Monday, July 27, 2020

माझी पहिली डॉलर कमाई

मागच्या महिन्यात अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळासाठी मी ऑनलाईन व्याख्यान दिले होते. आज त्यांनी त्या व्याख्यानाचे स्वेच्छा मानधन पाठवले. हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा डॉलर मध्ये मिळालेलं बक्षीस आहे. लहानपणी अमेरिकेची नोट जरी कुणाकडे असली तरी ती बघायची प्रचंड उत्सुकता असायची. मी शाळेत असताना आमच्या एका नातेवाईकांकडून मिळालेली ती नोट मी कुतूहल म्हणून पाकिटाच्या आत जपून ठेवली होती. ती आजही तशीच आहे. फक्त वक्तृत्वाच्या जोरावर कधी डॉलर मिळतील अशी अपेक्षा केली नव्हती. भविष्यात अजून डॉलर कमवेल पण आज मिळालेल्या या पहिल्या डॉलर्सचा आनंद आयुष्यभर स्मरणात राहील. तसेच या डॉलरपेक्षा पांगरी सारख्या खेडेगावात बसून हे डॉलर देणारी माणसे कमवू शकलो याचा अभिमान वाटतोय.

आर्थिक विवंचना कुणाला नसते. या लॉकडाऊनमध्ये मलाही ती भासली. आमचे संस्थाध्यक्ष सोनवणे सर आणि काही मित्रांच्या मदतीमुळे अशा लॉकडाऊनच्या काळातही "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" हे पुस्तक छापू शकलो अन्यथा ही खर्चिक गोष्ट अशक्य होती. आपले काम प्रामाणिक आणि लोकहिताचे असेल तर नियती मदत आपोआप पोहोचवते म्हणतात ते खरे आहे. डॉलर स्वरूपात मिळालेली मानधनाची रक्कम आता मला पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापायला उपयोगी पडेल. भविष्यात जेव्हा माझ्या पुस्तकाच्या सर्व प्रति विकतील तेव्हा त्यातून मिळालेली नफ्याची संपुर्ण रक्कम विविध उपक्रमांतर्गत पुन्हा समाजालाच द्यायची आहे ही मी स्वतःच स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे जी आजवर पाळत आलोय आणि पुढेही पाळली राहील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०

Sunday, July 26, 2020

गोष्ट एका लॉकडाऊनची

शहरातील एका झोपडीवजा घरात राहणारा एक माणूस, घरात खाणारी सात तोंडं त्याच्या स्वतःसह बायको, म्हातारे आई वडील आणि दोन मुली व एक मुलगा. घरात कामावणारा हा एकटाच माणूस. रोज सकाळी एखाद्या भाकरीत मोकळी भाजी बांधून रोजगाराच्या शोधात चौकात उभा राहायचे. मिळेल त्या कामावर रोजंदारी करून दिवसाकाठी ३०० रुपये कमवायचे. मागच्या लॉकडाऊनमध्ये घरात होते ते सगळे संपले. आई वडिलांच्या औषधांच्या खर्चासह रोज किमान ५०० रुपये लागतात त्याला घर चालवायला पण सध्या वजाबाकीत सुरू आहे त्याचा संसार. कसे बसे दिवस काढून तो सोमवारपासून पुन्हा कुठेतरी काम करून तोंडाची आणि पोटाची भेट घालू इच्छित होता. दहा दिवसांच्या लॉक डाऊन आजच संपला होता म्हणून सकाळी लवकर उठून तो डब्बा घेऊन बाहेर पडला. तेवढ्यात शेजारच्या बंगल्यातील एका पोराने सोशल मिडियावर स्थानिक पत्रकारांनी टाकलेला प्रशासनाचा आजचा निर्णय वाचला आणि लगेच एका मित्राला कॉल करून बोलू लागला "काय यार, अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढवला राव" सगळ्या वेबसिरिझ बघून झाल्या, साऊथचे आणि हॉलिवूडचे तीन चार डझन पिक्चर बघून झाले, रोज नवनवीन पदार्थ ट्राय करून पण आता कंटाळा आलाय बाबा, आता नवीन काय बघावे याचे टेन्शन आलंय राव. लंय बोरिंग जाणार यार अजून पाच दिवस" कामाच्या आशेने हातात डबा घेऊन चाललेला तो माणूस त्या पोराचे बोलणे ऐकून तसाच माघारी घरी जातो. लेकरं विचारत होती पप्पा माघारी का आलाव ? मोकळ्या सिलेंडरवर रचलेल्या सरपणातली दोन लाकडं चुलीत घालत बायकोने शेवटचे तांदूळ शिजायला टाकले. म्हातारे वडील पाकिटातली शेवटची गोळी थर थरत्या हाताने बाहेर काढत होते. हातातला डबा खाली ठेवून डेऱ्यातले घोटभर पाणी पिऊन तो उत्तरला "अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढलाय" हे ऐकून पुढचे पाच दहा मिनिटे कुणीच कुणाला बोलले नाही. बायको डब्याकडे, लेकरं चुलीकडे आणि वडील गोळ्याच्या पाकिटाकडे एकटक बघत राहिले. त्या भयाण शांततेत शेजारच्या घरातील टीव्हीचा आवाज येत होता. "लॉकडाऊन मध्ये सेलिब्रिटी त्यांचा वेळ घरी कसा घालवत आहेत ते बघा." खरंतर मला एक सुंदर शॉर्ट फिल्म तयार करता आली असती या गोष्टीवर पण मी काय दाखवतो यापेक्षा हा लेख वाचताना तुमच्या डोळ्यासमोर जे उभा राहते ते मला जास्त महत्वाचे वाटते म्हणून हे लिखाण तुमच्यासोबत शेअर केले.

लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०

Friday, July 24, 2020

पुस्तक प्रकाशनाची संकल्पना

आजपर्यंत माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशन सोहळ्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आलोय. सर्वसामान्यांना प्रकाशनाचा मान देत आलोय, माझ्या मेंदूत शिजलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत आलोय; त्याला हा प्रकाशन सोहळा तरी कसा अपवाद ठरेल. "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय खूपच भन्नाट, प्रेरणादायी आणि तितकाच आल्हाददायी सुद्धा. लॉकडाऊनमुळे इच्छा असतानाही तुम्हाला आमंत्रित करू शकत नाही. हो पण २५ जुलैला सकाळी झालेला हा प्रकाशनाचा सोहळा मी दृकश्राव्य माध्यमात कैद करून त्याचदिवशी संध्याकाळी तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करेल. माझ्या यू ट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर तुम्ही या प्रकाशनाची चित्रफीत अवश्य पाहा. 

#व्हय_मलाबी_लेखक_व्हायचंय
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ जुलै २०२०

Wednesday, July 22, 2020

पाण्याचं सोनं करणारी 'सोनाली'

फोटोतल्या मागच्या ब्याकग्राऊंडवर जाऊ नका माझ्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव कोरणारी महाराष्ट्राची सुकन्या आणि माझी मैत्रीण सोनाली पाटील. ही एक जागतिक दर्जाची 'जलतज्ञ' आहे. तिने जल संवादक म्हणून जलसाक्षरता मोहीम सुरू केली. प्रवास शाश्वत विकासासाठी या प्रकल्पांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. डेन्मार्क येथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल टॅलेंट म्हणुन जगभरातून तिची निवड करण्यात आली. तिला युनायटेड नेशनचे पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी प्रशस्तीपत्रक मिळाले असून आजवर तिने इस्राएल मध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलंय तर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये धरण आणि पाणी पुनर्वापर प्रकल्पावर काम केले आहे. युरोप, नेपाळ, सिंगापूर येथे 'पाणी' या विषयावर  तिचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. ती सध्या पाणी आणि जागतिक हवामान बदल यावर पी.एच.डी करत आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात ती त्यांच्या टेंभुर्णी नजिकच्या शेतात राहतेय हे समजताच अरविंद आणि हनुमंतसह फोर्डमध्ये थेट तिचे शेत गाठले. जाण्याआधी अपॉइंटमेंट मागितली कारण आमची याआधीची भेट होऊन जवळ जवळ पाच वर्षे उलटली होती पण कर्तृत्वाचे उंच शिखर गाठूनही ती मात्र तशीच होती. म्हणाली "अरे ये रे केव्हाही अल्वेस वेलकम" देश विदेशात फिरलेल्या, अनेक पुरस्कार मिळवलेल्या, अशा प्रचंड हुशार मैत्रिणीला आपण केव्हाही भेटू शकतो हा मैत्रीला लाभलेला आपुलकीचा पुरस्कारच असतो. आयुर्वेदावरही तिचा अभ्यास तगडा आहे. तिच्या सोबत आपण जेवढा वेळ घालवू तेवढा वेळ आपणही शाश्वत विचार करायला लागतो हे माझ्या अनुभवातून सांगतो. बाकी आम्ही घरी गेल्यावर सोनूच्या माँ ने केलेल्या आदरातिथ्याने भारावून गेलो.

बऱ्याच वर्षांनी आज तिची भेट झाली. आम्ही बोलताना वारुळातून मुंग्यांची झुंड निघावी तशा नवनवीन कल्पना सोनूच्या मेंदूतून निघत होत्या. अशा व्यक्तिमत्वासोबतच तास दोन तासांची भेट म्हणजे संबंधित विषयातल्या पाच पन्नास पुस्तकांची उजळणी असते. सोनालीचे वडील भारत पाटील हे निवृत्त डि.वाय.एस.पी असून रिटायरमेंट नंतर त्यांनी गावाकडे सेंद्रिय शेतीवर मोठे काम उभारले आहे. सोनाली सुद्धा वडिलांकडून शेतीचे धडे घेता घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन सस्टेनेबल इंडिया या प्रोजेक्टवर काम करत आहे. ती करोडोची मालकीण आहे पण करोडो रुपये देऊनही मिळवता येणार नाही एवढा डाऊन टू अर्थ तिचा स्वभाव आहे. तिचे विचार गावकुसात जन्म घेऊन चंद्रावर जाणाऱ्या मुलीचे प्रतिनिधित्व करतात. भारतातल्या एक टक्के पोरींनी जरी सोनालीला फॉलो केले तरी प्रचंड मोठे कार्य घडू शकते. 

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०

पुस्तकाला आहे यांची प्रस्तावना

प्रस्तावना म्हणजे जणू पुस्तकाचा आरसा, व्यक्तिमत्व विकासावर आधारित पुस्तक लिहिलंय म्हणल्यावर त्याला प्रस्तावना सुद्धा तितक्याच ताकदीच्या व्यक्तिमत्वाची हवी. पुस्तक लिहितानाच एक नाव डोळ्यासमोर होते ते म्हणजे सचिन अतकरे. आजवर सोशल मिडियावर या माझ्या दोस्ताचे थेट काळजातून पाझरलेले लिखाण मी वाचत आलोय. पाणी फौंडेशन, कोल्हापूरचा पूर आणि आता कोरोना कालखंडात त्याने त्याच्या लेखणीतून समाजाला सकारात्मकतेचे सलाईन लावण्याचे काम केले. 

मी हट्ट धरल्यावर तो मला नाही म्हणूच शकत नव्हता याची खात्री होती मला. वुई विल हेल्प च्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदत करण्याच्या आणि त्याच्या ऑफिसच्या व्यस्त कामातून वेळ काढून सचिनने पुस्तकाचा अर्क काढलेली सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. सच्या, याबद्दल तुझे आभार वगैरे काही नाही बरं कारण अजून सोबत राहून खूप काम करायचंय आपल्याला. हम्म बाकी पुस्तकात छापलेल्या तुझ्या शब्दांना मात्र मनापासून धन्यवाद. तुझ्या प्रस्तावनेने 'व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय' या पुस्तकाचे वजन वाढले. या आमच्या सचिनची पुस्तकाच्या पीचवरची अकरापानी खेळी अवश्य वाचा.

#व्हय_मलाबी_लेखक _व्हायचंय
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०


Monday, July 20, 2020

माझं नवीन पुस्तक

खरं तर हे पुस्तक लिहिणे म्हणजे एक दिव्यच होते. लिहायला बसल्यावर पहिले दहा बारा दिवस तर नेमकी सुरवात कशी करावी आणि शेवट कसा करावा हाच विचार करण्यात गेले. मग स्वतःच्या अनुभवात जरा डोकावून पाहिले तेव्हा खरी मेख इथेच सापडली, पेन उचलला आणि लिहीत गेलो. हजारो लाखो जनांचे हे स्वप्न साकार होईल असं काहीतरी शाश्वत, अभ्यासपूर्ण तरीही तितकंच सहज,सोपे आणि थोडक्यात लिहायचे; असे गेली खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होते. अखेर लॉकडाऊनचा सदुपयोग करून मिळालेला वेळ पुस्तक लेखनात सार्थकी लावला आणि माझेही ते स्वप्न पूर्ण झाले.

हे पुस्तक वाचण्याची तुमची इच्छा आणि पुस्तकाचे प्रकाशन यात जास्त अंतर न ठेवता या जुलै महिना अखेरपर्यंत ते तुमच्यापर्यंत 'सुरक्षित' पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आजवर जो प्रतिसाद तुम्ही माझ्या ह्रदयांकित, रिंदगुड आणि मुलूखगिरी या पुस्तकांना दिला त्यापेक्षा जास्त प्रतिसाद "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" या पुस्तकाला द्याल याची खात्री आहे. अतिशयोक्ती नाही पण तितकं दर्जेदार झालंय म्हणून म्हणतोय. बाकी पुस्तकाला प्रस्तावना कुणाची ? त्याचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ कसे ? त्याची किंमत किती ? प्रकाशन केव्हा ? कुठे ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरेही लवकरच देईन तूर्तास माझ्या कुंचल्यातून साकारलेली ही पुस्तकाच्या शिर्षकाची कॅलिग्राफी; डोस्क्यात फिट्ट करून ठेवा !

लेखक : प्रा.विशाल गरड

Wednesday, July 15, 2020

वडाची कत्तल

४०० वर्ष जुने झाड जर रस्ता करण्यासाठी आडवे येत असेल तर आपली झक दुसरीकडून मारावी ना. झाड तोडणे हाच एक पर्याय असतो का ? नका राव एवढे निष्ठुर होऊ, लॉकडाऊनमुळे आम्हा पर्यावरण प्रेमींना आंदोलन उभा करता येणार नसल्याचा असा फायदा घेऊ नका. मला मिळालेल्या माहितीनुसार वन्य जीव कायद्याने सदर झाडाला राष्ट्रीय संपती जाहीर केली आहे तरीही एका महामार्गासाठी आता या झाडाचा खून होणार आहे किंवा केलाही असेल कदाचित.

प्रशासनाला त्यांची रस्ते बांधणी कला एवढीच दाखवायची असेल तर उड्डाणपूल बांधा त्या झाडावरून, जगात नाव होईल तुमचे. असेही सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आलेल्या पैशातूनच होतात ही विकासकामे. मग टेंडर काढल्यापासून ते रोड होईपर्यंत कुणाला किती पैसे मिळतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. हे रस्ते बनवण्यात सर्व्हिस कमी अर्थकारणच जास्त असते. तेव्हा काय पोटभर खायचे ते खावा बाबांनो, पण त्या झाडाला तेवढं जीवदान द्या. काय आहे ना; त्याला बिचाऱ्याला ४०० वर्षापूर्वी माहीत नव्हते ओ की पुढे चालून आपण रस्ता करायला अडचण करणार म्हणून नाहीतर ते उगवलंच नसतं की.

आम्ही म्हणत नाहीत एकही झाड तोडू नका. शेवटी विकासकामे करताना ते शक्यही नाही पण निदान महाकाय वृक्ष तरी वाचवत चला. हल्ली रस्ते सुद्धा खरच लोकांच्या सोयीसाठी की नेते व अधिकाऱ्यांनी त्या रोडच्या कडेला घेतलेल्या जमिनीचे भाव वाढवण्यासाठी होतात ? याचीच शंका वाटते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या माननीय पर्यावरण मंत्र्यांनी 'जनता गॅरेज' चित्रपटातील तामिळ हिरो एन.टी.आर सारखी एन्ट्री मारून हे झाड वाचवायला हवे असे मला वाटते. खुर्ची चार दिवसाची पाहुनी असते पण जर तेवढ्यात सुद्धा अशी काही धाडसी कामे केली की लोक तुम्हाला खुर्ची गेल्यावरही लक्ष्यात ठेवतात. 

गेल्या ४०० वर्षात त्या गावातल्या दहा बारा पिढ्या या झाडाखाली खेळल्या असतील. करोडो आठवणींचे हे जिवंत दैवत असेल. करोडो रुपयांचा ऑक्सिजन फुकटात दिला असेल तसेच करोडो पक्ष्यांनी जन्म घेतला असेल याचा फांद्यांवर पण अरे माणसा ! तुला तुझ्या गाड्या प्रदूषण करीत करीत न्यायच्यात ना मोठ्या रस्त्यावरून मग त्यापुढे हे झाड किस खेत की मुली. "हे वटवृक्षा आम्हाला माफ कर, सध्यातरी तुझ्यासाठी हे चार शब्द लिहिण्याशिवाय दुसरं काहीच काही करू शकत नाहीत आम्ही, पण या शब्दांना जर भाले फुटले तर मात्र तू नक्कीच वाचशील याची खात्री आहे. वाचलास तर एक दिवस नक्की येईल तुझ्या सावलीतला धन्यवाद स्विकारायला नाहीतर इथूनच जड अंत:करणाने तुला भावपुर्ण श्रद्धांजली.

झाडाचा पत्ता.
मु.पो.भोसे, ता. मिरज, जि.सांगली.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १५ जुलै २०२०

Saturday, July 11, 2020

वडाचं पिल्लू

माझ्या घराम्होरं एक मोठ्ठ वडाचं झाड हाय, तवा डोस्क्यात ईच्चार आला की आपुण तर आपलं वंश तयार करतुय पण ईतकी वरीस झालं आजुन ह्यजा वंश तयार नाय म्हणूनच मग या झाडाचं पिल्लू रानात न्हिऊन लावायसाठी त्या मोठ्ठ्या झाडाची ही फांदी तुडुन आणलीया. माझा धाकला भाऊ युवराज आन् म्या सकाळच्यापारीच ह्यो खेळ मांडलाय. चांगला दोनफुट खोल खड्डा खांदुन त्यात शेण आणि पालापाचोळा टाकुन ही फांदी लावून टाकली. आळं करून त्यात पाणी वत्ताना जणू रडणारं लिकरू आईचं दुध तोंडाला लागलं की जसं गप पडतंय तसंच आमच्या वडाचं ही पिल्लूबी खड्ड्यात गेलं की गप झालं. बाळाला जसं टकुचं आस्तय नव तसंच ह्या फांदीच्या डोक्यावर शेणाचं टकुचं बशिवलंय. लय आनंद झालाय आज आमचं झाड डिलीवरी झालंय.

आईबरूबर लेकराचं रक्ताचं नातं आस्तंय जणू, या लेकराला त्येज्या आईच्या पोटातुन बाहीर काढताना म्या पाहिलंय ते रगात. आरं कोण म्हणतंय झाडांला रगात नसतंय आवं अस्तंय की, वडाच्या झाडातुन निघणारं पांढरं चिकाट रगात हाताला लागल्यावर निघता निघत नाय. हेच रगात या फांदीला मातीसंग लवकर चिटकीवतंय. लका आपला वंश वाढावा, नांव चालावं, खांदान टिकावं म्हणुन किती जिवाचं रान करताव आपुण मंग या झाडांलाबी त्यो आधिकार हायच की, नुसतं फांद्या लावून येणारी झाडं आशी वांझ ठिऊ नगासा. तुमच्याबी घराजवळ, पटांगणात न्हायतर रानात जर आसंल एकांदं वडाचं न्हायतर पिपळाचं झाड तर त्या झाडाचा वंश नक्की वाढवा.

जगात ह्येज्यापेक्षा भारी ईकान कोण्चंच नाय, आवं कुठल्या आणल्यात्या बंदुकी आन बाॅम्ब. ही एक वडाची फांदी हजारो वरीस जगण्याचं सामर्थ्य ठिवती फकस्त तीला चिटाकणं गरजेचं हाय. जगातली समदी क्षेपणास्र माणसं मारायसाठी बनिवल्याती पण हे माझ्या हातातलं ईकान मातुर माणसं जगिवण्यासाठी तयार केलंय निसर्गानं. लहानपणी खोट्या बंदुकी हातात घिऊन लयंदा ढिश्क्यांव - ढिश्क्यांव खेळलोय पर आता समजतंय त्येज्यापरिस ह्ये अशा फांद्या तुडुन जर मातीत लावायचा खेळ खेळला आस्ता तर आतापतुर एक बारंकं जंगल तयार झालं आस्तं. जाऊंद्या आता माझ्या पुरीला म्या झाडं लावायचा खेळ शिकवीन. जे आपल्याला नाय जमलं ते आपल्या लेकरांकडून जमवून घ्येयचं ह्यालाच तर संस्कार म्हणत्यात ना. बरं ह्यो फुटू काय मज्जा म्हणुन नाय काढला ह्ये वरी ल्हिवल्यालं समदं सांगायचं व्हतं तुम्हास्नी म्हणुन केला हा अट्टाहास. वडाच्या पिल्ल्यासोबतचा ह्यो फुटू आन् त्या फुटू मागचा ईच्चार जर तुम्हास्नीबी आवडला तर जाऊंद्याकी ही पोस्ट लांबपतूर. होऊंद्या एक शेअर पिल्लू के नाम.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ जुलै २०२०


Wednesday, July 8, 2020

राजगृह

पुस्तके नाही वाचली की दगडं हातात येतात. आपल्या हातात दगडे उचलण्याची वेळ येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी पुस्तकाचे घर उभा केले. बाहेरून दगडे मारणार्यांनी आत जाऊन त्या राजगृहातले एखादे पुस्तक जरी वाचले असते तरी जगण्याची दिशा सापडली असती पण साला तुमचा मेंदूच सडका होता त्याला कोण काय करणार. आज बाबासाहेब असते तर म्हणले असते "अरे एवढ्याशा दगडांनी काय होणार आहे, जावा आणखीन मोठं मोठी दगडे घेऊन या त्या सगळ्यांना एकत्र करून मी अजून एक पुस्तकांचे घर बांधीन तुमच्या लेकरांसाठी, जे वाचून ते शिक्षित आणि सुसंस्कृत होतील आणि मग तुमच्यासारखे हे असे हल्ले करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही" अरे माथेफिरूंनो दगडांनी पुस्तके फुटत नसतात रे. राजगृहवरील हल्ल्याचा निषेध.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड

सॅनिटरी पॅड

औरंगाबादची माझी मैत्रीण ऍड. निकिता गोरे ही नेहमीच सामाजिक संवेदनशील विषय हाताळत असते. समाजातील वंचित आणि दुर्लभ घटकांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल तिला विशेष आकर्षण आहे. अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबांना ती नेहमीच भेटत असते आणि त्यांना आनंद देण्याचा तिच्यापरीने प्रयत्न करत असते. आजचा हा लेख तिने घेतलेल्या निर्णयास पाठबळ म्हणून लिहित आहे. तिने उचललेला हा मुद्दा आईचा मुलगा म्हणून, बायकोचा नवरा म्हणून, बहिणीचा भाऊ म्हणून, मुलीचा बाप म्हणून, प्रेयसीचा प्रियकर म्हणून सर्वांनीच पुढे न्यायला हवा. अर्थात तो आहेच तितका महत्वाचा. वरवर सहज दिसणाऱ्या या गोष्टी खोलवर खूप मोठी जखम होऊन बसल्यात. स्त्रियांच्या या अडचणीसाठी फक्त काही स्त्रियांनीच नाही तर तिच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येकानेच सोडवायला हव्यात.

लॉक डाऊन ४.० मध्ये शहराकडून खेड्याकडे जाणाऱ्या मोलमजुरी करून खाणाऱ्या स्त्रिया जेव्हा पायपीट करत होत्या तेव्हा जिथे दोन घासांची सोय व्हायची पंचाईत तिथे मासिक पाळीसाठीचे नॅपकीन मिळणे तर मुश्किल होते. "मासिक पाळीच्या रक्ताचे थेंब पायावरून जमिनीवर ओघळत असतानाही कडेवर लेकरू आणि डोक्यावर बिऱ्हाड घेऊन चालणारी स्त्री पाहिली की काळजात धस्स होतं." ज्यांच्या खिशात दहा रुपये असतील त्यांनी वीस रुपयांचे पॅड घ्यायचे का दहा रुपयांची थाळी घ्यायची ? पोटाचे भागेलही पण पोटाखालच्या गोष्टींचे काय ? त्यातही कुणी फडके सोबत घेऊन निघाले असतील तरी रस्त्यावर आडोसा मिळणेही मुश्किल होते, स्वच्छतेसाठी तांब्याभर पाणी तरी कुठे होते ?

हे विदारक दृष्य पाहिल्यानेच निकिता मधली एक सृजनशील स्त्री जागी झाली आणि तिने याबद्दल कायमस्वरूपाचा उपाय शोधायचं ठरवलं. खरंतर मध्यंतरी या विषयावर ती नेहमीच माझ्याशी बोलायची मी देखील शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तिच्या विचारांचे खूप कौतुक वाटले. स्त्रियांबद्दल आपल्याला आस्था वाटणे हे फक्त बोलण्यापूरतेच मर्यादित न ठेवता तिने त्यासाठी संविधानाची शक्ती वापरून कायदाच करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ऍड. निकिता गोरे आणि ऍड. वैष्णवी घोळवे या आपल्या भगिनींनी ऍड. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे.

"सॅनिटरी नॅपकिन्सना अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या सेक्शन २(अ) मध्ये समाविष्ट करून रेशनिंग दुकानांमध्ये अत्यावश्यक वस्तूंसोबत पुरवठा करण्याचे आदेश मिळावेत" 
अशा स्वरूपाची ही याचिका सत्तर टक्के गरिब लोक राहत असलेल्या देशात अत्यंत गरजेची वाटते. आपल्या देशात दरवर्षी १,२२,८४४ स्त्रियांना गर्भ पिशवीचा कॅन्सर होतो. यातल्या बहुतांशी स्त्रियांना कॅन्सर होण्याचे मुख्य कारण हे पाळीच्या वेळेस झालेला संसर्गामुळे आहे. सॅनिटरी नॅपकिन्स बनवणाऱ्या कंपन्यांनी बाजार मांडलाय. टिव्हीवर जाहिरातींचा भडिमार सुरू आहे पण त्या पॅड वापरूनही इन्फेक्शन झाल्याच्या घटना भरपूर आहेत. यासंबंधीत चित्रपट देखील करोडोची कमाई करून गेले पण जोपर्यंत सामान्यातील सामान्य स्त्रीपर्यंत 'मेन्स्ट्रुअल हायजिन' बाबत जनजागृती होत नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाहीत.

आपण प्रत्येकजण स्त्रीच्या गर्भात निर्माण झालो आहोत. आईच्या दुधाचे पांग फेडण्याच्या गोष्टी आपण खूपवेळा ऐकल्या असतील पण या बिलाला समर्थन देऊन फक्त आईच्या दुधाचेच नाही तर आईच्या उदराचे सुद्धा पांग फिटतील. चला तर मग तिच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी आपण लढूया आणि तिला जिंकवूया. ऍड. निकिता गोरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेचे मी समर्थन करतो.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ८ जुलै २०२०

Friday, July 3, 2020

घुंगरं शांत झाली

आत्ताच सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि डोळ्यासमोर त्यांच्या हजारो गाण्यांच्या छबी उमटायला लागल्या. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी सुमारे दोन हजारहून जास्त गाण्यांची नृत्य बसवली. नव्वदच्या दशकातील सर्व गाजलेल्या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांचेच. माधुरी दिक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय ते दिपीका पादुकोण पर्यंतच्या जवळ जवळ सर्वच अभेनेत्रींना सरोजजीनी नृत्य शिकवले. आपल्याला फक्त पडद्यावर नाचणाऱ्या हिरोईन दिसायच्या पण त्यांना नृत्य शिकवणारी खरी हिरोईन आज आपल्यातून निघून गेली. सरोज दिदींनी भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे. जसे क्रिकेट म्हणले की सचिन, अभिनय म्हणले की अमिताभ, आणि संगीत म्हणले की लता तसंच नृत्य दिग्दर्शन म्हणलं की सरोज हे नाव अधोरेखित होत होते.

एक दो तीन (तेजाब), हवा हवा ई (मी.इंडिया), हमको आज कल है इंतजार (सैलाब), डोला रे डोला (देवदास), तम्मा तम्मा लोगे (थाणेदार), धक धक करने लगा (बेटा), चोली के पिछे (खलनायक), ये ईश्क हाये (जब वुई मेट), बरसो रे (गुरू), ताल से ताल मिला (ताल), राधा कैसे ने जले (लगान) मेरा पिया घर आया (याराना) ही सर्व गाणी आणि यातली नृत्य एक इतिहास आहे आणि तो घडवलेली नृत्य विरांगना म्हणजेच सरोज खान होय. कधी कधी पडद्यामागच्या काही कलाकारांची फक्त नावे घेतली की फारसे लक्ष्यात येत नाही पण त्यांच्या कलाकृती दाखवल्या की त्यांचे डोंगराएवढे कार्य समोर उभा राहते म्हणूनच वरील गाणी मी मुद्दाम इथे नमूद केली.

त्यांनी बसवलेली एक गाण्याची स्टेप भारतातील करोडो मुले मुली स्नेहसंमेलनात सादर करायचे, सहज सुंदर आणि सोपा पण तितकाच काळजाला भिडणारा नृत्य प्रकार सरोजजीनी उदयास आणला. अंगा पिंडाने जाड असतानाही नृत्य शिकवताना त्यांच्या शरीराची होणारी हालचाल गवताच्या पात्यासारखी असायची. सरोज दिदींची आणि माझी काही ओळख नव्हती पण त्यांच्या नृत्याची नक्कीच होती. आज या रंगभूमीवरील त्यांची घुंगरे जरी शांत झाली असतील तरी त्या घुंगरातून निर्माण झालेला आवाज प्रत्येकाच्या कानात सदैव गुंजत राहील. सरोज दिदींना भावपुर्ण श्रद्धांजली.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३ जुलै २०२०


Wednesday, July 1, 2020

चालतफिरत

आज लय दिसातून काॅलेजहून उक्कडगांवपस्तोर चालत आलो. म्हागटलं चार दोन पौस निब्बार झाल्यामुळं नद्या उगं खळखळा वाह्य लागल्यात्या. काल माझी फोर्डची सर्व्हिशींग करायला लातूरला गेल्तो. गाडीला रानडुक्कराची धडक झाल्यामुळं ते येशीचा चेंबर का काय म्हणत्यात ते फुटला व्हता. लाॅकडाऊनमुळं शोरूममदीबी ते पार्ट नव्हतं; मंग काय पुन्ह्यांदा हेल्पाटा मारन्यापेक्षा जवा येत्याल तवा बसवा म्हणून मी बाहीर पडलो पण गावाकडं ययची पंचायत झाली. मग प्रा.उतके सरांकडं मुक्काम करून आज सकाळी आमचं संस्थाध्यक्ष सोनवणे सरांच्या इंपोर्टेड  स्कोडा गाडीत उक्कडगांवच्या काॅलेजपर्यंत आलो. आता काॅलेजपसुन घरापर्यंतचं आंतर आठ एक किलुमिटर हाय तवा म्हणलं कुठं कणाला बुलवीत बसा जाऊ चालत बीगी बीगी. पाटील सर सोडायला येतो म्हणत व्हतं पण त्यंलाबी म्हणलं जातो चलत. तसंबी रोज चार किलोमिटर चलायची सवय हायचं म्हणा. सर लैच अट्टाहास  करायलं म्हणुनशान मग माझा भाऊ रूपेशला फोन केला आन् म्हणलं "ये उक्कडगांवपस्तोर, तवर मी येतो तिथपर्यंत चालत. आल्यावर नदीच्या पल्याडंच थांब."

माझ्या घरापसुन ती काॅलेजपर्यंतचा रस्ता म्हंजी निसर्गानं ऊगं लय मन लावून तयार केलेली एक भारी कलाकृतीच जणू. आख्खं 'रिंदगुड' हे पुस्तक ह्या रोडवरून गाडीवर जाता येता दिसलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींवर लिव्हलंय म्या. ह्यज्या आदीबी म्या लैंदा आस्लं आनुभव लिव्हल्यातं पण आज चालत येताना निसर्गाच्या कुशीत फिरता फिरता डोळ्याचं पारणं फिटावं एवढं भारी वाटलं. गर्द हिरव्या झाडीतुन सावलीच्या आंधारात झाकल्याल्या पाऊल वाटंवरून चलताना पक्षी, प्राणी, किटक बघत बघतच पावलं टाकत व्हतो. हातात एक पिशवी व्हती पण पुस्तकाच्या वझ्यानं तेचाबी मदीच बंद तुटला. मंग काय हातातच पस्तकं घिऊन माझी आपली पायपीट चालू झाली. रस्त्यानं येणारं जाणारं वळकीचं समदं शेतकरी लय आपुलकीनं ईचारायचं "आवं सर, आज चलत का गाडी कुठं हाय ? यिऊ का सोडायला न्हायतर ह्योका घिऊन जावा ही गाडी". "न्हाय ! मुद्दामंच चाललोय चालत, घरून बुलीवलंय भावाला यिलच ह्येवढ्यात."

गावाजवळच्या नदीवर आल्यावर मातर म्या पॅन्ट वर सारली, चप्पला एका हातात आन् पुस्तकं दुसऱ्या  हातात घिऊन शेवाळल्याल्या दगडावर दबकत दबकत पाय ठिवत खळखळा वाहणाऱ्या पाण्यातुन चालू लागलो. खरंच आस्ला आनुभंव शेवटचा कधी घेतला हे आठवत सुदा नव्हतं. लहानपणी ही कसरंत रोजची वाटायची पण आता गाड्या घोड्यामुळं ही आसली जिंदगी जगायलाच मिळत नाही. समदी आपली त्या येळंसोबत शिवनापाणी खेळत्याती आन् त्येज्याच नादात निसर्गाच्या हातात हात घालून जगण्याला मुकत्याती. म्या मातर हे आस्लं जिनं सारखं जगण्याचा प्रयत्न करत आस्तोय. मनाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचा चटका लावला की ते आपोआप आसल्या गोष्टी आपल्याकडुन करून घेतंय.

जगातली सगळी सुखं निसर्खानं आपल्याउशाला ठिवल्याती पण साला आपुन सुख कशात हुडकतांव हिच समजत नाही. अनवानी पायानं वाहत्या वड्यात चालताना त्या गुळगीळीत दगडांचा तळपायाला झाल्याला स्पर्श पार मेंदुला ताजातवाना करत व्हता. खरंतर चालतानाच आज काहीतरी ल्ह्ययचंय हे ठरीवलं व्हतं पण सोबत फुटूबी तेवढाच जिवंत पायजे व्हता मग काय नदीच्या पल्याड यीऊन थांबलेल्या रूपड्याला ह्यो फुटी टिपाया लावला त्यंनंबी नेमका टिपला म्हणुनंच माझं लिखाण ह्या फुटूला डिक्टो मॅच झालं. पुढं गाडीवर बसायच्या आधी जवळंच आसल्याल्या कोरड्या दगडांवर बसुन दुनी पाय पाण्यात सुडुन, डोळे मिटुन वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज ऐकत तल्लीन झालो. दिवसभरातला सगळा तान तनाव वाहूण गेला. मन स्वच्छ आणि शद्ध झालं त्याच वाहत्या पाण्यासारखं. अंतरंग तर धुतलंच व्हतं, घरी आल्यावर हात पाय तोंड धुवून बाह्यअंग पण धुतलं. चहाचा फुरका घेत घेत आजचा हा अनुभव टायपीत बसलो. सरतेशेवटी निसर्गासाठी जशा किड्या, मुंग्या, पशु, पक्षी तसाच माणुससुद्धा तेव्हा आपण लावलेले सगळे शोध एकदा खुटीला टांगुण त्या मातीला पायाचा स्पर्श करून बघा लय जब्राट ताकद हाय यात.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १ जुलै २०२०

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...