कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच. माझा प्रत्येक फॉलोवर हा माझ्याशी विचारांनी जोडला गेला असल्याने त्यांच्यासाठी मी त्यांचा जवळचा मित्र असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा स्वभाव त्यांना चांगला ठाऊक असल्याने मी कुठेही दिसू द्या ते अगदी हक्काने हाक मारतात आणि भेटतातच. आजचा किस्साही असाच आहे.
न्यू एरा पब्लिकेशनला मुलाखत देण्यासाठी मी जात असताना कर्वे रोडच्या सिग्नलवर गाडी थांबली. काही क्षणात शेजारी उभारलेल्या गाडी स्वाराने त्याचे हेल्मेट काढले आणि मला “विशाल सर” म्हणून हाक मारली. मी त्याला ओळख विचारताच त्याने सांगितले “सर, मी विठ्ठल लांबरुट, मोहोळ तालुक्यातील खुणेश्वरचा आहे. तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतोय. एकदम दिसलात म्हणून हाक मारली” इतक्यात सिग्नल सुटला मग जाता जाता त्याला मी म्हणालो “पुढील चौकात थांब, तुला चहा पाजतो”. पुढे गेल्यावर आम्ही एका कँटीनवर चहासाठी थांबलो. मला वेळेत पोहोचायचे होते पण इतक्या आपुलकीने भेटलेल्या फॉलोवर्सला थोडा वेळ देवून, त्याला चहा पाजून थोड्या गप्पा मारल्या. गावाकडची, नोकरीची विचारपूस केली आणि निघून गेलो.
जाताना माझ्यासोबत सेल्फी काढतानाचा त्याला मिळालेला आनंद दिलेला वेळ सार्थकी लावून गेला. अशीच प्रेम करणारी, माझ्या विचारांना फॉलो करणारी माणसं पावलो पावली भेटतात म्हणून मी पुण्यात तरी निदान स्कूटीवर फिरत राहतो. त्यानिमित्ताने मला ओळखणारे हक्काने भेटतात, प्रतिक्रिया देतात आणि मलाही कमी वेळात खूप जणांना भेटता येते. भविष्यात मर्सिडीजमधे जरी फिरताना दिसलो तरी माझ्या फॉलोवर्स लोकांना भेटण्याचा हा प्रवास असाच असेल. कारण विशाल गरडला ‘विशाल’ करण्यात अशा लाखो फॉलोवर्सचा वाटा आहे. माझा प्रत्येक वाचक, श्रोता, फॉलोवर, आयोजक माझ्यासाठी विठ्ठलच आहे. यानिमित्ताने त्या सर्वांचेसुद्धा आभार.
विशाल गरड
२१ ऑक्टोबर २०२४, पुणे