कुणी बेड देता का बेड, कोरोनामुळे श्वास घ्यायला अडचण येत असलेल्या रुग्णाला कुणी ऑक्सिजनचा बेड देता का बेड. होय, सद्यस्थितीला हेच सत्य आहे आणि अशी कितीही आर्त हाक मारली तरी बेड मिळेल याची अजिबात शाश्वती नाही. अक्षरशः माणसे घरीच मरायला सोडून द्यावी लागतील एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता ही स्थिती वरचेवर अजून भयानक होणार आहे हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. ज्या इटलीची आरोग्य व्यवस्था जगात भारी म्हणून लैकीक होता तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे आपण डोळ्यांनी पाहिले आहे मग आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे हे माहीत असतानाही आपण कुणाच्या जिवावर आपला जीव बाहेर हिंडायला सोडतोय ? याचा विचार व्हावा.
फक्त लॉकडाऊन करणे हा पर्याय नाहीच तर योग्य काळजी घेऊन आपण जगणे हाच एक पर्याय आहे. पन्नाशी ओलांडलेल्यांनी तर किमान लस येईपर्यंततरी घर सोडू नये. इ पास रद्द झालेत, दळणवळण चालू झालंय, हॉटेल लॉज सुरू झालेत या सगळ्या गोष्टींचा उपयोग गरज पडेल तेव्हाच करा मौज म्हणून नको. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थापेक्षा सध्या कोणताच मुद्दा महत्वाचा नाही आणि असूही नये. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडतंय तेच जेव्हा आपल्या उंबऱ्याजळ येऊन उभे राहिल तेव्हाच या लिखाणाचे महत्व पटेल तोपर्यंत हाही लेख शे पाचशे लाईक आणि पाच पन्नास कमेंटचा मोहताज असेल. आता माणसे वाचवणे हाच एक अजेंडा असायला हवा एवढेच वाटते. हे वर्ष फक्त जिवंत राहण्याचे आहे. शरीरातील अवयवांना माहीत नाही तुम्ही लखपती आहात, करोडपती आहात का गरीब आहात त्यांचे कार्य सर्वांसाठी सारखेच आहे तेव्हा त्यांची काळजी घ्या ते तंदुरुस्त तर आपण तंदुरुस्त नाहीतर स्मशान वाटच बघतंय.
वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०५ सप्टेंबर २०२०
No comments:
Post a Comment