Saturday, May 22, 2021

दिठी - चित्रपट समीक्षण

आश्विनी परांजपे यांनी "विशाल, हा चित्रपट आजच बघ आणि मला जीवनाबद्दल तुला काय वाटते ते कळव असे सांगितले." मग काय मी देखील तितक्याच उत्सुकतेने सुमित्रा भावे कृत आणि डॉ.मोहन आगाशे निर्मित 'दिठी' हा मराठी चित्रपट सोनी लिव्ह वर पाहिला. एवढा सुंदर चित्रपट पाहायला सुचवल्याबद्दल पहिल्यांदा अश्विनीचे आभार मानतो.

काळ्या कागदावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाने चित्र रेखाटावी अशी जिवंत सिनेमॅटोग्राफी डोळ्यांची बाहुली सुद्धा हिकडं तिकडं हालू देत नव्हती. प्रत्येक फ्रेम जणू काळजावर छापणारी; अर्थात सुमित्रा भावेचा चित्रपट म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या कलाकृतीचा आत्माच असतात. विशेष करून प्रकाश यंत्रणा आणि ध्वनीमुद्रनावर त्यांचे असलेले प्रेम सतत अधोरेखित होत राहतं.

रामजीची भूमिका साकारलेले किशोर कदम यांनी डोळ्यांनी बोललेले डायलॉग अंगावर काटा आणतात. दिलीप प्रभावळकर, गिरीष कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, कैलास वाघमारे, ओंकार गोवर्धन, उत्तरा बावकर आणि अंजली पाटील या सर्वांचा अभिनय पडणाऱ्या पावसाएवढा निर्मळ झालाय. तसेच गार्गी कुलकर्णी, धुमाळ काका, देविका दफ्तरदार यांच्या काही सेकंदाच्या भूमिकेनेही प्रभाव टाकलाय. सुनिल वडकेंनी अप्रतिम कॅलिग्राफी केलीय. चित्रपटाच्या सर्व विभागाच्या टिमने चोख कामगिरी बजावली आहे.

"आसच कर्तृत हाय देवाचं, एकएकट्याला गाठून मारतंय आन एकएकट्यालाच देतंय जनम"."तरी बरंय देवाने माणसाला इसराळू केलंय, नाहीतर जन्मभर फाटलेल्या पतंगाचं दुःख इसरलं असतं काय ?"
जोशी बुवा, गोविंदा आणि संतु वाणी यांचा पडत्या पावसातला हा संवाद लेखकाला नेमकं काय सांगायचंय हे दर्शवतो. "तू कशाला लुडबुड करतो रं मदी, जाऊन बस की तिकडं वळचणीला" शिवाने कैलासला बोललेल्या या एका वाक्यात 'घरी दारिद्र्य असले तरी अस्पृश्यता डोक्यातून जात नाही' हा विचार नकळतपणे गडद होऊन जातो. सगुणेच्या पोटाला कान लावून तिच्याशी संवाद साधताना रामजीने अख्या आकाशगंगेची फिलॉसॉफी समजून सांगितली आहे. 'जनम असाच असतो मरणाला शिवून येणारा' या वाक्यात जन्म मृत्यूचा परस्पर घनिष्ठ संबंध व्यक्त केलाय. शंकर पार्वतीने दिलेल्या इच्छापूर्ती मणीकडे पारुबाई स्वतःसाठी पंचपक्वान, सोने-नाणे आणि लुगडं मागते, सगुणेला कालवडच व्हावी अशी इच्छा ठेवते यातून माणवाची स्वार्थी वृत्ती ठळक होते. मग संबंध विश्वासाठी मागणे मागणारे संत ज्ञानेश्वर कुठे आणि आजचा माणूस कुठे ? याचे उत्तर सहज मिळून जाते.

अवघी अकरा माणसे आणि तीन प्राणी घेऊन एका कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या जगण्याच्या अनुभवातून हा जगाचा उत्सव कसा साजरा केला पाहिजे याचे सार 'दिठी' मध्ये मांडले आहे. दुःखावर अध्यात्म कसे औषध म्हणून काम करते, ढस ढसा रडल्यावर कसे दुःख कमी होते आणि आयुष्यातल्या सगळ्या सुख दुःखाची उत्तरे कशी पोथी मध्ये सापडतात हे दिठी मध्ये अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थ चित्रपटातुन सांगण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय.

या चित्रपटातले सगळे कलाकार मुळातच अभिनयाचे बाप आहेत आणि या संपूर्ण कलाकृतीची आई म्हणजेच सुमित्रा भावे आहेत. आज सुमित्रा ताई हयात असत्या तर हे माझे मोडके तोडके पसाभर शब्द नक्कीच त्यांच्या पदरात टाकले असते. माझे निरीक्षण हाच माझा शिक्षक आहे. सुमित्रा भावेंचा सहवास लाभला नाही पण त्यांच्या अजरामर कलाकृतीतून मला खूप काही शिकायला मिळतंय भविष्यात माझ्या कलाकृतीतही जेव्हा सुमित्रा भावेंच्या दिग्दर्शनाची झलक दिसेल तेव्हा समजून जायचे आईची छबी लेकरात दिसायली म्हणून. सुमित्राजी तुम्ही शरीराने गेलात आम्ही तुम्हाला कलेतून जिवंत ठेवुत.

दिठी पाहून मला उमगलं की,
जन्माला कुठं आन् काय म्हणून यायचं, कुठवर जगायचं आणि कधी मरायचं हे आपल्या हातात नसतं. आयुष्य जसं क्षणभंगुर आहे तसंच दुःख देखिल क्षणभंगुर असतं तेव्हा दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा गमावलेले सोडून जे शिल्लक राहिले त्यासोबतच जगण्याचा उत्सव साजरा करायचा. सुख दुःख योग्य वेळी पचवता आलं की प्रत्येकाचे आयुष्य सुंदर होतं. आज मावळलेलं तांबडं उद्या  पहाट म्हणून उगवतं.

विशाल गरड
दिनांक : २२ मे २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...