Saturday, August 8, 2020

एम्पीयस्सी MPSC

जानेवारी २००९ साली फॉर्म भरला होता. त्याचे हे ब्राउचर मी जपून ठेवले होते आज अचानक ते या स्वरूपात दिसले. कधीकाळी पाहिलेले स्वप्न आज या अवस्थेत दिसल्यावर वाईट वगैरे अजिबात नाही वाटले, खंत तर नाहीच नाही. कारण हे माझे सर्वस्व नाही जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हुकून चुकून जर या स्वप्नात यशस्वी झालो असतो तर कदाचित आज विशाल गरड या नावाला जग ज्या गोष्टींसाठी ओळखते ती गोष्ट घडवू शकलो नसतो. बाकी आईने यावर मिरच्या का ठेवल्या हे माहीत नाही मीही तिला विचारले नाही पण एम्पीयस्सी वाले मात्र याचे खूप भारी अर्थ काढू शकतील.

एम्पीयस्सी हे स्वप्न आहे असायलाही हवे त्यासाठी जीवतोड जिजान मेहनत पण करायला हवी मी सुद्धा काहीकाळ केली पण हे सगळे करत असताना प्रारब्धाने आपल्यासाठी काय नियोजन करून ठेवलंय याकडेही लक्ष असायला हवे. कोणती गोष्ट का करावी यापेक्षा ती कुठपर्यंत करावी हे ज्याला समजते तो आयुष्यात कशात ना कशात नक्कीच यशस्वी होतो. एम्पीयस्सीचा नाद अवश्य करा पण तो नाद कुठं थांबवायचा हेही निश्चित करा. एखादे स्वप्न थांबवणे लगेच दुसरे पाहणे आणि ते पूर्ण करणे हे सुद्धा जमायला पाहिजे कारण स्वप्न तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाहू शकतो पण ती पूर्ण करण्याची वेळ मात्र सर्वांना सारखीच असते.

वयाच्या २१ ते ३० वर्षाचा वेळ आपण कुठे, कशासाठी आणि कसा घालवतो यावरच आपला भविष्यकाळ ठरत असतो. 'पेशन्स' नावाच्या शब्दाला सुद्धा व्हॅलीडीटी असायलाच पाहिजे नाहीतर हा तारुण्याचा सुवर्ण काळ फक्त एक नोकरी मिळवायची म्हणून खितपत पडेल. तेव्हा या चक्रव्यूहात जाताना परतीचा मार्ग सुद्धा तयार ठेवा. दोस्तांनो जगात आणखीनही लै काय करण्यासारखे आहे. या एम्पीयस्सी नामक चक्रव्यूहात घुसून पुन्हा सहीसलामत माघारी येऊन दुसरा एखादा चक्रव्यूव्ह भेदून तिथे झेंडा फडकवणारा सुद्धा एक अभिमन्यू असतोच.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ ऑगस्ट २०२०

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...