Saturday, January 19, 2019

मिशा ©

तारूण्यात आल्यानंतर मिसरूट फुटलं की जाणतं झाल्याची भावना येते. लहान आसताना कधी एकदा मिशा येतात याची भारी हौस असते. मला सुद्धा दाढी मिशाची खुपच हौस होती. त्यात मिशा भरीव पिळदार आणि दाढी फुल असायला पाहिजे असे जणु स्वप्नच होते. लवकर दाढी यावी म्हणुन गुळगुळीत गालावर ब्लेडचा खोऱ्या फिरवणारे कित्येक मित्र मी पाहिले आहेत. परंतु माझी स्वप्नपुर्ती मात्र हे असले कोणतेही गावठी नुक्से न वापरताच झाली. गुणसुत्रातुन मिळालेलं हे वैभव पुढे मी रूबाबात टिकवूनही ठेवलं

मी अकरावीत असताना एकदा आयडी फोटो काढताना मिशा ठळक दिसाव्या यासाठी त्याला थोडं पाणी लावलं होतं. काॅलेजच्या गॅदरिंगला मिशा आणि दाढी काळ्या बाॅलपेन ने जोडायचो. आज हे सगळं आठवलं की हसू येतं पण खरंच खुप जणांना असा अनुभव असतो. दहावी पर्यंत गुळगुळीत असणारा ओठावरचा भाग आणि हनुवटी अकरावीत भुर्र्या केसांनी वेढू लागली, बारावीत मिशा स्पष्ट दिसायल्या, डिग्रीच्या पहिल्या वर्षात दाढी याय लागली आणि थर्ड यिअरला मग फुल्ल दाढी मिशाचा चेहरा लाभला. विशाल गरड वुईथ दाढी मिशा ही जणु आयडेंटिटीच झाली.

घरच्यांनी जेव्हा माझ्यासाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा माझा हा असा फुल दाढीमिशांचा अवतार पाहून आई ओरडायची "आरं दोन लेकराचा बाप दिसायला ह्या दाढीमिशानं, कोण पसंद करल रं तुला ?" तेव्हा मी तिला सांगायचो "वुईथ दाढीमिशाच पसंद करावं लागलं तीला, न्हायतर उगं पसंद करण्यापुरतं चिकनं व्हयचं आन् पुन्हा दाढीमिशा राखल्यावर तिला फसवल्यासारखं व्हईल की." माझ्या अशा विनोदी बोलण्याने आई पुन्हा असे प्रश्न नव्हती करत. तसं पहायला गेलं तर दाढी मिशांचा खुप मोठा ईतिहास आहे. अनेक राजघराण्यातली मंडळी व ॠषी मुनी दाढी ठेवायचे हल्ली मात्र फॅशन म्हणुन ठेवतात हा भाग वेगळा.

आज वयाची तिशी गाठली परंतु अजुनही गालाला ब्लेड नाही लावू वाटली हेच माझं दाढीवरचं प्रेम. लग्नातसुद्धा बऱ्याच मित्रांनी दाढी करण्याचा सल्ला दिला परंतु शेवटी आयुष्यातील या महत्वाच्या क्षणी देखील विराच्या परवाणगीने दाढी सोबतच लग्नसोहळा आटोपला. आता काळ्याभोर दाढी मिशात चार दोन चंदेरी तारा चमकू लागल्या आहेत. तारूण्यातून प्रौढत्वाकडची हि वाटचाल आता चाळीशी ऐवजी तिशीतच सुरू झाली याची खंत वाटतेय पण हे आजच्या पिढीत सर्वांसोबत होतंय मी तरी कसा अपवाद राहील; बाकी अती विचार करण्याने वगैरे केस लवकर पांढरे होतात हे जरं खरं असेल तर पन्नाशीच्या आतच आमचाबी मोदी लुक होणार अशी शक्यता वाटतेय.

भुर्री दाढी ते पांढरी दाढी व्हाया काळी दाढी हा प्रवास सर्वांचा सेमच असतो. फक्त यात काहीजण फुल दाढी राखून जगतात, काही क्लिन शेव्ह करतात तर काहीजन हनुवटीवर दाढी आल्यावर फुल दाढी यायची वाट बघतच आयुष्य काढतात.
आजचा हा विषय जरी वेगळा वाटत असला तरी दाढी मिशा राखणारे व काढणारे दोघेही याबद्दल किती जागृक असतात हे कटिंगवाल्यालाच ठाऊक असते. आता असंच लिहित बसलो तर दाढीमिशावर एक पुस्तक तयार होईल कारण प्रत्येकाच्या आयुष्यात यासंदर्भातले अनेक एकशेएक किस्से असतात. तुमच्या अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळावा एवढाच उद्देश होता. बाकी कुछ भी कहो यारों मुँछो पे ताव मारणे की मजा ही कुछ और होती है...

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ जानेवारी २०१९


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...