दुर्ग रक्षणाचे अविरत श्रम जणू यांच्या पाचवीलाच पुजले आहे म्हणूनच की काय यांना श्रमिक हे नाव शोभून दिसते. माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे यांचा दुर्ग अभ्यास म्हणजे आजच्या पिढीला मिळालेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. तंजावर पासून अटक पर्यंत असलेल्या शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांची पदभ्रमंती केलेला हा माणूस जणू शिवाजी राजांनी आज्ञा देऊन पृथ्वीवर धाडला असावा असेच वाटते. श्रमिक सरांनी स्थापन केलेल्या सह्याद्री प्रतिष्ठाणचे काम फक्त उल्लेखनीय नसून ते अभिमानास्पद आहे. या स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे.
ज्या किल्ल्यांना शिवरायांचा सहवास लाभला, ज्या बुरुजावर शिवराय उभे ठाकले ते बुरुज ढासळल्यावर, तटबंदी तुटल्यावर त्या पुन्हा उभ्या करण्याची जबाबदारी कुणाची ? याचे उत्तरे अनेक आहेत पण सध्या तरी याचे उत्तर सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र हेच आहे. कारण त्यांनी आजवर केलेली दुर्गसेवा आणि किल्यांना लावलेली स्वराज्याची प्रवेशद्वारे पाहता हे काम ते लोकवर्गणीतून अतिशय प्रामाणिकपणे करू शकतील याची खात्री आहे. परवानगीच्या बाबतीत अत्यंत क्लिष्ट अशा पुरातत्व खात्याला सुद्धा सह्याद्री प्रतिष्ठाणवर विश्वास असल्याने त्यांनी गडावरील बांधकामास व प्रवेशद्वार बसवण्यास परवानगी दिली आहे.
पाण्यासंबंधी जे काम महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनने केले तसेच दुर्गरक्षणाचे काम आज महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. या दुर्गरक्षणाचे रूपांतर लोकचळवळीत करण्यात श्रमिक गोजमगुंडेसह प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहे. जेव्हा भविष्यात प्रतापगडाच्या तटबंदीचे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ते पाहताना हि तटबंदी बांधण्यात मी सुद्धा खारीचा वाटा उचललाय ही भावनाच प्रचंड समाधान देऊन जाईन.
एका माणसाने केलेल्या लाखो रुपयाच्या मदतीपेक्षा लाखो माणसांनी एकत्र येऊन गोळा केलेला एक एक रुपया केव्हाही मोठा असतो कारण त्या निधीत लाखो लोकांच्या भावना जोडल्या जातात. प्रतापगडावरच्या बुरुजाखालची ढासळलेली तटबंदी बांधण्यासाठी जो निधी लागणार आहे तो उभा करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठाणने आवाहन केले आहे. मीही फुल न फुलाची पाकळी म्हणून ₹ १००१ एवढी समिधा अर्पण करूनच हा लेख लिहिला आहे. मदत छोटी का मोठी ते महत्वाचे नसते जेव्हा छोटी छोटी मदत खूप जण करतात तेव्हा आपोआप ती मोठी होते. तेव्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या या स्वराज्य कार्यात आपणही स्वेच्छेने योगदान द्यावे ही विनंती.
सह्याद्री दुर्गसेवक 👇🏾
निधी संकलन : गुगल पे / फोन पे उपलब्ध
श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे 9869341992
श्री.सुरज सतिश नाळे 9561096421
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा
वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०२०
No comments:
Post a Comment