Thursday, August 19, 2021

मातोश्री वृद्धाश्रमात व्याख्यान

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मातोश्री वृद्धाश्रमात "वृद्धपकाळातील आनंदाचा शोध" या विषयावर माझे व्याख्यान संपन्न झाले तसेच यानिमित्ताने 'बाटुक' या पुस्तकाचे प्रकाशनही वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांच्या हस्ते केले. सदर कार्यक्रम मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कार्यरत असलेल्या युवा विधिज्ञ ॲड.निकिता गोरे यांनी आयोजित केला होता. वृद्धाश्रमात व्याख्यान देण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याने आता व्याख्यानात विषयाला न्याय देण्यासाठी नेमके काय विचार मांडायला हवेत यासाठी आठवडाभरापासून तयारी सुरू होती.

वृद्धावस्थेत दुःख कवटाळत बसण्यापेक्षा सुखाला शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा, दुःखाच्या पायथ्याशीच सुख लपलेले असते, वृद्धाश्रमात येण्याची प्रत्येकाची कारणे जरी वेगवेगळी असली तरी इथे मिळून राहण्याचा आनंद मात्र सर्वांचा सारखाच असतो. प्रेम बाजारात विकत मिळत नाही ते रक्तात निर्माण व्हावं लागतं आणि त्यासाठी त्या रक्तावर चांगले संस्कार व्हावे लागतात जे संस्कार करण्याचे सामर्थ्य आज्जी आजोबांमध्येच असते. असे अनेक विचार तासभराच्या व्याख्यानात मांडले.

मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी सुमारे साडेतीन एकरवर उभा असलेला हा विस्तीर्ण परिसर आणि त्यात राहणाऱ्या आज्जी आजोबांचे अतिशय सुंदर व्यवस्थापन केले आहे. तिथली स्वच्छता आणि नियोजन एवढे नीटनेटके आहे की ऐन तारुण्यात सुद्धा तिथे राहण्याचा मोह व्हावा. वृद्धाश्रमाबद्दल माहिती घेत असताना पागोरे साहेबांनी जेव्हा वृद्धांना या वृद्धाश्रमात टाकण्याची कारणे सांगितली तेव्हा माणूसपणाची लाज वाटावी एवढी ती भयंकर होती.

प्रकाशन आणि व्याख्यानानंतर काही आज्जी आजोबांनी डोक्यावर हात ठेवून, काहींनी पाठीवर हात फिरवून तर काहींनी हातात हात घेऊन ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून नकळत डोळ्यात पाणी तरळले. माझी आजवर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांच्या पंचवीस प्रती वृद्धाश्रमातील लायब्ररीला सुपूर्द करून निकिताने सर्वांना अल्पोपहार दिला. शब्द शिंपडून प्रचंड माया, प्रेम, ममता आणि जिव्हाळा वाटून सुंदर आठवणींचे क्षण हृदयात साठवून आम्ही आज्जी आजोबांचा निरोप घेतला.

याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक ॲड.ललित जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्यासमवेत, माजी न्यायाधीश शरदचंद्र भारुखा, पुष्पा अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ॲड.निकिता गोरे, नीता वाघ, भाग्यश्री गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी अमोल मिसाळ, वेणूगोपाल आगळे आणि नेहमीप्रमाणे आमच्या हनुमंताची मला विशेष साथ लाभली.

विशाल गरड
दिनांक : १५ ऑगस्ट २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...