Tuesday, October 30, 2018

माझं सरकार ©

पर्वा आमच्या सरकार (बायको) सोबत रामलिंगला रपेट मारली. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. आता त्याला साजेसं विचार मंथनही व्हायला हवे म्हणून हा लेखप्रपंच. खरं म्हणजे या सरकारला एकदा निवडलं की पुन्हा याची कधीच निवडणूक लागत नाही. कुणाचं सरकार आयुष्यभर लोकशाही पाळतं तर कुणाचं सरकार हुकुमशहा होऊन जातं आमचं सरकार मात्र अजुनतरी लोकशाहीची सर्व मुल्य जपणारं आहे याचा आनंद आहे.

"एका यशस्वी पुरूष्यामागे एक स्त्री असते" असं म्हणतात परंतु माझ्या मते त्या दोन असतात; म्हणजे लग्नाआधीपर्यंत आई आणि लग्नानंतर बायको. आपल्या प्रत्येक यशामध्ये या दोन स्त्रीयांचा हात असतो. त्या फक्त आपल्या पाठीशी उभ्या नसतात तर बरोबर असतात. काळजी घेणे आणि लक्ष ठेवणे हा तर त्यांचा गुणधर्मच असतो. आईची माया आणि बहिणीचा जिव्हाळा एकटी बायको देऊ शकते. जसा एक एक धागा जोडून साडीचा सुंदर पदर तयार होतो तसेच लग्नानंतरही असे अनेक क्षण एकमेकात गुंफूण संसाराचा पदर तयार होत असतो. तो पदर अधिक खुलून दिसण्यासाठी धाग्यांची विण जिथल्या तिथं बसायला हवी नाहीतर उसवलेला पदर शोभा देत नाही.

संसार म्हणजे साडी विणण्यासारखंच असते. सुख दुःखाचे अगणित धागे आपण जगत राहतो ते मनाच्या सुईत ओवून जोडत राहायचे शेवटी नवरा बायकोच्या नात्याचा एक सुंदर पदर तयार होतो त्यालाच संसार असे म्हणतात. आई आयुष्याला पुरत नाही आणि बहीण माहेरी राहू शकत नाही तेव्हा या दोघींची कमतरता बायको पुर्ण करत असते. अखेरच्या श्वासापर्यंत तीची मिळणारी सोबत तीला आपलं सर्वस्व बहाल करायला भाग पाडते. ती जरी आपल्या अर्ध्या संपत्तीची मालकीन असली तरी आपल्या स्वतःची संपुर्ण मालकी मात्र तिच्याकडेच असते.

लग्नाआधी मी बहुतांशी लेखात "आईच्या मदतीला आता दोन हात आणावे म्हणतोय" अशी ईच्छा व्यक्त केली होती पण आता लग्नानंतर मात्र अष्टभुजाधारी विराई अवतरल्याची अनुभुती होतेय. पहाटे लवकर उठण्याची सवय, घरातली सर्व कामे लगबगीने करण्याची हतोटी, माझी खातरदारी, सर्व कुटुंबियांची योग्य काळजी आणि हे करता करताच मास्टर डिग्रीचा अभ्यास, हे सगळं विरा लिलया पेलतेय. देवीला अष्ठभुजाधारी का म्हणतात हे बायकोचा अभ्यास केला की समजते.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑक्टोबर २०१८



Thursday, October 18, 2018

© शब्दांचीच शस्त्रे

आज विजयादशमी दसऱ्या निमित्त आमच्या घरी पेन, पुस्तक आणि माईकचे पुजन करण्यात आले. पारंपारिक शस्त्रांचे पुजन आजच्या दिवशी सगळीकडे केले जाते परंतु मी मात्र माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शस्त्र म्हणून काम करणाऱ्या या गोष्टींचे पुजन केले. आजच्या आधुनिक युगात या तीन गोष्टींवर प्रभुत्व असलं की कोणत्याही शत्रूशी दोन हात करता येतात. विचारांच्या लढाया खेळणाऱ्यांसाठी तर यापेक्षा भारी शस्त्रास्त्र दुसरं असुच शकत नाही. या शस्त्रास्त्रांचे वार अजरामर राहतात. पारंपारीक शस्त्र फक्त शरिराला जखमा करतात परंतु मनाला जखमा करण्याचे आणि वेळप्रसंगी ते भरून काढण्याचे सामर्थ्य मात्र शब्द आणि लेखणीमध्येच असते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत जेवढा उपयोग ढाली, तलवारी आणि तोफांचा केला असेल तेवढाच शब्द आणि लेखणीचा सुद्धा केला. वेळानुरूप ही शस्त्रास्त्रे वापरण्याचे कसब त्यांना जगातला एक महान राजा बनवण्यास कारणीभूत ठरलं. शिवरायांनी अनेक लढाया तलवारीवर जिंकल्या परंतु कधी कधी जे काम तलवार करू शकली नाही ते काम फक्त त्यांच्या एका पत्राने केले हे ध्यानात असावे. आज आपल्या राज्यघटनेनुसार विनापरवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा ठरतो परंतु मी वापरत असलेल्या शस्त्रांस्त्रांना मात्र घटनेने स्वातंत्र्य बहाल केलंय; त्यांचा योग्य वापर समाजमने बदलू शकतो आणि अयोग्य वापर रक्तांचे सडे सुद्धा पाडू शकतो. अर्थात एवढे सामर्थ्य यात आहे.

मित्रहो, भविष्यातल्या लढाया जर ढाली, तलवारी आणि बंदुकांनी लढल्या तर आपली कैद निश्चित आहे परंतु जर याच लढाया आपण ही आधुनिक शस्त्रांस्त्रे वापरून लढल्या तर आपला विजय निश्चित आहे. चला तर मग एका नव्या युगात पदार्पन करत असताना आपणही या शस्त्रांची कास धरूयात आणि स्वतःला व समाजाला विचाराने सक्षम बनवण्याचा प्रयत्न करूयात. ईतिहासात तलवारीचा वापर करून स्वराज्याला स्वातंत्र्य बहाल केलेल्या शिवरायांना, घटनेत कलम १९ (१) नुसार आपल्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल केलेल्या भिमरायांना आणि शब्दनिर्मितीचे स्वातंत्र्य दिलेल्या जगतगुरू तुकोबारायांना माझा शतशः प्रणाम.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ll१ll
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन l
शब्द वाटू धन जन लोका ll२ll
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव l
शब्देंचि गौरव पूजा करू ll३ll

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ ऑक्टोंबर २०१८ (विजयादशमी दसरा)


Monday, October 15, 2018

वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल.
माझ्या मेंदुतील ८६ अब्ज मज्जातंतूंना विचारांचा खुराक वाचनातून मिळतो. उपाशी पोटी असताना जसं मेंदु काम करत नाही तसं वाचनाअभावी तो प्रभावी ठरत नाही. फक्त जेवन करून ईतिहास घडत नसतो पण वाचन करून मात्र नक्की घडतो. चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली या तिन्ही ऐतिहासिक घटनांचा पाया 'वाचन' आहे.

मी असेल नसेल उद्याच्या जगात पण लोक माझे शरिर नाही तर मेंदु लक्षात ठेवतील; नव्हे तो त्यांना ठेवावाच लागेल एवढे सामर्थ्य त्यामध्ये मी निर्माण करीन. होय, हे सर्वांनाच शक्य आहे पण वाचनाचं व्यसन जडलं तर. एका पुस्तकाची नशा हजारो लिटर दारू पेक्षाही कैकपटीने जास्त असू शकते. मेंदुला झिंगवणाऱ्या नशेपेक्षा मेंदुला विचार करायला लावणारी वाचनाची नशा सर्वांनीच करायला हवी. माणसाने किती वाचायला हवे याचे विशिष्ठ असे काही मानक नाही परंतु मला मात्र निदान माझ्या मेंदुत असलेल्या न्युराॅन्स एवढे तरी शब्द वाचायचे आहेत. हे स्वप्न भयंकर मोठ्ठं आहे पण डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सांगीतल्याप्रमाणे स्वप्न पाहणे गुन्हा नसतो पण लहान स्वप्न पाहणे गुन्हा आहे म्हणुन माझी प्रत्येक स्वप्न सुद्धा लार्जर दॅन लाइफ असतात.

साधारणतः अठरा मिनिटात एक पान हा माझा वाचनाचा वेग आहे. लेखणीच्या दर्जाप्रमाणे तो थोडासा कमीजास्त होत असतो. परंतु आपण जेवन जितक्या चवीने करतो तितकेच वाचनही करायला हवे. प्रत्येक शब्द मेंदुमध्ये फिक्स डिपाॅझीट करण्यासाठी फार मोठी प्रक्रिया नाही फक्त वाचताना नुसतं डोकं पुस्तकात घालण्यापेक्षा डोळे आणि मेंदुमधली झापड उघडी ठेवनं गरजेचे असते. पण ही झापड एकाग्रतेची असते तीच्या सहीशिवाय एकही शब्द मेंदुत रूतुन बसू शकत नाही. डोळे उघडल्यानंतर तर सर्वांनाच दिसत ओ पण त्या दिसण्यातली दृष्टी मात्र वाचनामुळेच बदलते तेव्हा उघडा डोळे आणि वाचा नीट.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : १५ ऑक्टोंबर २०१८ (वाचन प्रेरणा दिन)


Saturday, October 13, 2018

खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा

छत्रपती संभाजी महाराजांनी अजरामर ईतिहास घडवला ही प्रकृती होती, त्यांचा जाज्वल्य ईतिहास ईमाने ईतबारे जतन करणे ही आपली संस्कृती आहे. परंतु स्वतः संशोधन न करता दुसऱ्यांच्या उष्ट्या वादग्रस्त लिखानाचा आधार घेऊन महापुरूषांबद्दल चुकीचे लिखान करणे ही विकृती आहे जी विकृती डाॅ.शोभा साठे नामक लेखिकेने "समर्थ श्री रामदास स्वामी" या पुस्तकातुन केली आहे. सर्वप्रथम याचा मी तीव्र निषेध करतो. त्या लेखिकेने तथाकथित पुस्तकात नेमके काय लिहिले आहे तो मजकुर इथे शेअर करणे मी मुद्दाम टाळला आहे; कारण त्यांनी लिहिलेले ते शब्द उगांच हजारो लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा त्यांचाच हेतू साध्य होईल म्हणुन. पण हल्ली अशा विकृतींना जरा जास्तच जोर चढलाय. सुपिक मेंदुमध्ये असे नासके विचार जन्माला घालण्यामागे कारणेपण तशीच असावीत बहुधा. आज सोशल मिडियामुळे अशा विकृत गोष्टी लगेच समोर येत आहेत पण विचार करा व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकच्या आधी असे विकृत लिखान असलेली कितीतरी पुस्तके आमच्याच माणसांच्या उबऱ्यापर्यंत पोहचली असावीत. ज्यांनी महापुरूषांबद्दल एक अवाक्षरही वाचले नसेल अशांनी जर असे विकृत लिखान वाचले तर तेच खरे समजून ते वागतील, जगतिल. त्यांच्या डोक्यावर छापलेली हि विषारी शाई पुसायला पुन्हा आपली किती वर्ष जातील ?

विकृती करणाऱ्याचे लिंग न पाहता त्याची मानसिकता ठेचायला हवी. गाबुळा अभ्यास करून महापुरूषांबद्दल भलतं सलतं लिहिणाऱ्यांना लाज वगैरे नसतेच मुळी म्हणुनच तर ते बदनामी करू शकतात. महापुरूषांच्या विचारांचा प्रभाव असलेली माणसं चुकीचा ईतिहास लिहित नाहीत आणि सांगतही नाहीत. परंतु हेतुपुरस्पर एखाद्या व्यक्तिमत्वाला संशयाच्या भोवऱ्यात उभा करून बदनाम करण्याचे षडयंत्र जर कोणी रचत असेल तर त्यांना नक्कीच धडा शिकवायला हवा आणि वाचनातुन हे विष लहान लेकरांना पाजण्याचा हा डाव वेळीच हाणुन पाडायला हवा. या ज्या कोणी बाईं राजांबद्दल चुकीच्या गोष्टी वकल्या आहेत त्यांची डाॅक्टरकी गटारीत भिजवायला हवी. त्यांनी जे काही संदर्भ यासाठी वाचले असतील ते देखील बदनामीचे झरेच असावेत. मी कुणी ईतिहासकार नाही आणि शास्रज्ञही नाही परंतु एक शंभूभक्त म्हणुन आजवर संभाजी महाराजांचा जेवढा केवढा ईतिहास वाचला असेल त्यातुन मला प्रचंड प्रेरणाच मिळाली आहे. कायद्याचे राज्य असल्याने न्यायिक मार्गाने निषेध नोंदवत आहोत अन्यथा अशी विकृती करण्याऱ्यांची बोटेच छाटायला हवीत. सत्य असेल तर जरूर मांडा पण असत्याला आपल्या सोयीने सत्य करून जर कोणी आमच्या अस्मिता दुखावत असेल तर त्याची गय केली जाणार नाही हे लक्षात ठेवा.

पाण्यावर तरंगता तोफखाना तयार करणारे छत्रपती संभाजी महाराज पहिले राजे होते. आता तोफखाना चालवायचा म्हणल्यावर त्यासाठी दारूगोळा तर अत्यावश्यकच असतो की. मग असा दारूगोळा खरेदी करण्यासंदर्भातली समकालिन पत्रे व तत्सम साहित्य काही गिण्यान मातीत गेलेल्या आणि हेतुपुरस्पर शंभुराजांना बदनाम करणाऱ्या व्यक्तींनी संदर्भ म्हणुन घेतले आणि त्यातला 'गोळा' काढुन फक्त 'दारू' याच शब्दाला अधोरेखित केले आणि नासवला आपल्या पराक्रमी, चारित्रवान युवराजांचा ईतिहास. लिहायची एवढीच खुमखुमी आली असेल तर जिवंत असलेल्या माणसांबद्दल लिहा की. हयात नसलेल्या व्यक्तींना बदनामीचा हार कशाला घालता. आणि तसंही छत्रपतींबद्दलच हे सगळं का घडतंय याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाच्या ह्रदयात असलेले त्यांचे अढळ स्थान. समाजाचे लक्ष जलद गतीने विचलित करण्याचे विखारी माध्यम कोणते असेल तर ते म्हणजे महापुरूषांची बदनामी; आणि समाजकंटक नेमकं हेच करत आले आहेत, बस्स झालं आता, खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ ऑक्टोंबर २०१८


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...