लेखक गिरीश कुबेरांचा खोडसाळपणा 'रिनायसन्स स्टेट' या पुस्तकाच्या मुखपृष्ठातच उघड होतो. दुर्जनांचा विनाश करणारी, मुघली सल्तनतला आव्हान देणारी, गोर गरिबांचे रक्षण करणारी आणि आभाळाकडे उंचावलेली शिवरायांची तलवार जेव्हा त्यांनी जमिनीवर टेकवलेली दाखवली तेव्हाच त्यांच्या डोक्यातल्या असूया बाहेर पडल्या. काहीतरी नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ करण्याच्या नादात त्यांनी महाराजांचा अभाळाएवढा पराक्रम जमिनीवर टेकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलाय. कित्येकांच्या हे लक्षात पण येणार नाही पण मीही एक चित्रकार, कलाकार आणि लेखक आहे त्यामुळे एखाद्या चित्राच्या मागची मानसिकता ओळखू शकतो. खरं तर हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच मला शंका आली होती की यात वादग्रस्त मजकूर असणार आणि अंदाज खरा ठरला.
गिरीशजी, तुम्ही एका प्रसिद्ध दैनिकाचे संपादक आहात म्हणजे तुमच्याकडे शहाणपणा असेलच असे नाही. असला असता तर कसलाही प्रबळ पुरावा नसताना 'छत्रपती संभाजी महाराजांनी सोयरा महाराणी साहेबांचा खून केला' हा धाधांत खोटारडा मजकूर तुम्ही पुस्तकात लिहिण्याचा अतिशहानपणा केला नसता. इतर विषयावरचे तुमचे लिखाण प्रसिद्ध वगैरे असेलही, तुमचे कित्येक अग्रलेखही गाजले असतील पण या पुस्तकाच्या बाबतीत मात्र एका विशिष्ठ वर्गात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायची होती हे स्पष्ट झालंय.
मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आधीच खूप कमी इंग्रजी पुस्तके छापली गेली आहेत. त्यात गिरीश कुबेर यांचे इंग्रजी पुस्तक येतंय म्हणल्यावर आपल्या राजाचा इतिहास इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे वाटले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या नावाच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन तुम्हाला दुसरेच चित्र रंगवायचे होते हे माहीत नव्हते. अहो आधीच आपला मराठी माणूस इंग्रजी साहित्य कमी वाचतो, त्यात कुबेरांचे अभ्यासपूर्ण पुस्तक येतंय म्हणल्यावर जरा आशा होत्या पण तुम्ही नुसता भ्रमनिरासच नाही तर घात केलाय शिव शंभू भक्तांचा.
सदर पुस्तकातील इतर मजकूरावर आमचा आक्षेप नाही. यात काही चांगल्या गोष्टीही असतील पण छत्रपती संभाजी महाराजांवर केलेला मातृहत्येचा खोटा आरोप एक शिवभक्त या नात्याने आम्ही कदापी खपवून घेणार नाही. या पुस्तकातून चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे या विचारांती कुबेरांनी त्यांच्या या पुस्तकातून वादग्रस्त भाग वगळून नवीन आवृत्ती प्रकाशित करावी, संपूर्ण पुस्तकात स्वराज्याच्या दोन्ही महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, त्यांच्या नावाआधी 'छत्रपती' लिहिण्याचे कष्ट घ्यावे. अन्यथा ज्या लेखणीने तुम्ही हिरो झालात तीच लेखणी तुम्हाला व्हिलन ठरवेल.
विशाल गरड
दिनांक : २३ मे २०२१
No comments:
Post a Comment