Saturday, October 30, 2021

यष्टी डायवर

समोरून येणारी प्रत्येक गाडी यमदेवासारखी असते. प्रत्येक ओव्हरटेकला मृत्यूला घासून जाताना गाडीतील पन्नासहून अधिक लोकांचा जीव शाबूत ठेवण्यासाठी त्याचे हात, पाय आणि डोळे सदैव दक्ष असतात. तो उपाशी असेल, वैतागलेला असेल, त्याचे अंग दुखत असेल तरी त्याला थकायला परवानगी नाही. सध्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न बघता सगळ्यांना इच्छित स्थळी वेळेवर सुखरूप पोहोचवणाऱ्यावरच अशी वाईट वेळ येणे दुर्दैवी वाटते. माझ्या आजवरच्या एसटी प्रवासात ज्या ज्या एसटी ड्रायव्हर साहेबांनी सारथ्य केले त्या तमाम बांधवांसाठी हा माझा लेख समर्पित.

आर.टी.ओ चे नियम सगळ्या वाहनांना सारखेच पण यातून एसटीकडे मात्र ठरवून डोळेझाक करायची. पन्नास पंचावन्न क्षमतेच्या कधी दुप्पट तर यात्रा वगैरे असल्या की तिप्पट क्षमतेने भरलेली बस त्या ड्रायव्हरने गपगुमान चालवायची. गुडघ्या इतक्या खड्ड्यातून हादरे, झटके, धक्के या कशाचाही विचार न करता गाडी वेळेत पोहोचवायची, रातराणीच्या ड्रायव्हरने रात्रभर जागून गाडी चालवायची आणि आरामासाठी आगाराच्या एखाद्या अस्वच्छ खोलीत चटई टाकून झोपायचे, गाडी वेळेच्या आत आली किंवा उशीर झाला तर त्याला मेमो मिळणार पण जर त्याने गाडीच्या दुरुस्तीबद्दल, सर्व्हिसिंग बद्दल काही सांगितले की मग महामंडळ तोट्यात असल्याची कारणे द्यायची.

आयुष्यभर गाडी चालवणारा एसटी ड्रायव्हर त्याच्या आयुष्यात मात्र तो एक चार चाकी गाडी घेऊ शकत नाही, दोन मजली माडी बांधू शकत नाही, लेकरांच्या उच्च शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाही, बायकोला चार सोन्याचे दागिने घेऊ शकत नाही, प्लॉट आणि फ्लॅट तर खूप दूरची गोष्ट आहे साहेब, तो आहे ती घरची शेती सुद्धा करू शकत नाही. त्याला मिळत असलेल्या पगारीतून तो फक्त कुटुंबाला दोन वेळचे जेवण देऊ शकतो तेही कधी कधी स्वतः उपाशी राहून. मग त्या एसटी ड्रायव्हरची ही स्वप्न नसतील का ? असतील पण मग तुमच्या स्वप्नांचा प्रवास कोण पूर्ण करणार ? म्हणून मग हेच एसटी ड्रायव्हर त्यांची स्वप्न बाजूला ठेवून तुटपुंज्या पगारावर अहोरात्र ड्रायव्हिंग करतात.

तुमचे विकासकामांचे प्रोजेक्ट्स, फ्लाय ओव्हर, मोनो रेल, बुलेट ट्रेन, स्मारके यांच्या टेंडरचे आकडे सामान्य माणसाला मोजता न येण्याएवढे बलाढ्य असतात आणि त्यात झालेल्या भ्रष्ट्राचाराचे व टक्केवारीचेही तेवढेच मोठे असतात. निर्जीव इमारती बांधण्यासाठी जर तुम्ही अब्जावधी खर्च करू शकता तर एसटी ड्रायव्हर सारख्या जिवंत माणसांच्या संसारासाठी तुम्ही काही कोटी बाजूला काढून ठेवू शकत नाहीत का ? मान्य आहे तिजोरीत खडखडाट वगैरे असतो मग आमदार खासदारांच्या, सनदी अधिकाऱ्यांच्या पगारी का बरे थांबत नसतील ? शेवटी सगळ्यांना पगार जनतेच्याच पैशातला मग तो वाटताना मात्र दुजाभाव का ?

एसटीमध्ये विधिमंडळ सदस्यांसाठी राखीव जागा असते. हुकून चुकून कधीतरी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या फॉरचुनर मधून उतरून एसटीने प्रवास करायला हवा तेव्हाच एसटी कर्मचाऱ्यांचे हाल अनुभवता येतील आणि तेच अनुभव विधिमंडळात मांडता येतील. शासकीय नोकऱ्या पैसे खायचं कुरण असतात (काहीजणांसाठी) पण सगळ्याच शासकीय नोकऱ्यात पगारी व्यतिरिक्त पैसे मिळतात असे नाही. जेवढ्या पगारात एसटी ड्रायव्हर काम करतात ते पाहून ते नोकरी नाही तर देशासाठी निशुल्क सेवाच बजावतात असे म्हणावे लागेल.

मायबाप सरकार,
दहा वर्षे सुरक्षित सेवा, पंधरा वर्षे सुरक्षित सेवा असले फक्त बिल्ले वाटल्याने त्यांचे पोट भरणार नाही त्यांच्या कामाच्या तुलनेत त्याचा मोबदलाही मिळायलाच हवा. अन्यथा एसटीला फाशी घेऊन लटकलेले मृतदेह एकसष्ठ वय असलेल्या महाराष्ट्राला परवडणारे नाहीत. त्यांचा विचार व्हावा एवढीच अपेक्षा.

विशाल गरड
३० ऑक्टोबर २०२१

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...