Tuesday, October 30, 2018

माझं सरकार ©

पर्वा आमच्या सरकार (बायको) सोबत रामलिंगला रपेट मारली. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. आता त्याला साजेसं विचार मंथनही व्हायला हवे म्हणून हा लेखप्रपंच. खरं म्हणजे या सरकारला एकदा निवडलं की पुन्हा याची कधीच निवडणूक लागत नाही. कुणाचं सरकार आयुष्यभर लोकशाही पाळतं तर कुणाचं सरकार हुकुमशहा होऊन जातं आमचं सरकार मात्र अजुनतरी लोकशाहीची सर्व मुल्य जपणारं आहे याचा आनंद आहे.

"एका यशस्वी पुरूष्यामागे एक स्त्री असते" असं म्हणतात परंतु माझ्या मते त्या दोन असतात; म्हणजे लग्नाआधीपर्यंत आई आणि लग्नानंतर बायको. आपल्या प्रत्येक यशामध्ये या दोन स्त्रीयांचा हात असतो. त्या फक्त आपल्या पाठीशी उभ्या नसतात तर बरोबर असतात. काळजी घेणे आणि लक्ष ठेवणे हा तर त्यांचा गुणधर्मच असतो. आईची माया आणि बहिणीचा जिव्हाळा एकटी बायको देऊ शकते. जसा एक एक धागा जोडून साडीचा सुंदर पदर तयार होतो तसेच लग्नानंतरही असे अनेक क्षण एकमेकात गुंफूण संसाराचा पदर तयार होत असतो. तो पदर अधिक खुलून दिसण्यासाठी धाग्यांची विण जिथल्या तिथं बसायला हवी नाहीतर उसवलेला पदर शोभा देत नाही.

संसार म्हणजे साडी विणण्यासारखंच असते. सुख दुःखाचे अगणित धागे आपण जगत राहतो ते मनाच्या सुईत ओवून जोडत राहायचे शेवटी नवरा बायकोच्या नात्याचा एक सुंदर पदर तयार होतो त्यालाच संसार असे म्हणतात. आई आयुष्याला पुरत नाही आणि बहीण माहेरी राहू शकत नाही तेव्हा या दोघींची कमतरता बायको पुर्ण करत असते. अखेरच्या श्वासापर्यंत तीची मिळणारी सोबत तीला आपलं सर्वस्व बहाल करायला भाग पाडते. ती जरी आपल्या अर्ध्या संपत्तीची मालकीन असली तरी आपल्या स्वतःची संपुर्ण मालकी मात्र तिच्याकडेच असते.

लग्नाआधी मी बहुतांशी लेखात "आईच्या मदतीला आता दोन हात आणावे म्हणतोय" अशी ईच्छा व्यक्त केली होती पण आता लग्नानंतर मात्र अष्टभुजाधारी विराई अवतरल्याची अनुभुती होतेय. पहाटे लवकर उठण्याची सवय, घरातली सर्व कामे लगबगीने करण्याची हतोटी, माझी खातरदारी, सर्व कुटुंबियांची योग्य काळजी आणि हे करता करताच मास्टर डिग्रीचा अभ्यास, हे सगळं विरा लिलया पेलतेय. देवीला अष्ठभुजाधारी का म्हणतात हे बायकोचा अभ्यास केला की समजते.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑक्टोबर २०१८



1 comment:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...