Sunday, July 4, 2021

घटस्फोट

लग्नानंतर नवरा बायकोने परस्पर संमतीने कायदेशीर वेगळे होण्याच्या प्रक्रियेला घटस्फोट असे म्हणतात. इंग्रजीत याला डिवोर्स, हिंदीत तलाख तर मराठीत घटस्फोट आणि गावाकडच्या भाषेत काडीमोड म्हणतात. खरं म्हणजे नवरा बायकोचा संसार म्हणजे दारुगोळा भरलेलं एक गोदाम असतं ज्यात छाटूर मुटूर ठिणग्या नेहमीच पडत असतात आणि ताड ताड वाजून विझून पण जात असतात पण जर का कधी त्या गोदामाची मुख्य वात पेटली तर मात्र एक मोठा स्फोट होतो ज्याला आपण घटस्फोट म्हणतो. तसं तर दारूगोळा भरलेल्या गोदामाची वात अगदी छोट्या मोठ्या कारणानेही पेटू शकते, कुणी ती धुमसत ठेवतात तर कुणी लगेच विझवून टाकतात. ती वात दारूगोळ्या पर्यंत पोहोचु नये यासाठी बहुतांशीजणांची कसरत सुरू असते.

पेटलेल्या वातीवर एकाने पाय द्यायचा आणि त्याने पाय काढला की लगेच दुसऱ्याने फुंकर घालून ती पेटवत राहायचं अशाने स्फोट व्हायचा थांबेल का ? एक तर ती वात पेटुच नये याची काळजी घेतली पाहिजे, त्यातूनही पेटलीच तर ती दोघांनीच विझवली पाहिजे. कधी कधी हीच वात जरी इतरांनी विझवण्यासाठी प्रयत्न केला तरी मनात मात्र ती तशीच धुमसत राहिल्याने पुढे केव्हातरी स्फोट होण्याची शक्यता असतेच. अनैतिक संबंध, नपुंसकता, कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक आणि संपत्ती यापलीकडेही घटस्फोटाची असंख्य कारणे असतात जी प्रत्येकाची वेग वेगळी असू शकतात. घटस्फोट हा ज्याचा त्याचा खूपच वैयक्तिक विषय असला तरी इतरांच्या खाजगी गोष्टींबद्दल चर्चा करणे हा आपला आवडीचा विषय असतो. अशा घटना कानावर पडल्या की जो तो त्यांच्या नात्याला आपल्या नात्याशी जोडून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो मात्र माणसाच्या वागण्याचे अनेक रंग असल्याने त्याचा नेमका थांगपत्ता लागणे कठीण जाते.

पाश्चात्य देशात लग्न आणि घटस्फोट या गोष्टींचा आपल्या एवढा बाऊ केला जात नाही. जसे परस्पर पसंतीने लग्न होते तसेच परस्पर संमतीने तिथे घटस्फोटही होतात. तिथल्या नातेवाईकांना, लेकरांनाही हे अजिबात नवीन नसतं, तिथल्या दैनंदिन आयुष्यातला हा एक भाग आहे. कदाचित तिथला संस्कारच तसा असल्याने याचे त्यांना नवीन वाटत नाही पण पती परमेश्वर मानणाऱ्या आपल्या देशात घटस्फोट म्हणले की बॉम्बस्फोट झाल्या इतकाच धक्का बसतो आणि आपणही घटस्फोटित व्यक्तीकडे त्याने जणू काय अपराध केल्यासारखे पाहतो. त्यांच्या या निर्णयाच्या मुळाशी किती दुःख असू शकतं ? याची आपण कल्पना करू शकत नाही त्यामुळे बदलत्या काळानुसार घटस्फोटित महिला किंवा पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणही बदलायला हवा. उगाच, लोक काय म्हणतील, मुलं बाळं काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील या भीतीने मन मारून फक्त दिखाव्यासाठी खोटारडा संसार करणारे आपल्याकडे कमी नाहीत, तसेच बायकांना वैतागलेले नवरे आणि नवऱ्याला वैतागलेल्या बायकाही कमी नाहीत. नात्यातले प्रेम संपल्यावर बळजबरीने एकत्र राहण्याला अर्थ असतो का ? तोही एकप्रकारे समाजमान्य बलात्कार ठरत नाही का ? 

मन मारून, तन मारून फक्त लोक काय म्हणतील या दबावाखाली संसार करणारे, नवऱ्याचा अत्याचार सहन करणाऱ्या बायका किंवा बायकांचा अत्याचार सहन करणारे नवरे घटस्फोटाचे भुकेले असतात पण 'लोक काय म्हणतील' या साखळदंडाने त्यांच्या पायाला अशा काही बेड्या ठोकलेल्या असतात की अखेर ते मरण पत्करतात पण घटस्फोट घेत नाहीत. संसाराच्या काडी मोडीचा निर्णय हा दुर्दैवीच पण भरपूर वेळ देऊनही जर नात्याला प्रेमाचा अंकुर फुटत नसेल तर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन आपापल्या इच्छेनुसार आनंद शोधणे केव्हाही चांगले. बाकी संसाराच्या गाठी जरी देवाघरी बांधल्या जात असल्या तरी त्या सोडण्याचा किंवा घट्ट करण्याचा अधिकार मात्र देवाने त्या दोघांनाच दिलेला आहे तेव्हा त्यांनीच ठरवायचं संसाराला प्रेमाची माळ घालून सजवायचं, की त्याचा जाळ करायचा. त्याच जाळावर भाकरी थापत राहायचं, का घटस्फोट घेऊन दुसरं घर बांधायचं ? आपण फक्त शुभेच्छा द्यायच्या.

विशाल गरड
दिनांक : ४ जुलै २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...