांगभले...पौस आला चांगभले असे म्हणत वाजवायचो. हे सगळं उरकलं की मारूतीच्या देवळाजवळ जाऊन नारळ खायला थांबायचो आणि ईथून पुढंच आमचा खरा पोळा सुरू व्हायचा.

गल्लीतली पाच पंचवीस लेकरं त्या देवळाच्या कडेला शड्डू ठोकून उभा राहायचो. कोण किती नारळ घेतो याची जणु स्पर्धाच लागायची. वाद्यांचा आवाज कानावर पडला की भाया सारून तयारच रहायचोत. नारळ फोडणारा शेतकरी त्याच्या बैलांवरून ओवाळून थेट देवळाच्या भिंतीवर भिंगारायचा. नारळाचे असंख्य तुकडे ईतरत्र पडायचे त्यातल्या एका तुकड्यासाठी एकाच्या बोकांडी एक पडुन वेचण्याचा प्रयत्न करायचो. कधी कधी कोपरं आणि गुडघं फुटायचं पण नारळाचा एक तुकडा सापडला की ते दुःख विझून जायचं. त्यावेळेस जास्त नारळ फोडणारा, धष्टपुष्ट बैलं असलेला, त्यांच्या शिंगावर ढाल लावलेला शेतकरी आम्हाला अंबानी एवढा श्रीमंत वाटायचा.

रात्रीच्या वेळी काही हौशी शेतकरी बैलांपुढं नाचायला बायका आणायची तर कुणी बार्शीहुन मोठ्ठं बॅण्ड आणायची. कुणी एका वासरापुढंच वाजंत्री लावायची तर कुणी बैलांना ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत घालुन मिरवणूक काढायची. शेतकऱ्याची ही हौस बघून खुप अभिमान वाटायचा. "आपुणबी मोठ्ठ झाल्यावर श्रीमंत शेतकरी होऊन लय नारळ फोडायचं असं वाटायचं" पण मोठ्ठ झाल्यावर शेतकऱ्याच्या जगण्याचं वास्तव समजलं आणि उगांच मोठं झाल्याची खंत वाटली. आज खतांचे भाव आभाळाला भिडले, शेतमालाला भाव नाही, दुधाची किंमत पाण्याहून कमी, पेंड,कळणा,सुग्रास जणु काजू बदाम वाटायले आणि शेण काढू काढूच त्यांचे कोपरं फुटायले अशा परिस्थितीतही आपला शेतकरी बैल पोळा साजरा करतोय स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गुराढोरांला घास भरवतोय.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ सप्टेंबर २०१८



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...