Friday, July 30, 2021

एक निमंत्रण आशीर्वादासाठी

माझ्या आजवरच्या सगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलाय. माझ्या सारख्या युवा लेखकावर तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आजवर माझा लेखप्रपंच पाच पुस्तके प्रकाशित करण्यापर्यंत जाऊन ठेपला. 'हृदयांकित' आणि 'रिंदगुड' या दोन्ही पुस्तक प्रकाशनावेळी बार्शीतले सर्वात मोठे यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह तुडुंब भरून तुम्ही दिलेला प्रतिसाद आजीवन स्मरणात राहील असाच होता. 

बाटुकचे प्रकाशन सुद्धा तुमच्या प्रेमाच्या गर्दीत करायची इच्छा होती पण कोविड नियमावलीमुळे तुम्हा सर्वांना जाहीर निमंत्रण द्यायची मनापासून इच्छा असूनही ते करता येत नाही. पुस्तक प्रकाशन हा एक वैचारिक उंची असलेला कार्यक्रम असतो उलट अशा कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावायला हवी, आयुष्य बदलून जायला एखादे पुस्तकच काय पण त्या पुस्तकातले एखादे वाक्य देखील पुरेसं असतं. म्हणूनच मी प्रकाशन सोहळे करीत आलो. पण सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही कार्यक्रमास मोठे स्वरूप देणे संयुक्तिक ठरणार नाही म्हणूनच बाटुकचा प्रकाशन सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या आणि निमंत्रितांच्या  उपस्थितीत छोटेखानी स्वरूपात पार पाडत आहे.

मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात माझ्या एका तरी पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी इच्छा होती. बाटुकच्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे आणि विशेष म्हणजे श्री शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर कॉलेज जीवनातले पाहिले लेक्चर मी ज्या हॉलमध्ये अनुभवले त्याच हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. त्या हॉल मधील बेंचवर बसून भविष्यात आपण कधी एखादे पान तरी लिहु असे वाटले नव्हते तिथेच माझे पाचवे पुस्तक प्रकाशित होतंय. कर्मवीर मामांच्या संकुलात संपन्न होणारा हा क्षण आणि सोहळा सदैव स्मरणात राहील. बाकी तुमच्या आशिर्वाद, प्रेम आणि सदिच्छांचा मी सदैव भुकेला.

विशाल गरड
दिनांक : ३० जुलै २०२१

Thursday, July 29, 2021

शेतीसंस्कृती

साऊ दिड वर्षाची झालीय तिच्या मेंदूवर छापलेली मराठी भाषा आता तोडक्या मोडक्या शब्दात आणि बोबड्या आवाजात उमटू लागली आहे. सांगितलेले सगळं तिला कळायला लागलंय. मोठ्यांच्या कृतीचे अनुकरण करायला तिच्याकडून सुरुवात झाली आहे, त्यामुळेच आज घरच्या अंगणाचा उंबरठा ओलांडून शेती संस्कृतीचा सिलॅबस शिकवण्यासाठी साऊला दुचाकीवर शेतात फिरायला घेऊन गेलो. जाता येता रस्त्याने हजारो गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. शेतात गेल्यावर कुत्र्याचे भौ भौ, गाईचा हंब्या, पक्ष्यांची चिऊ चिऊ, मांजराचे म्याव म्याव, वाऱ्याचा जुई जुई आवाज, फुलांचा सुगंध, विहिरीतले पाणी, हे सगळं तिने लाईव्ह अनुभवलं.

विरा रोज साऊला ज्या गाईचे दूध पाजते, आज तेच दूध नेमकं कुठून येतं आणि कसं काढलं जातं हे तिने प्रत्यक्ष पाहिले. आमचे आबा जेव्हा गाईची धार काढायला बसले तेव्हा तर साऊ एकटक सडातून बादलीत पडणारी दुधाची धार कुतूहलाने पाहत बसली. धारेचा आवाज ऐकण्यात ती तल्लीन झाली. शेतातल्या अनेक जिवंत गोष्टींशी तिचा संवाद आणि सहवास झाला. आपल्या ग्रामीण सांस्कृतीला फार मोठा इतिहास आहे ती शाश्वत आणि पौष्टीक आहे. वाढते शहरीकरण आणि वेस्टर्न लाईफच्या जाळ्यातून आपली सुटका होणे शक्य नसले तरी कधी कधी जमेल तसे आपल्या लेकरांची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा.

विशाल गरड
दिनांक : २९ जुलै २०२१

Wednesday, July 28, 2021

तारीख ठरली

'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया मध्ये गायला'. हे वाक्य काळजात रुतून बसलं होतं. मी आण्णांचे समग्र साहित्य वाचायला सुद्धा हेच वाक्य कारणीभूत ठरलं. ज्या परिस्थितीतुन अण्णांनी तब्बल साठ पुस्तकांची निर्मिती केली त्याला कालही तोड नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. त्यांची एक तरी जयंती आयुष्यभर लक्षात राहील अशी साजरी करायची इच्छा होती. अखेर साहित्यरत्नाच्या जयंतीला एक साहित्यकृती जन्माला घालण्यापेक्षा भारी आदरांजली अजून काय असू शकते; म्हणूनच अण्णाभाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १ ऑगस्ट रोजी माझे आगामी 'बाटुक' हे नवीन पुस्तक प्रकाशित करतोय. आशिर्वाद असुद्या.

विशाल गरड
दिनांक : २८ जुलै २०२१



Sunday, July 25, 2021

माने साहेब

मैत्रीला वय नसतं हे वाक्य ज्या माणसाकडे पाहून जगता येते ते म्हणजे लोकमतचे मा.संपादक, जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत राजा माने साहेब होय. ते जेव्हा पण भेटतात तेव्हा जिवलग मित्राला भेटल्याचा फिल देतात. आज खूप दिवसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सप्रेम भेट घेतली. दिलखुलास गप्पा मारल्या, मार्गदर्शन आणि आशिर्वाद घेतले. साहेबांबरोबर काही वेळ जरी घालवला तरी हजार माणसांना भेटल्याचे समाधान भेटते. माने साहेबांचे मैत्र संबंध म्हणजे जणू मोहोळ आहे. महाराष्ट्रातले कोणतेही क्षेत्र निवडा त्या क्षेत्रातील शे पाचशे जिवलग माणसं माने साहेबांनी जोडलेली सापडतील. बाकी माने काकूंनी केलेला चहा एवढा अप्रतिम झाला होता की खास चहा साठी पुन्हा एकदा त्यांच्या घराची पायरी चढावी लागेल.

विशाल गरड
दिनांक : २५ जुलै २०२१

Tuesday, July 13, 2021

चष्मा

आजवर डोळ्यांना खूप ताण दिलाय, अजूनतरी चष्मा लागलेला नाही पण आज एका मित्राला चष्मा घेण्यासाठी सोबत गेलो असता हा फोटो सहज क्लिक केला. भन्नाट बुजुर्ग लूक आलाय. तसेही लेखकाचा आणि चष्म्याचा खूप जवळचा संबंध असतो, अजून काही वर्षांनी मीही याला अपवाद नसेल. तूर्तास तरी दोन्ही डोळ्यांना लांबचे आणि जवळचे सुस्पष्ट दिसतेय. पुस्तकांनी दृष्टी दिलीए खरी पण भविष्यात वयोमानानुसार जरी नजर कमी झालीच तरी वाचनाचा आणि लिखाणाचा छंद जोपासायला चष्मा नावाचा मित्र नक्कीच सोबत असेल.

विशाल गरड
दिनांक : १३ जुलै २०२१

Sunday, July 11, 2021

पुनःश्च हरिओम

पुनःश्च हरिओम हा मराठी चित्रपट आज झी टॉकीजवर आम्ही सहकुटुंब पाहिला. आपल्यापैकी बहुतांशी जणांनी अनुभवलेलं हे कथानक माझा प्रिय दोस्त विठ्ठल आणि स्पृहाच्या दमदार अभिनयाने सजवलं गेलंय. सर्वच सहकलाकारांचा अभिनय दर्जेदार झाला असून या चित्रपटातले खूप सारे प्रसंग थेट आपल्या हृदयाला भिडणारे आहेत. शेवटी जेव्हा दिपालीच्या हातात तो चेक ठेवला जातो तेव्हा डोळ्यातील अश्रूंना बाहेर या म्हणायची गरजच पडत नाही ते आपसूक ओघळतात. संसाराला दोन चाके असतात त्यातलं एक बाहेर फिरत असतं तर एक घरातल्या घरातच फिरत असतं, बायको नावाच्या चाकाला विनाकारण ब्रेक लावण्यापेक्षा जर त्याला आपल्यासोबत फिरण्याची मुभा दिली तर संसाराची गाडी सुसाट धावायला मदत होते. हेच पुनःश्च हरी ओम पाहून अधोरेखित होतं.

चित्रपटाची शूटिंग म्हणलं तर सोपी म्हणलं तर तितकीच अवघड होती, लोकेशन्स फार नसल्या तरी वादळ आलेला सीन आणि रेसिपी तयार करतानाचे शूटिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगावकर याने मोठ्या खुबीने केलं आहे. प्रत्येक फ्रेम मधली विविधता विविधने खूप सुंदररित्या टिपली आहे. स्पृहाच्या शब्द उच्चाराचा मी पहिल्यापासूनच फॅन आहे म्हणूनच तिला नुसतं बोलताना पाहणे सुद्धा आमच्यासाठी स्पृहणीय गोष्ट असते. दिपालीची भूमिका तिने मस्त साकारली आहे. विठ्ठलने सुद्धा रवीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय. बॉक्स ऑफिसवर मसाला असलेले चित्रपट गल्ला जमवतात हे 'झी'ला चांगलं ठाऊक आहे तरीदेखील लॉकडाऊन मधलं सर्वसामान्य लोकांचं जगणं दाखवण्यासाठी 'झी'ने केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

याआधी 'राक्षस' आणि 'कागर' सारख्या चित्रपटातून विठ्ठल काळेला आपण पाहिलेच असेल. चितळेच्या जाहिरातीतला एस.टी ड्रायव्हर सुद्धा तुम्ही विसरला नसालच. शॉर्ट फिल्मस वगैरे म्हणाल तर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या 'काजरो'सह शेकडो शॉर्ट फिल्मस विठ्ठलच्या अभिनयाने सजल्या आहेत. सई ताम्हणकर, रिंकू राजगुरूसह आजपर्यंत कितीतरी आर्टिस्ट सोबत विठ्ठलने स्क्रिन शेअर केली आहे. बार्शी तालुक्यातील पानगाव सारख्या छोट्याशा गावातुन सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच गावातल्या प्रत्येक टीव्हीवर दिसण्या इतपत येऊन ठेपलाय हे प्रचंड अभिमानाने सांगण्यासारखं आहे.

विठ्ठलच्या नावात 'ठ' ला 'ठ' जितकं घट्ट चिटकलंय तेवढंच घट्ट त्याचा अभिनय सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाला चिटकला आहे. काही अभिनेते चार दोन चित्रपट करतात आणि लुप्त होऊन जातात पण विठ्ठल म्हणजे दगडावर उगवलेलं झाड आहे जे दुष्काळात सुद्धा तग धरेल म्हणूनच राजकारणात जसे काही नेते मंडळी सरपंच ते केंद्रीय मंत्री पर्यंतचा प्रवास करतात तसाच विठ्ठलचा ज्युनिअर आर्टिस्ट ते लीड रोल पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. विठ्ठलचा स्ट्रगल एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल एवढा जबरदस्त आहे पण त्याला दुःखाचे आणि परिस्थितीचे भांडवल करायला आवडत नाही म्हणून त्याच्या आयुष्यातला संघर्ष काळ लिहिणे मी मुद्दामच टाळतो. अभिनयावर असलेली विठ्ठलची भक्ती त्याला अजून मोठी उंची प्राप्त करून देईल यात शंकाच नाही.

आपण कितीही मोठ्या पडद्यावर दिसोत पण जोपर्यंत आपण आपल्या घरातल्या टिव्हीत दिसत नाहीत तोपर्यंत हिरो झाल्याचा फिल येत नाही; मला वाटतं तो फिल आज विठ्ठलने घेतला असावा. या आधीही तो कितीतरी चित्रपटातून टीव्हीवर येऊन गेलाय पण झी सारख्या बड्या बॅनरखाली मुख्य भूमिकेत झळकण्याची ही त्याची पहिलीच वेळ त्यामुळे त्याने आज काही तासातच करोडो हृदय जिंकली आहेत. दोस्ता असंच जिंकत राहा.

विशाल गरड
दिनांक : ११ जुलै २०२१

Thursday, July 8, 2021

वृक्षप्रेमी कादंबरी

आमच्या हेमा आन्टी घरासमोरील झाडांना पाणी देत होत्या, साऊ जवळच वडाच्या झाडाखाली खेळत बसली होती. खेळता खेळता ती तिच्याकडे पाणी देताना पाहत होती, विरा घरात काहीतरी काम करत असल्याने तिने माझी ड्युटी साऊकडे लक्ष द्यायला लावली होती त्यामुळे मी झाडाखालील कट्ट्यावर बसून साऊचे दुडू दुडू चालणे न्याहाळत होतो, तेवढ्यात आन्टी पाईप खाली टाकून नळ बंद करण्यासाठी घरात गेल्याचे साऊने पाहिले आणि ती पळतच पाईपकडे गेली. तिने खाली पडलेला पाईप उचलून  झाडांच्या आळ्यात धरला आणि पाईपमधून झाडांच्या बुडाशी पडणारे पाणी कुतूहलाने पाहू लागली. साऊची ही कृती पाहून मी पळतच जाऊन हा क्षण मोबाईल मध्ये टिपला. शेवटी बापाचे काळीज ते, लेकीच्या एवढ्याशा गोष्टीचे सुध्दा कौतुक वाटणारंच की.

लहान लेकरांच्या मेंदूची ताजी ताजी निरीक्षण शक्ती आपल्यापेक्षा कैकपट जास्त असते. मोठ्यांच्या कितीतरी कृती, हावभाव, देहबोली आणि भाषा ती फक्त निरीक्षणातून शिकत असतात. पालकांनी लेकरांवर आवर्जून संस्कार करायची गरज नसते, आपण आपली कृती करत राहायची; लेकरं त्यांची ती शिकत राहतात. अर्थात निसर्गाने ती ताकद प्रत्येक सजीवाच्या पिल्लांना दिलेलीच असते. लेकराच्या वाढीची सुरुवातीची तीन चार वर्ष फार महत्वाची असतात यात त्यांच्या कोऱ्या मेंदूवर जे काही छापलं जातं ते खूप ठळकपणे उमटतं. मग पालक म्हणून आपणच ठरवायचं काय उमटलं पाहिजे आणि काय नाही ते.

विशाल गरड
दिनांक : ८ जुलै २०२१

Sunday, July 4, 2021

घटस्फोट

लग्नानंतर नवरा बायकोने परस्पर संमतीने कायदेशीर वेगळे होण्याच्या प्रक्रियेला घटस्फोट असे म्हणतात. इंग्रजीत याला डिवोर्स, हिंदीत तलाख तर मराठीत घटस्फोट आणि गावाकडच्या भाषेत काडीमोड म्हणतात. खरं म्हणजे नवरा बायकोचा संसार म्हणजे दारुगोळा भरलेलं एक गोदाम असतं ज्यात छाटूर मुटूर ठिणग्या नेहमीच पडत असतात आणि ताड ताड वाजून विझून पण जात असतात पण जर का कधी त्या गोदामाची मुख्य वात पेटली तर मात्र एक मोठा स्फोट होतो ज्याला आपण घटस्फोट म्हणतो. तसं तर दारूगोळा भरलेल्या गोदामाची वात अगदी छोट्या मोठ्या कारणानेही पेटू शकते, कुणी ती धुमसत ठेवतात तर कुणी लगेच विझवून टाकतात. ती वात दारूगोळ्या पर्यंत पोहोचु नये यासाठी बहुतांशीजणांची कसरत सुरू असते.

पेटलेल्या वातीवर एकाने पाय द्यायचा आणि त्याने पाय काढला की लगेच दुसऱ्याने फुंकर घालून ती पेटवत राहायचं अशाने स्फोट व्हायचा थांबेल का ? एक तर ती वात पेटुच नये याची काळजी घेतली पाहिजे, त्यातूनही पेटलीच तर ती दोघांनीच विझवली पाहिजे. कधी कधी हीच वात जरी इतरांनी विझवण्यासाठी प्रयत्न केला तरी मनात मात्र ती तशीच धुमसत राहिल्याने पुढे केव्हातरी स्फोट होण्याची शक्यता असतेच. अनैतिक संबंध, नपुंसकता, कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक आणि संपत्ती यापलीकडेही घटस्फोटाची असंख्य कारणे असतात जी प्रत्येकाची वेग वेगळी असू शकतात. घटस्फोट हा ज्याचा त्याचा खूपच वैयक्तिक विषय असला तरी इतरांच्या खाजगी गोष्टींबद्दल चर्चा करणे हा आपला आवडीचा विषय असतो. अशा घटना कानावर पडल्या की जो तो त्यांच्या नात्याला आपल्या नात्याशी जोडून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो मात्र माणसाच्या वागण्याचे अनेक रंग असल्याने त्याचा नेमका थांगपत्ता लागणे कठीण जाते.

पाश्चात्य देशात लग्न आणि घटस्फोट या गोष्टींचा आपल्या एवढा बाऊ केला जात नाही. जसे परस्पर पसंतीने लग्न होते तसेच परस्पर संमतीने तिथे घटस्फोटही होतात. तिथल्या नातेवाईकांना, लेकरांनाही हे अजिबात नवीन नसतं, तिथल्या दैनंदिन आयुष्यातला हा एक भाग आहे. कदाचित तिथला संस्कारच तसा असल्याने याचे त्यांना नवीन वाटत नाही पण पती परमेश्वर मानणाऱ्या आपल्या देशात घटस्फोट म्हणले की बॉम्बस्फोट झाल्या इतकाच धक्का बसतो आणि आपणही घटस्फोटित व्यक्तीकडे त्याने जणू काय अपराध केल्यासारखे पाहतो. त्यांच्या या निर्णयाच्या मुळाशी किती दुःख असू शकतं ? याची आपण कल्पना करू शकत नाही त्यामुळे बदलत्या काळानुसार घटस्फोटित महिला किंवा पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणही बदलायला हवा. उगाच, लोक काय म्हणतील, मुलं बाळं काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील या भीतीने मन मारून फक्त दिखाव्यासाठी खोटारडा संसार करणारे आपल्याकडे कमी नाहीत, तसेच बायकांना वैतागलेले नवरे आणि नवऱ्याला वैतागलेल्या बायकाही कमी नाहीत. नात्यातले प्रेम संपल्यावर बळजबरीने एकत्र राहण्याला अर्थ असतो का ? तोही एकप्रकारे समाजमान्य बलात्कार ठरत नाही का ? 

मन मारून, तन मारून फक्त लोक काय म्हणतील या दबावाखाली संसार करणारे, नवऱ्याचा अत्याचार सहन करणाऱ्या बायका किंवा बायकांचा अत्याचार सहन करणारे नवरे घटस्फोटाचे भुकेले असतात पण 'लोक काय म्हणतील' या साखळदंडाने त्यांच्या पायाला अशा काही बेड्या ठोकलेल्या असतात की अखेर ते मरण पत्करतात पण घटस्फोट घेत नाहीत. संसाराच्या काडी मोडीचा निर्णय हा दुर्दैवीच पण भरपूर वेळ देऊनही जर नात्याला प्रेमाचा अंकुर फुटत नसेल तर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन आपापल्या इच्छेनुसार आनंद शोधणे केव्हाही चांगले. बाकी संसाराच्या गाठी जरी देवाघरी बांधल्या जात असल्या तरी त्या सोडण्याचा किंवा घट्ट करण्याचा अधिकार मात्र देवाने त्या दोघांनाच दिलेला आहे तेव्हा त्यांनीच ठरवायचं संसाराला प्रेमाची माळ घालून सजवायचं, की त्याचा जाळ करायचा. त्याच जाळावर भाकरी थापत राहायचं, का घटस्फोट घेऊन दुसरं घर बांधायचं ? आपण फक्त शुभेच्छा द्यायच्या.

विशाल गरड
दिनांक : ४ जुलै २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...