Tuesday, February 19, 2019

पेरणी ©

विचारांची पेरणी करतोय पण हे वाटतं तितकं सोप्प नाही. सकाळी नांदेड येथील व्याख्यान उरकून आज संध्याकाळचे उमरी तालुक्यातील कौडगांव येथे व्याख्यानासाठी निघालो. नविन गाव, नविन तालुका, नविन रस्ते आणि नविन माणसं पण फक्त एक गोष्ट ओळखीची ती म्हणजे शिवरायांचे विचार. बस्स याच एका कारणासाठी अतिशय खडतर रस्त्यावरून माझी गाडी धावू लागते. नांदेडहून गुरूजीच्या कारखान्यापर्यंतच जरा बरा रस्ता होता त्यानंतर मात्र बारड मार्गे मुदखेड पर्यंत ट्रॅक्टरसुद्धा चालवू वाटू नये एवढा खराब रस्ता, उमरी ते कौडगांव व्हाया बेलदारा या रस्त्यावरूनतर गाडी डोक्यावर घेऊन चालत जावे वाटायचे. तब्बल दोनशे बासष्ठ किलोमिटर अंतर पार करून कधी चौपदरी, कधी दुपदरी तर कधी एकेरी रस्त्यावरूनचा प्रवास करत करत संध्याकाळी आठ वाजता गावात पोहचलो. उमरी तालुक्यातील कौडगाव, एन्डाळा आणि महाटी ही गावे आंध्रप्रदेशच्या बाॅन्ड्रीवर असल्याने विकासाच्या बाबतीत यांना सवतीच्या लेकरांसारखी वागणूक मिळते. इथले रस्ते भयंकर खराब आहेत रस्त्यावरून जाताना पोटातलं पाणी कमी पण डोक्यातले विचारच जास्त हेलकांडत आहेत. प्रचंड त्रास, कसरत, जिवाचा अटापिटा, रिस्क आहे पण उगवायची अपेक्षा ठेवायची असेल तर आधी पेरावं तरी लागेलंच या एकाच ध्येयाने पेटलेल्या या विशाल देहाला थकून चालणार नाही. अडीअडचनीतुनच व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघत असते. नाव ठेवणं सोप्प असतं पण ते बनवणं तितकच कठीण. आता थोड्याच वेळात माईक समोर येईल; शरिराचा थकवा, प्रवासाचा त्रास, वैयक्तीक दुखणी बाजूला सारून समोरील गर्दीत विचार पेरण्यासाठी तोंडाची तिफन अविरत चालू ठेवणे अगत्याचे आहे.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ फेब्रुवारी २०१९


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...