Tuesday, August 24, 2021

जाऊंद्या ना !

नेतेमंडळी वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने करतात, प्रसार माध्यमे तेच ते अधोरेखित करून दाखवत राहतात. पक्षप्रेमापोटी किंवा व्यक्तिप्रेमापोटी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आमने सामने टोकाचा विरोध करतात. त्यातून जो संघर्ष आणि लढाई होते त्यात सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्तेच धारातीर्थी पडतात. अशा वेळी मग मिर्झापुर मधला हा डायलॉग आठवतो "जब कुर्बानी देणे का टाईम आये तो, कुर्बानी सिपाही की दि जाती है, राजा और राजकुमार तो जिंदा रेहते है गद्दीपे बैठणे के लिये."

Thursday, August 19, 2021

लग्नाचा तिसरा वाढदिवस

विरा सोबत संसार थाटून आज तीन वर्षे पूर्ण झाली. प्रथमतः लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त विराला मनःपूर्वक शुभेच्छा. प्रेम, जिव्हाळा, काळजी, आपुलकी, आदर यासोबतच रुसणं, फुगणं, रागावणं, रडणं, चिडणं हे सुद्धा संसाराचे अलंकार असतात हे धारण केल्याशिवाय कोणताच संसार परिपूर्ण होत नाही. लग्नाच्या पहिल्या वाढदिनी ती 'बायको' होती, दुसऱ्या वाढदिनी ती 'आई' झाली आणि आता तिसऱ्या वाढदिनी ती माझी चांगली 'मैत्रीण' झालीये. मैदानावर पळण्याची शर्यत जशी एक, दोन, साडे माडे तीन म्हणले की सुरू होते तशीच संसाराची खरी शर्यत सुद्धा वरील तीन टप्प्यानंतर सुरू होते. या शर्यतीत कुणा एकाने हरणे जिंकणे संयुक्तिक नसून दोघांनी सोबत जिंकण्यातच खरे यश आहे.

बायको जेव्हा आपली चांगली मैत्रीण होते तेव्हा नात्यातली लवचिकता आणखीन वाढते त्यामुळे नाती तुटण्याची शक्यता कमी होते. अनेक सात्यिकांनीही संसाराला वेलीची उपमा देण्याचे कारणही हेच असावे असे मला वाटते. वादळ वाऱ्यात मोठं मोठी झाडं उन्मळून पडतात पण वेल मात्र तुटत नाही. संसारात अशी अनेक वादळे येत जात असतात फक्त आपण आपला संसाराचा वेल फुलवत ठेवायचा. बाकी आज आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता एकमेकांचे नवरा बायको म्हणून घेण्यापेक्षा कादंबरी उर्फ साऊचे आई बाबा म्हणून घेण्यात जास्त आनंद वाटतोय.

आज पहाटेपासून आपण आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहात. इच्छा असतानाही प्रत्येकाला धन्यवाद देऊ शकत नाही म्हणून या पोस्टच्या शेवटी आम्हाला दिलेल्या आणि देणार असलेल्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद !

विशाल गरड
दिनांक : १९ ऑगस्ट २०२१

मातोश्री वृद्धाश्रमात व्याख्यान

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मातोश्री वृद्धाश्रमात "वृद्धपकाळातील आनंदाचा शोध" या विषयावर माझे व्याख्यान संपन्न झाले तसेच यानिमित्ताने 'बाटुक' या पुस्तकाचे प्रकाशनही वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांच्या हस्ते केले. सदर कार्यक्रम मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कार्यरत असलेल्या युवा विधिज्ञ ॲड.निकिता गोरे यांनी आयोजित केला होता. वृद्धाश्रमात व्याख्यान देण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याने आता व्याख्यानात विषयाला न्याय देण्यासाठी नेमके काय विचार मांडायला हवेत यासाठी आठवडाभरापासून तयारी सुरू होती.

वृद्धावस्थेत दुःख कवटाळत बसण्यापेक्षा सुखाला शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा, दुःखाच्या पायथ्याशीच सुख लपलेले असते, वृद्धाश्रमात येण्याची प्रत्येकाची कारणे जरी वेगवेगळी असली तरी इथे मिळून राहण्याचा आनंद मात्र सर्वांचा सारखाच असतो. प्रेम बाजारात विकत मिळत नाही ते रक्तात निर्माण व्हावं लागतं आणि त्यासाठी त्या रक्तावर चांगले संस्कार व्हावे लागतात जे संस्कार करण्याचे सामर्थ्य आज्जी आजोबांमध्येच असते. असे अनेक विचार तासभराच्या व्याख्यानात मांडले.

मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी सुमारे साडेतीन एकरवर उभा असलेला हा विस्तीर्ण परिसर आणि त्यात राहणाऱ्या आज्जी आजोबांचे अतिशय सुंदर व्यवस्थापन केले आहे. तिथली स्वच्छता आणि नियोजन एवढे नीटनेटके आहे की ऐन तारुण्यात सुद्धा तिथे राहण्याचा मोह व्हावा. वृद्धाश्रमाबद्दल माहिती घेत असताना पागोरे साहेबांनी जेव्हा वृद्धांना या वृद्धाश्रमात टाकण्याची कारणे सांगितली तेव्हा माणूसपणाची लाज वाटावी एवढी ती भयंकर होती.

प्रकाशन आणि व्याख्यानानंतर काही आज्जी आजोबांनी डोक्यावर हात ठेवून, काहींनी पाठीवर हात फिरवून तर काहींनी हातात हात घेऊन ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून नकळत डोळ्यात पाणी तरळले. माझी आजवर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांच्या पंचवीस प्रती वृद्धाश्रमातील लायब्ररीला सुपूर्द करून निकिताने सर्वांना अल्पोपहार दिला. शब्द शिंपडून प्रचंड माया, प्रेम, ममता आणि जिव्हाळा वाटून सुंदर आठवणींचे क्षण हृदयात साठवून आम्ही आज्जी आजोबांचा निरोप घेतला.

याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक ॲड.ललित जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्यासमवेत, माजी न्यायाधीश शरदचंद्र भारुखा, पुष्पा अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ॲड.निकिता गोरे, नीता वाघ, भाग्यश्री गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी अमोल मिसाळ, वेणूगोपाल आगळे आणि नेहमीप्रमाणे आमच्या हनुमंताची मला विशेष साथ लाभली.

विशाल गरड
दिनांक : १५ ऑगस्ट २०२१

Wednesday, August 11, 2021

थम्सडाऊन

भारताला टोकियो ऑलम्पिक मध्ये सिल्व्हर मेडल मिळवून दिलेला कुस्तीपटू राविकुमार दहियाचा फोटो थम्सअपच्या कॅनवर पाहून वाईट वाटले. या कंपन्या तांबडं विष पाजण्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरतील सांगता येत नाही. भारतीयांच्या मानसिकतेचा फायदा कसा घ्यायचा हे यांच्याकडून शिकावं. प्रकाशझोतात असलेल्या अभियेनेत्यांना किंवा खेळाडूंना करोडो रुपये मानधन दिले की हे जाहिरात करायला मोकळे. यांच्या जाहिरातींचा युवा पिढीच्या मनावर किती भयानक परिणाम होतो याचे कुणालाच काही पडलेलं नाही.

सलमान खान असो किंवा राविकुमार त्यांनी त्यांची बॉडी दूध पिऊन तयार केली हे सत्य तेही सार्वजनिकपणे मान्य करतील. त्यांनी एखादया प्रोडक्टची जाहिरात करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे पण केवळ ती जाहिरात पाहून जर आपण दुधाऐवजी कोक पीत असू किंवा आपल्या लेकरांना पाजत असू तर आपली लेकरं सिनेमात किंवा मैदानात नाही तर दवाखान्यात दिसतील. जगात सर्वाधिक मधुमेह आणि कॅन्सरचे रुग्ण असलेल्या देशात या गोड विष्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतात हे भयानक आहे.

जागतिकीकरणाच्या दुनियेत या व अशा अनेक कंपन्या खोट्या जाहिराती करून आपल्याला अमिष दाखवण्याचा प्रयत्न करत राहतील. पैसे कमावण्याच्या अमिषापोटी त्या कंपन्यांना आपल्या आरोग्याशी काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे सायन्सच्या युगात आपणच शहाणे होऊन कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातींना फाट्यावर हाणून आपल्या युवा पिढीला फ्रुट ज्युस, दूध, नारळपाणी प्यायला प्रोत्साहित करायला हवे. बाकी डोळ्यातून डोक्यात कोल्ड्रिंक्स उतरवण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे पण तुम्ही दुधावर ठाम राहा.

विशाल गरड
दिनांक : ११ ऑगस्ट २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...