आज सकाळ सप्तरंग मधे माझ्या धसुडी या सदरात “बाप नावाची पोकळी” हा लेख प्रसिद्ध झाला. पहाटेपासूनच प्रतिक्रियांची जणू त्सुनामी सुरू झाली. ओळखीच्यांनी थेट कॉल केले, काहींनी व्हॉट्सऍपवर मेसेज केले. मेल बॉक्स तर ओसंडून वाहिला. तरी बरं लेखाच्या खाली माझा पर्सनल नंबर नव्हता दिला नाहीतर अख्खा दिवस फोन उचलण्यात आणि धन्यवाद म्हणण्यात गेला असता. आपण काय लिहितो त्यापेक्षा कुठं लिहितो यावरही त्याची परिणामकारकता अवलंबून असते. सप्तरंगचे वाचक इंद्रधनुष्यासारखे विशाल आहेत, ते मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत, सिंधुदुर्ग पासून ठाणे पर्यंत आणि सोलापूरपासून अमरावतीपर्यंत विस्तारलेले आहेत. म्हणूनच सबंध महाराष्ट्रातून लिखाणावर प्रतिक्रिया उमटतात.
आजवर सोशल मीडियावर प्रचंड लिहीलंय पण प्रिंट मिडियासाठी लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ. इथे लिहिलेल्या शब्दांना अनेक माणसांचा हात लागत असतो म्हणूनच ते आपसूक स्पेशल होवून जातात. मी स्वतःला लेखक म्हणून नेहमीच अपडेट करत आलोय आणि त्याला अपडेट करण्यात तुमचा मोठा वाटा राहिलाय. मायबाप वाचकांच्या हजारो प्रतिक्रीयांनी गहिवरून गेलोय. आता हे क्षण दर रविवारी माझ्या पदरी पडणार आहेत. हळू हळू सवय होईलच कौतुक पचवायची पण आजचे जरा नवीन नवीन होते म्हणून त्याला शब्दबद्ध करावेसे वाटले. आज दिवसभरात प्रतिक्रिया दिलेल्या सर्व वाचकांचे तसेच सकाळ वृत्तपत्र समूहाच्या पेपर टाकणाऱ्या व्यक्तीपासून ते प्रेस मधील छापणारे, ऑफिसमधील संकलन करणाऱ्यांसह सर्व संपादक महोदयांचे मनापासून आभार.
विशाल गरड
१४ जानेवारी २०२४, पांगरी