Monday, December 20, 2021

बंगळूर येथील घटनेचा निषेध

महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना होणे दुर्दैवी. मुळात विटंबना करणाऱ्याला त्या महापुरुषांचे समकालीन कार्य आणि इतिहास माहीतच नसतो. अशा घटना वेगळ्याच हेतूने घडवल्या जात असतात. अटक होणे, गुन्हे दाखल करणे आणि मग वातावरण शांत झाले की त्याला जामिनावर सोडून देणे, कालांतराने आपणही विसरून जाणे असाच काहीसा पायंडा आजवर चालत आलाय. ज्यांच्यापर्यंत शिवरायांचा पराक्रमी इतिहास पोहोचतो ते आजन्म महाराजांचे मावळे म्हणून जगतात पण ज्यांच्यापर्यंत ते केवळ एका राज्याची, जातीची, धर्माची किंवा समूहाची अस्मिता म्हणून पोहोचतात त्यांच्यासाठी ते फक्त राजकारणाचा एक विषय म्हणून राहतात. 

मी कर्नाटकात अनेकवेळा व्याख्यानासाठी गेलो महाराजांबद्दल तिथल्या लोकांमध्ये प्रेम आहे विशेषतः सीमावर्ती भागात तर ते ओसंडून वाहत आहे. अगदी प्रत्येक गावातल्या चौकात छोटे का असेना पण शिवरायांचे स्मारक असतेच. कोण्या एका नालायकाने विटंबनेचे कृत्य केले म्हणून समस्त कर्नाटकी शिवभक्तांनाच दोषी धरणे मला संयुक्तिक वाटत नाही. आजवर महाराष्ट्रातही विटंबनेच्या अनेक घटना घडल्या त्या आरोपींना काय शिक्षा झाली ? तो छिंदम अजूनही उथळ माथ्याने फिरतोच आहे की समाजात. जिथे बलात्कार आणि मर्डरच्या गुन्ह्यात फाशी लागलेले आरोपी अजून जिवंत आहेत तिथे विटंबना करणाऱ्या आरोपींना शिक्षेची अपेक्षा काय ठेवावी.

"पुतळा विटंबना ही छोटीशी गोष्ट आहे" कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदारपणे केलेल्या या स्टेटमेंटवरून हे लक्षात येते की ज्या महापुरुषाचे उदोउदो केल्यावर त्यांना मते मिळतात त्यांचीच जर विटंबना झाली तर ती त्यांच्यादृष्टीने मोठी गोष्ट असावी बाकी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचेच काय आपलेही काही पुढारी सोयीनुसार जयजयकार आणि निषेध करतात त्यामागेही तेच कारण असते. हे भारत मातेच्या महापुरुषांनो, तुम्ही ज्या मातीच्या रक्षणासाठी तुमचं रक्त सांडलं, संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, सर्वस्व अर्पण केलं त्याच मातीतल्या काही औलादींना मात्र तुमचं देणं घेणं फक्त तुमच्या अनुयायांना खुश ठेवण्यापूरतं आणि त्याचे रूपांतर मतदानात करण्यापर्यंतच उरलंय हे दुर्दैव.

विशाल गरड
२० डिसेंबर २०२१



Friday, December 3, 2021

राष्ट्रनमन

राष्ट्रपती नतमस्तक होणे म्हणजे संपूर्ण देश नतमस्तक होणे. आजघडीला महाराज असते तर काळाची गरज ओळखून त्यांनी नक्कीच रायगडावर हेलिपॅड तयार केले असते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा आपला राजा होता आपण त्यांचे अनुयायी म्हणल्यावर आपणही त्या गोष्टींचा अवलंब करायला हवा. हेलिकॉप्टर उतरताना धूळ उडेल आणि ती पुतळ्यावर जाईल हे आपण लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासन त्याची काळजी करेलच पण म्हणून गडावर हेलिकॉप्टरच नको असे म्हणणे काळानुरूप संयुक्तिक ठरणार नाही. उद्या जगातील प्रत्येक देशाचा प्रमुख जरी रायगडावर यायचा म्हणला तरी गडावर तशी सोय असायला हवी. आपल्या राजाचे कार्य आणि महती साडेतीनशे वर्षांपासून सर्वदूर आहे पण ती अशानिमित्ताने पुन्हा पुन्हा अधोरेखित होत असते. आपल्याच राज्यातले किती राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्री आजवर गडावर दर्शनाला गेले असतील ? मग राष्ट्रपती येत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. दुर्गराज रायगड हा देशा सोबत जगाच्या पटलावर पुन्हा पुन्हा चर्चेत यावा ज्यातून महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची पुन्हा पुन्हा उजळणी व्हावी यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.

विशाल गरड
३ डिसेंबर २०२१

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...