Tuesday, February 13, 2018

| रामफळ ©

आज रोजच्यागत काॅलेजवर निघालो व्हतो. आमचं काॅलेज निवासी आसल्यामुळं तीतं सुट्टी बीट्टीची भानगड नस्ती. डोंगरवाटेला लागल्यावर फुफ्फुटा उडवीत माझी हिरोव्हंडा निगाली व्हती; तेवढ्यात हागवण्याच्या वस्तीवर रोडच्याच कडंला भिमाभऊ वाट बघत बसल्यालं दिसलं. गाडी जवळ येताच त्यंनी मोठ्यांनं आरूळी ठुकली "अयंऽऽऽ सरंयययय...थांबा थांबा" मी बी लगीच ब्रेक मारला. भऊ हातातल्या पिवळ्या पिशवीत कायतरी घिऊन माझ्याकडे दमानं येतं व्हतं. जवळ आल्यावर त्या पिशवीतून एक 'रामफळ' काढून माझ्या हातात देत बोललं "आवं धरा ही, पाडाचं हाय. सकाळ-सकाळ झाडाला दिसलं. तुमच्यासाठी ठिवलं व्हतं म्हणुनच वाट बघत बसलो व्हतो..खावा आता पटमन" भऊचं वय पंच्याहत्तर पण कामाला आजुनबी खंबीरखट्ट हायतं. शेतातली समदी कामं करताना मी त्यंला रोजच बघतोय. काॅलेजला जायच्या रस्त्यावरच भऊचा कोटा आसल्यानं आमचा रोजचाच रामराम पुढं त्यज्यातुनच हि दुस्ती झाली.
माझ्या पोटामंदी दोन घास जावं असं घरच्यांना सोडून दुसरं कुणालाबी वाटणं म्या भाग्याचं समजतुय. आजपतुर कमीवलेली माणसं मला कधीच उपाशी झुपू द्यानार न्हायती ह्यची प्रचीत भऊ सारख्या माणसाचं प्रेम बगुण व्हती, कारण त्यंच्याबी घरात लहाण-लहाण नातवंडं आस्ताना माझ्यासाठीबी त्यंनी पाडाचं रामफळ राखुन ठिवलं. आज महाशिवरात्रीच्या दिवशी भिमाभऊकडून मिळाल्याला हा प्रसाद व्हॅलेंटाईन्सडेला मिळणाऱ्या गुलाबापरिस श्रेष्ठ वाटतुय."आपुण जर चांगलं काम करत आसु तर देव नक्कीच फळ देतंय" आसं म्या लईंदा ऐकलं व्हतं आज ते आनुभवायलाबी मिळालं. हि आठवण लक्षात राहावी म्हणुन भऊकडून रामफळ घेतानाचा ह्यो फुटू भऊची नात पिंकीनं टिपलाय. अशाच आठवणींचं गठुडं रूदयात ठिऊन म्या पुढं-पुढं चालतुय पण एकटा नाही तर माज्यावर प्रेम करणाऱ्या भऊ सारख्या हजारो माणसांना सोबत घिऊन.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ फेब्रुवारी २०१८




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...