Thursday, February 18, 2021

पुन्हा लॉकडाऊन नको

'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या
कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या अचुक निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांसह इतर व्यवसायिकांनी भोगलंय. 

ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय. कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.

लॉक डाऊन मध्ये जरी सरकार शेतमाल विक्रीला परवानगी देत असेल तरी व्यापारी मात्र फक्त लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीने माल विकत घेतात. शेतकऱ्याचा दहा रुपये किंमतीचा माल लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाईस्तोवर शंभर रुपयांचा होतो. फायदा कुणाला ? तोटा कुणाला ?

इलेक्ट्रॉनिक मिडियाला कळकळीची विनंती, सरकारच्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी 'शक्यता' या शब्दाच्या आधारावर लक्ष्यात आणून देऊ नका. टीव्ही वर सतत चालणाऱ्या बातम्या बघून तुमच्या दबावाने सुद्धा सरकार निर्णय घायची तयारी करेल अर्थात तुमची तेवढी ताकद असते म्हणून म्हणलं.

तरीबी सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतावर पिकून तयार झालेल्या मालाची बाजार भावानुसार किंमत ठरवून ती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करा किंवा शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करायची तरी परवानगी द्या. साहेब, आता रोगापेक्षा ईलाजच भयंकर वाटायलाय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १८ फेब्रुवारी २०२१

Sunday, February 14, 2021

हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे विरा

एका प्रियकराला प्रियसीला सतत सांगावे लागत असते की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण संसारात मात्र ते सतत सांगायची गरज न पडू देणे हेच खरे प्रेम आहे. अडीच अक्षराच्या या शब्दावरच सारं जग उभं आहे. आता आपले आपण ठरवायचं इथे बसून राहायचं का उभं राहायचं. तसेही नाती, वय, रंग, भाषा, प्रांत, जात, धर्म, लिंग या सगळ्यांना भेदून ह्रदयावर ताबा मिळवणारी एकमेव गोष्ट जर कोणती असेल तर ती 'प्रेम' आहे. निसर्गाने बहाल केलेला हा जन्मसिद्ध हक्क मर्जीने मिळवण्यासाठी कुणाच्याही एन.ओ.सी ची गरज नसते फक्त दोन ह्रदयाचा निखळ संवाद हवा.
Do Love,
Take Love,
Spread Love.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०२१


बुचाडला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार

अखेर 'बुचाड' लघुचित्रपटाने पुरस्कारावर मोहर उमटवली
आज नॅशनल कमुनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल, तेलंगणा (आंध्रप्रदेश) मध्ये 'बुचाड'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मी शेतकरी वेशात स्वीकारून अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केलाय.

दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख 'बुचाड' या लघुचित्रपटात मांडले आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न होता, स्क्रिनिंगच्या वेळेस सर्वांच्या डोळ्यात आलेले पाणी आणि आज मिळालेल्या पुरस्काराने ते अधोरेखित झालंय.

फिल्म फेस्टिव्हल मधील सर्व नामवंत परीक्षकांचे मनापासून आभार, बुचाड च्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग नोंदवलेल्या प्रत्येकाचे आभार, इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टीमचे आभार आणि आमच्या सोबत पुरस्कार प्राप्त झालेल्या सहविजेत्यांचे अभिनंदन.

या नविन क्षेत्रात टाकलेल्या पहिल्याच पाऊलाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मान झालाय. यातून मिळालेला आत्मविश्वास आणि उत्साह भविष्यात माझ्याकडून अजून दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठीचे कारण ठरेल. दोस्तांनो, आमचे कष्ट आणि तुमच्या शुभेच्छा फळास आल्या. धन्यवाद !

लेखक तथा दिग्दर्शक : विशाल विजय गरड
दिनांक : १३ फेब्रुवारी २०२१
स्थळ : झहीराबाद, तेलंगणा (आंध्रप्रदेश)

Friday, February 12, 2021

विचारांची शिवजयंती २०२१

शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थिक सुबत्तेचे धोरण समजून सांगणे ही माझ्या व्याख्यानातली प्राथमिकता असेल.

शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला देखील स्पर्श केल्याशिवाय माझे व्याख्यान परिपुर्ण होणार नाही.
मी शिवचरित्रकार नाही ना कुणी ईतिहासतज्ञ. मी तर फक्त शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करून प्रबोधन करणारा एक सामान्य मावळा आहे.

शिवजयंतीचा हा संपुर्ण सप्ताह दिवसभर वाचन, चिंतन, मनन, प्रवास आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात जाणार आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत आहेत. तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या बळावर प्रबोधनाची मशाल अशीच तेवत राहील.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड

Tuesday, February 9, 2021

बुचाड लघूचित्रपटास नामांकन

काल दुपारी मी लेक्चर घेऊन नुकताच ऑफिस मध्ये आलो होतो. सध्या व्याख्यानासाठी नविन नंबर वरून अनेक फोन येत असतात तसाच एका नविन नंबर वरून एक कॉल आला. मी मोबाईल कानाला लावून हॅलो म्हणलो तेवढ्यात तिकडून आवाज आला. "Congratulation ! Mr.Vishal Garad, your film 'Buchad' is Nominated for award in National Community Media film festival at Telangana." खरंतर हे शब्द ऐकून माझ्यातल्या कलाकाराला एवढा आनंद झाला होता की तो चार दोन शब्दात मांडणे कठीण होते. पहिल्याच प्रयत्नाला मिळालेले हे यश स्वतःवरचा विश्वास वाढवणारे ठरलंय. बाकी १३ फेब्रुवारी रोजी झहीराबाद, तेलंगणा (आंध्रप्रदेश) येथे पुरस्काराची घोषणा होणार आहे. इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टिमने घेतलेले कष्ट आणि तुम्हा मायबाप कलारसिकांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर 'बुचाड' १३ तारखेला पुरस्कारावर नक्की नाव कोरेल अशी आशा ठेवुयात, तूर्तास नामांकन मिळालंय हे ही काही कमी नाही. We are hopeful.

लेखक तथा दिग्दर्शक : विशाल विजय गरड
दिनांक : ९ फेब्रुवारी २०२१


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...