Thursday, October 22, 2020

पेंटिंग भेट

काही महिन्यांपूर्वी माझे जिवलग मित्र पिंपरी चिंचवडचे ACP श्रीकांत डिसले यांनी IPS विश्वास नांगरे पाटलांचे बॉलपेन चित्र रेखाटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी देखील मिळालेल्या वेळात ती पूर्ण करून ठेवली. हे चित्र रेखाटतानाचा लाईव्ह डेमो सोशल मिडियावर या आधीच वायरल झाला होता. नांगरे पाटलांना देखील त्याबद्दल उत्सुकता होती पण लॉकडाऊनच्या मालिकेमुळे ते चित्र डिसले साहेबांपर्यंत पोहोचवता आले नाही परंतु काही दिवसांपूर्वी साहेबांनी हे चित्र घेण्यासाठी खास माणूस पाठवला, मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पेंटिंगला सुंदर फ्रेम केली आणि विश्वास नांगरे पाटील साहेबांच्या वाढदिवसा निमित्त ही अमूल्य कलाकृती त्यांनी त्यांना भेट दिली. नांगरे पाटील साहेबांनी देखील त्या वैशिष्टपूर्ण कलाकृतीचे कौतुक करून सदर फ्रेम त्यांच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये लावण्यास सांगितली. बॉलपेन पेंटिंग सुपूर्द केल्यानंतर डिसले साहेबांनी लगेच हा फोटो आणि साहेबांची प्रतिक्रिया व्हाट्सअपवर मला पाठवली होती. ACP श्रीकांत डिसले हे नांगरे पाटील साहेबांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या फॅमिली ग्रुपवर देखील या चित्राबद्दल खूप चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रिय डिसले साहेब, मित्राच्या कलाकृतीचे कौतुक करून ती सर्वदूर पोहोचवण्याच्या तुमच्या प्रयत्नास धन्यवाद. तुम्हालाही हे चित्र रेखातलेला लाईव्ह डेमो पाहायचा असेल तर खालील यू ट्यूबलिंकवर पाहू शकता 👇🏾

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२०


Thursday, October 15, 2020

वरुणराजा, माती तरी शिल्लक ठेव !

आजवर तू शेतात साचलास, नदीतून वाहिलास, तुझ्या या वागण्याने पिकांचे नुकसान व्हायचे, कधी घुसलास शहरात तर दुकाने आणि घरांचे नुकसान व्हायचे हे कमी की काय म्हणून आज मात्र तू शेतातून वाहिलास आणि ज्या उदरातून एका दाण्याचे आम्ही शंभर दाणे करायचो ते उदरच वाहून नेलेस की रे. गेलेलं पीक पुन्हा आणता येईल, पडलेले घर पुन्हा बांधता येईल पण वाहून गेलेली आमची काळी माती आता कुठं शोधायची रे. तू ज्या रस्त्यांवरून बेदरकारपणे वाहिलास ते रस्ते उद्या पुन्हा कोरडे होतील, तुझ्या चिखलाच्या पाऊलखुणाही काही दिवसात फुफुटा होऊन उडून जातील पण शेतकरी राजाच्या शेतातली तू वाहून नेलेली काळी माती कशी परत देशील ?

तू निसर्गाचे एक अपत्य आहेस तरीही तुला सांगतो मातीचा एक इंच थर तयार व्हायला पाचशे वर्ष लागतात आणि तू मात्र तो थर काही क्षणात वाहून नेतोस. अरे आजपर्यंत आमची पीके अशी कितींदा तरी वाया गेलीत पण जर तू पिकांसोबत आमची माती सुद्धा वाहून नेणार असशील तर शेती करायची कशी ? सततचा कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, निकृष्ठ बियाणे, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, खते औषधांच्या वाढत्या किंमती, बँकांची कर्ज, पडलेले बाजारभाव, आयात निर्यात धोरण, मजुरांचा तुटवडा ही संकटे पाचवीला पुजलेली असताना ज्या मातीने आम्हाला सदैव साथ दिली ती सुद्धा तू वाहून नेलीस.

"चार महिने काबाड कष्ट करून काढलेल्या सोयाबीनची शेज उद्या मळायची आहे, पाच पन्नास पोती तरी होतीलच. पैसे आले की देणी पाणी फेडायची, लॉकडाऊनमुळे झालेल्या दैनेवर याचीच आशा आहे. यंदा दिवाळी चांगली करायची लेकरांसाठी" हे सगळं रात्री स्वप्नात पाहत होता शेतकरी आणि दुसऱ्या दिवशी रानात जाताना खळ्यावर रिचवलेल्या सोयाबीनची ढिगारा ताडपत्रीसह नदीच्या पाण्यावर वाहून जाताना पाहून त्या शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा वाहून गेली. फक्त गळ्याला फास लावणे म्हणजेच मरण नसतं; हे असे दृश्य पाहताना पाहिलेली स्वप्न डोळ्यातील अश्रूंसोबत वाहू देणं मरणापेक्षा  भयंकर असतं.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ ऑक्टोबर २०२०


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...