Thursday, February 18, 2021

पुन्हा लॉकडाऊन नको

'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या
कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या अचुक निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांसह इतर व्यवसायिकांनी भोगलंय. 

ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय. कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.

लॉक डाऊन मध्ये जरी सरकार शेतमाल विक्रीला परवानगी देत असेल तरी व्यापारी मात्र फक्त लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीने माल विकत घेतात. शेतकऱ्याचा दहा रुपये किंमतीचा माल लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाईस्तोवर शंभर रुपयांचा होतो. फायदा कुणाला ? तोटा कुणाला ?

इलेक्ट्रॉनिक मिडियाला कळकळीची विनंती, सरकारच्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी 'शक्यता' या शब्दाच्या आधारावर लक्ष्यात आणून देऊ नका. टीव्ही वर सतत चालणाऱ्या बातम्या बघून तुमच्या दबावाने सुद्धा सरकार निर्णय घायची तयारी करेल अर्थात तुमची तेवढी ताकद असते म्हणून म्हणलं.

तरीबी सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतावर पिकून तयार झालेल्या मालाची बाजार भावानुसार किंमत ठरवून ती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करा किंवा शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करायची तरी परवानगी द्या. साहेब, आता रोगापेक्षा ईलाजच भयंकर वाटायलाय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १८ फेब्रुवारी २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...