Tuesday, February 20, 2018

| कत्तल ©

मेरा देश बदल रहा है, झाडे तोड रहा है |
झाडे तोडेगा इंडिया, तभी तो रस्ता करेगा इंडिया |

शेकडो वर्ष लाखो वाटसरूंना व पंढरीच्या भक्तांना सावली दिलेल्या या जुन्या पिपरणीच्या वृक्षांची चौपदरी विकासाच्या नावाखाली शासनाने कत्तल केली. काल सातारा जिल्ह्यात व्याख्यानासाठी निघालो होतो तेव्हा पंढरपूर-सातारा मार्गावर वाखरीनजीक या शेकडो झाडांचे धड कापलेले दिसले. मी गाडी थांबवून अतिशय दुःखी होऊन या झाडांकडे बघत बसलो. शेकडो वर्ष जगलेल्या या झाडांना एका मिनिटांत हि माणसं जमिनधोस्त करून टाकत आहेत. चौपदरीकरनानंतर मधल्या जागेत छोटीशी रोपटी लावून त्या झाडांची जागा आम्ही भरून काढल्याचा आव आणतील परंतु अशी जुनी झाडे आता टिकणे आणि वाढणे अशक्य आहे. अरे एकीकडे आम्ही करोडो झाडे लावल्याची वल्गना करतो आणि दुसरीकडे अशी जुनी झाडे तोडुन नेस्तनाभूत करतो. वृक्षारोपण महत्वाचे आहे पण त्याहुन जास्त त्याचे पालनपोषण असते; जे सहसा कुणी लक्ष देऊन करत नाही. शासनाने गतवर्षी दोन कोटी झाडे लावल्याचे सांगीतले त्यातली किती झाडे चिटकली आणि पुर्ण आयुष्य जगणार आहेत याची आकडेवाडी समजेल काय ? निसर्ग झाडांच्याबाबतीत तुमच्या जीवावर अजिबात विसंबून नाही. त्याच्यात स्वतःमध्ये पुन्हा सगळीकडे जंगल उभा करण्याचे सामर्थ्य आहे फक्त तुम्ही निसर्गाने उगवलेली व वाढवलेली झाडे तोडू नका मग भले ती तुमच्या हद्दीत असो वा खाजगी मालकिची एवढीच विनंती.

जुन्या काळात रस्ते साधे होते माणसंही साधी होती. वाहने वगैरे तर नव्हतीच बहुतांशी प्रवास चालत किंवा बैलगाड्यांनी असायचा म्हणुन रस्त्याच्या कडेला सावलीसाठी झाडे लावलेली असायची. परंतु आता रस्ते डांबरी झाले आणि माणसंही डांबरट झाली. स्वतःला रस्त्याने ऐसपैस सुपफास्ट जाता यांव म्हणुन झाडांच्या जीवावर उठली. ती बिचारी मुकी झाडं फक्त आपल्याला निस्वार्थ भावनेने सावली आणि प्राणवायू देत होती. त्या जागेवर उगवून त्यांनी चूक नाही केली पण त्यांच्या जागेवर रोड करून आपणच चुक करत आहोत याची जाणिव व्हावी.
संत तुकारामांनी सांगुन ठेवलंय "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" आणि त्याच पांडुरंगाच्या मातीत होत असलेली या वृक्षाची अशी कत्तल बघवत नाही.

त्या झाडावर शेकडो पक्षांची घरटी होती त्या घरट्यात अंडी होती त्या अंड्यात पिल्ले होती. हि सुद्धा राष्ट्राची संपत्ती नाही का ? तीचं संवर्धन व जपणुक ही आपली जबाबदारी नाही का ? विकास करणे हे तर कर्तव्य आहेच परंतु तो करत असताना ही वृक्षवल्ली व पक्षी गुरे ढोरे हे पण जगले पाहिजे अन्यथा निसर्गदेवता माणवावर नाराज होऊन तीची नाराजी दुष्काळ, भुकंप आणि त्सुनामीमधुन दाखवून देईल जी तुम्हा आम्हाला कधीच न परवडणारी असेल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० फेब्रुवारी २०१८



Thursday, February 15, 2018

| मायेची ओढ ©

आज सकाळी काॅलेजला जाताना उक्कडगांपासुन तळ्याकडं जाणाऱ्या रस्त्यावर दोन लहाण मुले अनवाणी पायानं चिखल तुडवत चालताना दिसली, दोघंच बहिण भाऊ त्या सुमसान रस्त्याने चालताना बघुन मी गाडी थांबवली. खुप गोड आणि गोंडस परंतु तितकीच धाडसी असलेली हे लेकरं पाहुण मला माझं बालपण आठवलं. गावापासुन साधारणतः अर्धा किलोमिटरवर एक नदी वाहते त्या लेकरांची आई कदाचित तिथं धुणं धुवायला गेली असावी आणि तिलाच भेटायच्या ओढीणं हे चिमुकले चार पाय तिच्या दिशेने पडत असावे असा माझा अंदाज होता. मी देखील असे आईच्या मागे लागून कित्येकदा नदीवर गेलेलो आठवतंय, ह्या चिमुकल्यांना बघुन मला माझा भुतकाळ पाहत असल्यासारखंच वाटलं. हि लेकरं कुणाची आहेत म्हणुन कुणाला विचारावं म्हणलं तर त्या सुमसान वाटेवर चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. दोन्ही बाजुला पुर्ण वाढ झालेला उसाचा फड आणि मधोमध असलेल्या चिखलवाटेवर चालत चाललेल्या त्या लेकरांची जरा काळजी वाटली म्हणुन गाडी थांबवून त्यांना बोलत बसलो. नुसता एकतर्फी संवाद सुरू होता माझा, ती छोटीशी चिमुरडी तिच्या दादाच्या पाठीशी लपून तोंडात अगठा धरून ईवल्याश्या डोळ्यांनी गंभीर होऊन बघत होती आणि तो मुलगा लाजत मुरडत फक्त माझ्याकडे पाहूण हसत होता.
अवघ्या दिड वर्षाची ती मुलगी आणि तीन वर्षाचा तो मुलगा गावाकडच्या वाटेने गुरांचा दल, गाई, म्हशी, शेरडं, कुत्री, डुकरं, साप, विंचू, असल्या कशाचिही भिडभाड न बाळगता आईच्या ओढीणे निघाली होती.
शेवटी बराच वेळ त्यांच्याजवळ थांबल्यावर दोन मुली गावाकडुन कमरेवर धुण्याची बादली घेऊन येताना दिसल्या या दोघांना त्यांच्या हवाली केलं आणि यांच्या आईपर्यंत पोहचवा काळजीनं असे सांगून गाडीला किक मारली. काॅलेजपर्यंत येईस्तोवर मनात एकच प्रश्न घुटमळत होता कि आईच्या भेटीची हि ओढं मोठे झाल्यावर का बरं कमी होत असावी ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ फेब्रुवारी २०१८



Wednesday, February 14, 2018

| ढिश्क्यांव ©

ऐन व्हॅलेंटाईन दिवशी सक्काळ सक्काळ त्या प्रिया वरिअरने ढिश्क्यांव केलं आन् तिच्या गुळीनं करोडो युवकांच्या ह्रदयाचा छेद घेतला. आपापल्या व्हॅलेंटाईन तशाच लपवून समदी तीच्याच गोळ्या छाताडावर झेलायला सरसावली. माणसाचं आंग म्हंजी या निसर्गाची एक आद्भुत निर्मिती हाय आन् त्यातला डोळा म्हंजी त्या निर्मितीचा प्राण. जिथं गाजायला कित्येक दशकं वाहून जातात तिथं ही पोरगी तीन तासाच्या पिच्छर मधल्या; साडे तीन मिनटाच्या गाण्यातल्या; चोवीस सेकंदाच्या व्हिडोओत दोन भुवया उडवून, एक डोळा मारून आन् फकस्त एकदा ढिश्क्यांव करून कोट्यावधी तरूणांच्या ह्रदयात जाऊन बसली. कला आणि अदाकरीची ताकदच न्यारी आस्तीया फकस्त ती नेमक्या येळी आन् नेमक्या ठिकाणी दाखीवता आली पायजे मग तुम्हाला गाजण्यापसुन कुणीच रूकु शकत नाय. आवं डोस्क्यात शिरल्यालं ईसरत्याती माणसं पण जर कुणी ह्रदयात घुसलं तर ईसरणं अवघड हुन बसतंया, आता हि बया कवर रूतून बस्तीया कुणास ठाव ?
आन् व्हय आजुन एक सांगायचंय की, प्रिया जरी आज लई गाजली आस्ली तरी तीजी हि अदाकरी आपल्याला ज्यंच्यामुळं बघाया मिळाली ते डायरेक्टर, हिडिओग्रापर, एडीटर, मेकअपमॅन, व शेवटी आपला मार्क झुकरबर्ग हे सुद्धा खरे हिरो हैत. ह्यंच्याबी कलाकारीचं क्वाडकौतुक झालं पायजे म्हणुनशान उल्लेख केला. बाकी प्रिया मॅडमला आता "ओरू अदार लव्ह" ह्यो पिच्छर रिलीज व्हयची सुद्धा गरज नाय यवढी ती गाजुन बसली. तीला निट मराठी येत नाय मग गावठी मराठी तर लांबचीच गोष्टय पण तीला मल्याळम येतंय म्हणून शेवटी तीज्याच भाषेत तीज्यासाठी हे तीन शब्द നിങ്ങളെ അഭിനയം ബ്യൂട്ടിഫുൾ ह्यजा मराठीत आर्थ असाय की, "तुझा अभिनय सुंदर आहे".
आन् आजुन एक; प्रिया मॅडमनी ती ठरवून क्याल्याली अॅक्टींग हाय ऊगं लई मनावर घिऊ नका, कला म्हणून बघा आन् सुडुन द्या न्हायतर तुमी आपापल्या जिंदगीत ह्यज्यापेक्षाबी लई भारी भारी ओरीजनल इक्सप्रेशन्स बघीतलं आस्त्याल फकस्त कुणी शुट नाय केलं म्हणून; न्हायतर तुमच्या 'ती'च्यापुढं आस्ल्या छप्पन वरिअर फिक्या पडल्या आस्त्या. खरंय ना ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०१८




Tuesday, February 13, 2018

| रामफळ ©

आज रोजच्यागत काॅलेजवर निघालो व्हतो. आमचं काॅलेज निवासी आसल्यामुळं तीतं सुट्टी बीट्टीची भानगड नस्ती. डोंगरवाटेला लागल्यावर फुफ्फुटा उडवीत माझी हिरोव्हंडा निगाली व्हती; तेवढ्यात हागवण्याच्या वस्तीवर रोडच्याच कडंला भिमाभऊ वाट बघत बसल्यालं दिसलं. गाडी जवळ येताच त्यंनी मोठ्यांनं आरूळी ठुकली "अयंऽऽऽ सरंयययय...थांबा थांबा" मी बी लगीच ब्रेक मारला. भऊ हातातल्या पिवळ्या पिशवीत कायतरी घिऊन माझ्याकडे दमानं येतं व्हतं. जवळ आल्यावर त्या पिशवीतून एक 'रामफळ' काढून माझ्या हातात देत बोललं "आवं धरा ही, पाडाचं हाय. सकाळ-सकाळ झाडाला दिसलं. तुमच्यासाठी ठिवलं व्हतं म्हणुनच वाट बघत बसलो व्हतो..खावा आता पटमन" भऊचं वय पंच्याहत्तर पण कामाला आजुनबी खंबीरखट्ट हायतं. शेतातली समदी कामं करताना मी त्यंला रोजच बघतोय. काॅलेजला जायच्या रस्त्यावरच भऊचा कोटा आसल्यानं आमचा रोजचाच रामराम पुढं त्यज्यातुनच हि दुस्ती झाली.
माझ्या पोटामंदी दोन घास जावं असं घरच्यांना सोडून दुसरं कुणालाबी वाटणं म्या भाग्याचं समजतुय. आजपतुर कमीवलेली माणसं मला कधीच उपाशी झुपू द्यानार न्हायती ह्यची प्रचीत भऊ सारख्या माणसाचं प्रेम बगुण व्हती, कारण त्यंच्याबी घरात लहाण-लहाण नातवंडं आस्ताना माझ्यासाठीबी त्यंनी पाडाचं रामफळ राखुन ठिवलं. आज महाशिवरात्रीच्या दिवशी भिमाभऊकडून मिळाल्याला हा प्रसाद व्हॅलेंटाईन्सडेला मिळणाऱ्या गुलाबापरिस श्रेष्ठ वाटतुय."आपुण जर चांगलं काम करत आसु तर देव नक्कीच फळ देतंय" आसं म्या लईंदा ऐकलं व्हतं आज ते आनुभवायलाबी मिळालं. हि आठवण लक्षात राहावी म्हणुन भऊकडून रामफळ घेतानाचा ह्यो फुटू भऊची नात पिंकीनं टिपलाय. अशाच आठवणींचं गठुडं रूदयात ठिऊन म्या पुढं-पुढं चालतुय पण एकटा नाही तर माज्यावर प्रेम करणाऱ्या भऊ सारख्या हजारो माणसांना सोबत घिऊन.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ फेब्रुवारी २०१८




Monday, February 12, 2018

प्रेमवीर (कविता)

तुझ्या एका नजरेत ईतकी ताकद आहे की;

त्यापुढं लाखो शब्द आणि करोडो अलंकार
निशब्द होऊन शेपुट घालुन बसतील.

शेवटचा ठोका टाकायलेलं ह्रदय
पुन्हा बाहत्तर ठोक्याकडे वळेल.

मेंदुतल्या अब्जावधी पेशींना
नवसंजीवनी मिळेल.

बंद डोळे सुद्धा
पापण्यांच्या कातडीला भेदून तुला पाहतील.

अशातच जर हसलीस तू गालातल्या गालात;

मग तर वाळवंटातही नद्या वाहतील,
दगडातही झाडे उगवतील आणि
हाडा मांसाच्या शरिराला प्रेमाचे अंकुर फुटतील.

या दोन डोळ्यातले अंतर कमी करण्यासाठी हि दोन शरिरं
रात्रंदीन झगडत राहतील कुणाचीही व कशाचीही पर्वा न करता.


कवी | लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ फेब्रुवारी २०१८



विचारांची शिवजयंती ©

रोज नवे गांव आणि रोज नव्या गर्दीत पेरायचंय शिवचरित्र परंतु जे गर्दीला अपेक्षीत आहे ते नाही तर जे मला अपेक्षीत आहे ते.
यंदाच्या शिवजयंतीला सामोरे जात असताना शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थीक सुबत्तेचे धोरण, हे सर्व सांगण्यावरच मी जास्त भर देणार आहे. तसेच शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला देखील स्पर्श केल्याशिवाय माझे व्याख्यान परिपुर्ण होणार नाही.
मी शिवचरित्रकार नाही आणि ईतिहासतज्ञ देखील नाही. मी तर स्वतःला फक्त शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करणारा एक सर्वसामान्य वक्ता समजतो. शिवचरित्र अभ्यासताना अखेरपर्यंत विद्यार्थीदशेतच राहणे मला पसंद राहील. महाराजांच्या विचारांवर प्रेम करणारा व त्यांच्या विचारांचे शब्द गर्दीच्या डोक्यात पेरणारा एक शेतकरी म्हणून हा संपुर्ण महिना दिवसभर वाचन, चिंतन, मनन आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात जाणार आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत आहेत. आता फक्त तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या प्रतिक्षेत...
जय भवानी जय शिवाजी !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ फेब्रुवारी २०१८



गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...