Monday, August 31, 2020

कोरोना अंगावर काढू नका

१) ताप, खोकला अंगावर काढू नका. जर तसे केले तर विषाणूचा संसर्ग थेट फुफ्फुसापर्यंत जाईल आणि श्वास घ्यायला त्रास होईल. ग्रामीण भागातील लोक नेहमीचा सर्दी खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करित आहेत.

२) खोकला सुरू झाला की विलगिकरण पाळा, तोंडाला मास्क आणि हातावर सॅनिटायझरची सक्ती करून घ्या ज्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही.

३) तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार नाही. सध्या सगळीकडेच भयानक परिस्थिती आहे. सर्व कोविड सेंटर हाऊसफुल्ल आहेत. ही वेळ येऊच नये म्हणून खबरदारी घ्या.

४) तुम्हाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडेल इथपर्यंत परिस्थिती बिघडू देऊ नका. नेहमीचा खोकला आणि फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे येणारा खोकला यात फरक असतो तो वेळीच समजून घ्या.

५) तुमची रॅपिड कोरोना चाचणी निगेटीव्ह अली आहे पण तरीही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तीन दिवस क्वारँटाइन होऊन RT-PCR स्व्याबच्या रिपोर्टची वाट बघत न बसता तात्काळ डॉक्टरच्या सल्ल्याने HRCT Of Lungs हा एक्सरे काढा या द्वारे अचूक निदान होते.

६) HRCT मध्ये जर निमोनिया किंवा कोविड संसर्ग आहे असे समजले तर तात्काळ ऍडमिट होऊन उपचार सुरू करा तुम्ही दहा दिवसात बरे व्हाल. अन्यथा दिर्घकाळ व्हेंटिलेटरवर राहावे लागेल.

७) आत्ताच्या परिस्थितीत प्रत्येक गावात किमान दोन ऑक्सिजन बेडची गरज आहे. हिवाळी अधिवेशनात असा एखादा ठराव होणे अत्यंत महत्वाचे आहे.

८) जर योग्य वेळी उपचार मिळाला नाही तर जगातली सगळी संपत्ती सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि जर वेळेत खबरदारी घेतली तर अवघ्या दहा दिवसांच्या कोविड ट्रिटमेंटने तुम्ही ठणठणीत बरे व्हाल.

९) वेळेत खबरदारी घेतली तर स्वतःला वाचवू शकता जर का वेळ घालवली तर मृत्यूशी भेट होईल. विचार करा, काळजी घेऊनच बाहेर पडा, लक्षणे दिसताच डॉक्टरशी संपर्क साधा. जान है तो जहान है 

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३१ ऑगस्ट २०२०

Saturday, August 29, 2020

इंगित प्राॅडक्शन

माझा जन्म अनेक गोष्टी करण्यासाठी झाला आहे. आजवर मी जे जे काही केले त्या सर्व कालाप्रकारांना तुम्ही प्रेम दिलंय. व्याख्याने, बॉलपेन चित्र, पुस्तके, कविता, कॅलिग्राफीज या माध्यमातून मी व्यक्त होत आलोय. हे सगळे करत असताना माझ्याकडून आणखीन एक अपेक्षा तुम्ही सतत ठेवत आलात. तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मी इंगित प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या बॅनरची प्रत्येक कलाकृती तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज असेल. आजपर्यंत माझ्या डोक्यातल्या कल्पना माईकवर बोललोय, कागदावर लिहिल्यात, चित्रात उतरवल्यात पण आता सज्ज झालोय त्या पडद्यावर साकारण्यासाठी. तूर्तास 'इंगित' लक्ष्यात ठेवा, बाकी काळजावर कोरले जाईल याची गॅरंटी देतो.

काही गोष्टी आपण स्वतः ठरवून करत असतो तर काही गोष्टी समाज आपल्यातला हुनर ओळखून करायला भाग पाडत असतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला चित्रपट निर्मितीत पाऊल टाकायला प्रवृत्त करणारे तुम्हीच आहात. पुस्तकांच्या प्रोमोशनसाठी व्हिडीओच्या माध्यमातून भन्नाट संकल्पना राबवत राबवत हा प्रवास चित्रपट निर्मितीपर्यंत येईल असे कधी वाटले नव्हते पण कदाचित नियतीला माझ्या डोक्यातून काहीतरी उपसून मोठ्या पडद्यावर उमटवायची खुमखुमी आली असावी म्हणूनच इंगितच्या निर्मितीचा विचार माझ्या डोक्यात घातला असावा पण ते काहीही असो आता इंगित एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ठिणगी तर पडलीच आहे यावर फक्त तुमच्या प्रेमाची फुंकर टाकत राहा. हा पेटलेला निखारा कधीच विझणार नाही.

विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्राॅडक्शन

Ingit Films
Ingit Production
Ingit Entertainment

Thursday, August 27, 2020

अखेरचा हा तुला दंडवत

दिनांक २० ऑगस्ट रोजी माझे आजोबा तुकाराम गरड उर्फ बापू यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. बापूचे असे आमच्यातून निघून जाणे प्रचंड वेदनादायी होते. नातवाचा पहिला दोस्त आजोबा असतो. लहानपणी आमच्या लाडशेतातून घरी येताना बापू मला खांद्यावर बसवायचे. मी त्यांच्या डोक्याला घट्ट पकडून खांद्यावर दोन्ही पाय सोडून ऐटीत बसायचो. माझे ओझे खांद्यावर घेतलेल्या बापूंच्या पार्थिवास खांदा देताना त्या ओझ्याची आठवण झाली. बापूसोबतच्या माझ्या गेल्या ३२ वर्षाच्या आठवणी काही शब्दात व्यक्त करणे कठीणच. बाहेरून कुठूनही आलो की ढळजेत बसलेले बापू लगेच विचारपूस करायचे पण आता घराच्या उंबऱ्यात पाऊल टाकताच समोर दिसणारी बापुची रिकामी जागा सदैव त्यांची आठवण करून देत राहील.

आमच्या वाड्यातिल ढाळजेत तक्क्याला रेलून बसून खलबत्त्यात पान कुटतानाचे बापू आता पुन्हा दिसणार नाहीत, मी दूर व्याख्यानास गेलो की "अरे बघ की फोन लावून कुठवर आलाय" असे आमच्या दादांना म्हणणारे बापू पुन्हा दिसणार नाहीत, सकाळी लवकर उठून अंघोळ अष्टमी आटोपून पाणी पिऊन ढाळजेकडे जाताना दमदार आवाज टाकून "ए चहा आण रे" असे म्हणणारा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही, गावातील कोणत्याही लग्नातली त्यांच्या वरच्या पट्टीतली मंगलअष्टका पुन्हा कानावर पडणार नाही, श्रीराम नवमीच्या सप्ताहचे नियोजन करताना, भजन म्हणताना बापू दिसणार नाहीत. बहिणीच्या लेकरांसोबत लहानात लहान होऊन खेळणारे बापू पुन्हा दिसणार नाहीत आणि आम्हा कुटुंबियांची प्रचंड काळजी करणारे बापू आमच्यात इथून पुढे असणार नाहीत   हा विचार डोळ्यातील पाणी बाहेर पडायला प्रवृत्त करतोय.

आमच्या खांदानात सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी हातात माईक पकडला असेल तर तो बापूंनी. हजारो लग्नात मंगलाष्टके गायले त्यांनी. भजनात  किर्तनात त्यांचा आवाज वरच्या पट्टीत लागायचा. मला पकवाज शिकवला बापूंनी. बापू म्हणजे जुन्या नातेवाईकांची एक डिक्शनरी होते. खूप खूप जुन्या आठवणी, गावाबद्दलच्या त्यांच्या काळातीळ राजकीय आणि सामाजिक ठळक गोष्टी, संत तुकारामांची गाथा, भारताच्या १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्याची सकाळ, फाळणीचा काळ हे सगळं मला बापूंच्या तोंडून अनुभवायला मिळाले. बापू अतिशय समृद्ध आयुष्य जगले. पोराची राजकीय कारकिर्द आणि नातवाची प्रबोधनाची कारकीर्द ते पाहू शकले. माझ्या पोरीचे तोंड पाहून तिच्या चेहऱ्यावरून फिरवलेला त्यांचा मायेचा हात सदैव स्मरणात राहील.

माणूस जन्म घेतो तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेला असतो फक्त तो केव्हा असतो हे माहीत नसते म्हणूनच आपण आनंदात जगत असतो. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा मृत्यूपासून तो किती वर्षे वाचला हेच खरे वास्तव असते. म्हातारपणाच्या कसल्याही वेदना बापूंना झाल्या नाहीत, अखेरच्या दिवसापर्यंत त्यांना हाताला धरून न्यावे लागले नाही, काठी असायची हातात पण ती सुद्धा जमिनीवर न टेकवता रुबाबात हातात धरून चालायचे आमचे बापू. त्यांच्या आवाजातला करारीपणा, चालण्यातला ताठपणा नाहीच कधी विसरणार. "बापू, तुमचा पान कुटायचा खलबत्ता, गळ्यातली तुळशीमाळ, हातातली अंगठी, पेपर वाचायचा चष्मा, तुमचं छाटन आणि सदरा हे सगळं साहित्य तुमच्या स्मृती म्हणून जपलं जाईल जेव्हा कधी तुमची आठवण येईल तेव्हा या वस्तूत तुम्ही दिसाल. बापू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम केलं त्याही पेक्षा जास्त प्रेम तुम्ही आम्हाला दिलंय. तुम्ही सदैव आमच्या हृदयात जिवंत राहाल जब तक है जान".

बापूंचा नातू : विशाल गरड
दिनांक : २० ऑगस्ट २०२०

Monday, August 10, 2020

धामनं

बारक्यापाणीचा ह्यो सगळ्यात आवडीचा डोंगरी मेवा. शाळेत जाताना मधल्या सुट्टीत धामनं खायची म्हणून कायबी करून आईच्या डब्यातून सुट्टे दोन रुपये घेऊन जायचो. मधल्या सुट्टीचा टोल पडला रे पडला म्हणलं की लिंबाच्या झाडांकडं चिंगाट पळत सुटायचो, तिथे घोळवेवाडी किंवा ढेंबरेवाडीच्या एखाद्या मावशी न्हायतर तर मामा एका पितळी पाटीत धामनं घिऊन बसल्यालं असायचं. वर्गात श्रीमंतांची पोरं जवा पाच रुपयाचं माप हातावर घ्ययची तवा त्यांचा लंय हेवा वाटायचा. आम्ही आपलं एक एक रुपयांची दोन मापं खिश्यात टाकून एक एक तोंडात टाकत कडा कडा फोडीत बसायचांव.

कधी कधी आमच्या शाळेतल्या 'क' तुकडीतली पोरं शाळेला येताना खिसे भरून धामनं आणायची मग त्यादिवशी त्येंला मॉनिटरचा दर्जा असायचा. हावऱ्यासारखं त्याच्या फुगलेल्या खिशाकडं बघत बसायचो असे लैमटी खिदमत झाल्यावर मग त्यो बी खिशात हात घालून 'खाओ रे गरिबो' असे म्हणून तो वाटायचा. अशा वेळी वर्गातला सर्वात ढ वगैरे असणारा तो पण डोंगरात जाऊन वेचून ताजी ताजी धामनं आणायचा म्हणून पहिल्या बेंच वरची पोरं सुद्धा त्याच्या लास्ट बेंचवर तश्रीफ ठेवायची.

चार पाच हुशार टाळकी सोडली तर आम्ही सगळे टुकार, फिरस्ती, मध्यम 'ढ' वगैरे या कॅटेगरीतले विद्यार्थी होतो पण या हातावर गुटखा, तंबाखू, मावा असलं कधी पडलं नाही म्हणून स्वास्थ आणि शरिर मजबूत ठेवू शकलो. बाकी आजच्या पोरांनी सुद्धा त्यांच्या सुंदर तळहातावर हे असले पदार्थ घ्यायला हवे. चालू वर्गात चॉकलेट खायच्या जमान्यात ही असली धामनं खायची परंपरा सुद्धा जोपासायलाच हवी फक्त ती चावताना त्याच्या बिया कडा कडा फुटत असतात आणि जर का त्यो आवाज सरला कळला तर मग ओल्या छडीचे दोन फटके खायची सुद्धा तयारी ठेवलीच पाहिजे.

आज कॉलेजवर गेल्यावर सहज डोंगरात फेरफटका मारला आणि ह्यो श्रावण महिन्यातला डोंगरी गावरान मेवा झाडाचा एक एक तोडून खाल्ला. शाळेतल्या सगळ्या आठवणी पुन्हा  वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांसारखा जाग्या झाल्या म्हणून तुमच्याशी शेअर कराव्या वाटल्या. मेट्रो शिटीतल्या सुमारे नव्वद टक्के पोरांना कदाचित याचे नावही नाही सांगता येणार पण गावातल्या शाळेत आम्हाला मात्र हा मेवा नुसतं बघायला नाही तर चाखायला सुद्धा मिळाला याचे श्रेय त्या ग्रामिण संस्कृतीलाच द्यावे लागेल ज्यात मी शिकलो, वाढलो आणि आजही तिथेच राहून जग जिंकण्याची धडपड करतोय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १० ऑगस्ट २०२०

Saturday, August 8, 2020

एम्पीयस्सी MPSC

जानेवारी २००९ साली फॉर्म भरला होता. त्याचे हे ब्राउचर मी जपून ठेवले होते आज अचानक ते या स्वरूपात दिसले. कधीकाळी पाहिलेले स्वप्न आज या अवस्थेत दिसल्यावर वाईट वगैरे अजिबात नाही वाटले, खंत तर नाहीच नाही. कारण हे माझे सर्वस्व नाही जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हुकून चुकून जर या स्वप्नात यशस्वी झालो असतो तर कदाचित आज विशाल गरड या नावाला जग ज्या गोष्टींसाठी ओळखते ती गोष्ट घडवू शकलो नसतो. बाकी आईने यावर मिरच्या का ठेवल्या हे माहीत नाही मीही तिला विचारले नाही पण एम्पीयस्सी वाले मात्र याचे खूप भारी अर्थ काढू शकतील.

एम्पीयस्सी हे स्वप्न आहे असायलाही हवे त्यासाठी जीवतोड जिजान मेहनत पण करायला हवी मी सुद्धा काहीकाळ केली पण हे सगळे करत असताना प्रारब्धाने आपल्यासाठी काय नियोजन करून ठेवलंय याकडेही लक्ष असायला हवे. कोणती गोष्ट का करावी यापेक्षा ती कुठपर्यंत करावी हे ज्याला समजते तो आयुष्यात कशात ना कशात नक्कीच यशस्वी होतो. एम्पीयस्सीचा नाद अवश्य करा पण तो नाद कुठं थांबवायचा हेही निश्चित करा. एखादे स्वप्न थांबवणे लगेच दुसरे पाहणे आणि ते पूर्ण करणे हे सुद्धा जमायला पाहिजे कारण स्वप्न तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाहू शकतो पण ती पूर्ण करण्याची वेळ मात्र सर्वांना सारखीच असते.

वयाच्या २१ ते ३० वर्षाचा वेळ आपण कुठे, कशासाठी आणि कसा घालवतो यावरच आपला भविष्यकाळ ठरत असतो. 'पेशन्स' नावाच्या शब्दाला सुद्धा व्हॅलीडीटी असायलाच पाहिजे नाहीतर हा तारुण्याचा सुवर्ण काळ फक्त एक नोकरी मिळवायची म्हणून खितपत पडेल. तेव्हा या चक्रव्यूहात जाताना परतीचा मार्ग सुद्धा तयार ठेवा. दोस्तांनो जगात आणखीनही लै काय करण्यासारखे आहे. या एम्पीयस्सी नामक चक्रव्यूहात घुसून पुन्हा सहीसलामत माघारी येऊन दुसरा एखादा चक्रव्यूव्ह भेदून तिथे झेंडा फडकवणारा सुद्धा एक अभिमन्यू असतोच.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ ऑगस्ट २०२०

Thursday, August 6, 2020

तुंबलेल्या गटारी

मुंबईच्या गटारातून पाणी कमी कचरा आणि प्लॅस्टिक जास्त वाहत आहे. त्यातला कचरा काढणारे किती आणि त्यात कचरा टाकणारे किती आहेत याचा विचार केला की उत्तर मिळते. मुंबईत माती शोधून सापडत नाही मग या गटारी गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग आणि इतर तत्सम टाकाऊ पदार्थांनीच तुंबतात. ही घाण करणारे आपणच आहोत आणि अशी परिस्थिती झाल्यावर शिव्या घालणारेही आपणच आहोत. पाणी तुंबण्याची इतरही अनेक कारणे आहेत हे मला माहित आहे पण त्यापैकी गटारी तुंबने हे ही एक महत्वाचे आहेच.

कोण म्हणतंय गटार घाण असते उलट आपली घाण वाहून नेणाऱ्या त्या स्वच्छतेच्या दूत असतात. घाण तर माणूस आहे पण बिचाऱ्या गटारी बदनाम होतात. शहरात जेवढी महत्वाची तुमची घरे आणि दुकाने आहेत तेवढ्याच महत्वाच्या गटारी आहेत. हिवाळा आणि उन्हाळा त्यात कोंबत राहायचं आणि पावसाळ्यात मग बोंबलत राहायचं हे चालायचंच. खरंतर प्लॅस्टिक बॉटल मधले पाणी पिल्यावर जेव्हा आपण ती बाटली बेदरकार पणे रस्त्यावर फेकून देत असतो तेव्हाच मुंबईची तुंबई करण्यास हातभार लागलेला असतो. या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या एकदिवस माणसाला पाण्यात बुडवून मारतील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०६ ऑगस्ट २०२०

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...