Friday, September 18, 2020

संसार एक सिनेमा

बायको म्हणजे संस्कार रुपी सिनेमातले हे एक असे पात्र आहे जिला आई, बहीण, प्रेयसी, मैत्रीण, मुलगी, वहिनी, जाऊ, नणंद आणि पत्नी असे वेगवेगळे रोल प्ले करावे लागत असतात. या सगळ्या पात्रांना जी न्याय देते तिचा संसार सुपरहिट होतो. दोस्तांनो तुमचा हा सिनेमा लो बजेट आहे का हाय बजेट याचा फारसा संबंध नसतो फक्त संसारातल्या अभिनेत्रीची निवड मात्र महत्वाची ठरते. तसेही ही निवड आता आपल्या हातात म्हणावी तेवढी नाही राहिली, सद्य परिस्थितीत तर 'त्याच' ठरवतात कोणत्या सिनेमात काम करायचे आणि कोणत्या नाही.

या सिनेमातली काही पात्र जन्मजात कंपल्सरी असतात तर काही मात्र निवडावी लागतात. तसेही आयुष्य नावाचा अर्धा सिनेमा आईबापाच्या डिरेक्शन मध्ये आपण आधीच पूर्ण केलेला असतो त्यातच हा संसार नावाचा नवीन सिनेमा आपल्या डिरेक्शनमध्ये सुरू करायचा असतो. (काही काही सिनेमात कालांतराने ऍक्टरच डिरेक्टर होतात तो भाग वेगळा) सरतेशेवटी सांगायचं एवढंच की संसाररूपी या सिनेमात प्रत्येकाची डिरेक्शन ठरलेली असते. ज्याचा त्याचा रोल स्क्रिप्ट प्रमाणे प्ले केला की शुटिंग वेळेत पूर्ण होते. लव्ह, ड्रामा, ऍक्शन, इमोशन, सस्पेन्स, थ्रिल, कॉमेडी, इन्स्पिरेशन हे सगळं अनुभवायला लावणारा एकमेव चित्रपट म्हणजेच 'संसार' होय.
प्रिय विरा, तू आपला संसार सुपरहिट केल्याबद्दल धन्यवाद.

आता तुम्ही म्हणाल की विशाल गरड बायकोच्या वाढदिवसाला हे असे सिनेमॅटिक का बरं लिहायलाय. तर त्याचं असं आहे की; गेल्या काही महिन्यांपासून माझ्या डोक्यात सिनेमाचे फॅड घुसलंय, जोवर ते एकदा पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यात तयार होणाऱ्या प्रत्येक विचाराला त्या सिनेमाचा फ्लेवर आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा बायकोला वाढदिवसानिमित्त द्यायच्या शुभेच्छा तरी त्याला कसा बरं अपवाद ठरतील म्हणून हा लेखप्रपंच. बाकी या सिनेमातली सर्व पात्र वास्तव असतात यांचा जीवनाशी घनिष्ट संबंध असतो. योगायोग वगैरे क्वचित असतो बहुतांशी तर ठरवूनच असतं. तेव्हा रिल लाईफ मध्ये कुणी करो अथवा ना करो पण रिअल लाईफ मध्ये मात्र हा सिनेमा प्रत्येकाला (लग्न करण्याची इच्छा असलेल्यांना) करावाच लागतो.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०२०

Thursday, September 17, 2020

प्रतापगड संवर्धन मोहीम

दुर्ग रक्षणाचे अविरत श्रम जणू यांच्या पाचवीलाच पुजले  आहे म्हणूनच की काय यांना श्रमिक हे नाव शोभून दिसते. माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे यांचा दुर्ग अभ्यास म्हणजे आजच्या पिढीला मिळालेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. तंजावर पासून अटक पर्यंत असलेल्या शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांची पदभ्रमंती केलेला हा माणूस जणू शिवाजी राजांनी आज्ञा देऊन पृथ्वीवर धाडला असावा असेच वाटते. श्रमिक सरांनी स्थापन केलेल्या सह्याद्री प्रतिष्ठाणचे काम फक्त उल्लेखनीय नसून ते अभिमानास्पद आहे. या स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे.

ज्या किल्ल्यांना शिवरायांचा सहवास लाभला, ज्या बुरुजावर शिवराय उभे ठाकले ते बुरुज ढासळल्यावर, तटबंदी तुटल्यावर त्या पुन्हा उभ्या करण्याची जबाबदारी कुणाची ? याचे उत्तरे अनेक आहेत पण सध्या तरी याचे उत्तर सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र हेच आहे. कारण त्यांनी आजवर केलेली दुर्गसेवा आणि किल्यांना लावलेली स्वराज्याची प्रवेशद्वारे पाहता हे काम ते लोकवर्गणीतून अतिशय प्रामाणिकपणे करू शकतील याची खात्री आहे. परवानगीच्या बाबतीत अत्यंत क्लिष्ट अशा पुरातत्व खात्याला सुद्धा सह्याद्री प्रतिष्ठाणवर विश्वास असल्याने त्यांनी गडावरील बांधकामास व प्रवेशद्वार बसवण्यास परवानगी दिली आहे.

पाण्यासंबंधी जे काम महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनने केले तसेच दुर्गरक्षणाचे काम आज महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. या दुर्गरक्षणाचे रूपांतर लोकचळवळीत करण्यात श्रमिक गोजमगुंडेसह प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहे. जेव्हा भविष्यात प्रतापगडाच्या तटबंदीचे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ते पाहताना हि तटबंदी बांधण्यात मी सुद्धा खारीचा वाटा उचललाय ही भावनाच प्रचंड समाधान देऊन जाईन.

एका माणसाने केलेल्या लाखो रुपयाच्या मदतीपेक्षा लाखो माणसांनी एकत्र येऊन गोळा केलेला एक एक रुपया केव्हाही मोठा असतो कारण त्या निधीत लाखो लोकांच्या भावना जोडल्या जातात. प्रतापगडावरच्या बुरुजाखालची ढासळलेली तटबंदी बांधण्यासाठी जो निधी लागणार आहे तो उभा करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठाणने आवाहन केले आहे. मीही फुल न फुलाची पाकळी म्हणून ₹ १००१ एवढी समिधा अर्पण करूनच हा लेख लिहिला आहे. मदत छोटी का मोठी ते महत्वाचे नसते जेव्हा छोटी छोटी मदत खूप जण करतात तेव्हा आपोआप ती मोठी होते. तेव्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या या स्वराज्य कार्यात आपणही स्वेच्छेने योगदान द्यावे ही विनंती.

सह्याद्री दुर्गसेवक 👇🏾
निधी संकलन : गुगल पे / फोन पे उपलब्ध
श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे 9869341992
श्री.सुरज सतिश नाळे 9561096421
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०२०


Monday, September 7, 2020

द फ्रेम

आजपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलोय. गावोगावी जाऊन विचार पेरता पेरता प्रवासादरम्यान कितीतरी लोकेशन्स डोळ्यात कैद होत गेल्या. निसर्गाकडे आणि समाजाकडे पाहण्याची आणि पाहिलेलं मांडण्याची शक्ती माझ्यात का बरं निर्माण झाली असावी असा विचार सतत मनात यायचा पण आज 'इंगित' मुळे मला त्याचे प्रयोजन लक्ष्यात आलंय. खालील फोटोत दिसणारी माझ्या बोटांची फ्रेम इंगितच्या माध्यमातून तुमचे डोळे सुखावण्यासाठी आणि मेंदूला विचार करायला भाग पाडण्यासाठी सज्ज असेल. बस्स हसणाऱ्यांनी हसून घ्या आणि साथ देणाऱ्यांनी साथ द्या वेळ नाही सांगत पण तुम्हा सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कलाकृती एक दिवस नक्की निर्माण करेन, तोपर्यंत छोटे मोठे प्रयत्न तुमच्यासमोर मांडत राहीलच. 'इंगित' हे पेज आत्ताच ताजं ताजं काढलंय अवश्य फॉलो करा आणि दाद देत राहा दोस्तांनो..

विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्रॉडक्शन

Saturday, September 5, 2020

बेड शिल्लक नाही

कुणी बेड देता का बेड, कोरोनामुळे श्वास घ्यायला अडचण येत असलेल्या रुग्णाला कुणी ऑक्सिजनचा बेड देता का बेड. होय, सद्यस्थितीला हेच सत्य आहे आणि अशी कितीही आर्त हाक मारली तरी बेड मिळेल याची अजिबात शाश्वती नाही. अक्षरशः माणसे घरीच मरायला सोडून द्यावी लागतील एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता ही स्थिती वरचेवर अजून भयानक होणार आहे हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. ज्या इटलीची आरोग्य व्यवस्था जगात भारी म्हणून लैकीक होता तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे आपण डोळ्यांनी पाहिले आहे मग आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे हे माहीत असतानाही आपण कुणाच्या जिवावर आपला जीव बाहेर हिंडायला सोडतोय ? याचा विचार व्हावा.

फक्त लॉकडाऊन करणे हा पर्याय नाहीच तर योग्य काळजी घेऊन आपण जगणे हाच एक पर्याय आहे. पन्नाशी ओलांडलेल्यांनी तर किमान लस येईपर्यंततरी घर सोडू नये. इ पास रद्द झालेत, दळणवळण चालू झालंय, हॉटेल लॉज सुरू झालेत या सगळ्या गोष्टींचा उपयोग गरज पडेल तेव्हाच करा मौज म्हणून नको. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थापेक्षा सध्या कोणताच मुद्दा महत्वाचा नाही आणि असूही नये. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडतंय तेच जेव्हा आपल्या उंबऱ्याजळ येऊन उभे राहिल तेव्हाच या लिखाणाचे महत्व पटेल तोपर्यंत हाही लेख शे पाचशे लाईक आणि पाच पन्नास कमेंटचा मोहताज असेल. आता माणसे वाचवणे हाच एक अजेंडा असायला हवा एवढेच वाटते. हे वर्ष फक्त जिवंत राहण्याचे आहे. शरीरातील अवयवांना माहीत नाही तुम्ही लखपती आहात, करोडपती आहात का गरीब आहात त्यांचे कार्य सर्वांसाठी सारखेच आहे तेव्हा त्यांची काळजी घ्या ते तंदुरुस्त तर आपण तंदुरुस्त नाहीतर स्मशान वाटच बघतंय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०५ सप्टेंबर २०२०

Thursday, September 3, 2020

हॅप्पीबर्थडे सोनवणे सर

संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस करणारा संस्थापक, कर्मचाऱ्यांवर पुत्रवत प्रेम करणारा संस्थापक, गुणवत्ताधारक गरीब लेकरांना दत्तक घेऊन शिकवणारा संस्थापक, निट आणि जेईई सारख्या परीक्षांना न्याय देणारी तीन दर्जेदार संकुले उभी करणारा संस्थापक, पैशापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देणारा संस्थापक, एका विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून हजारो विद्यार्थ्यांचे पालन करणारा संस्थापक,  स्वतःचे विद्यार्थी आज आमदार, खासदार आणि मंत्री असूनही कधीच मोठेपणा न मिरवणारा संस्थापक, विद्यार्थी आणि पालकांशी थेट संपर्क ठेवणारा संस्थापक, प्राध्यापकांकडून एकही रुपया न घेता फक्त बुद्धिमत्ता आणि विद्वत्तेच्या जोरावर त्यांना नोकरी देणारा संस्थापक, संस्थेला परिवार मानणारा संस्थापक आणि डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून माझ्यासारख्या शेकडो कुटुंबांची भाकरी बनलेला संस्थापक संजीव सोनवणे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव.

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...