Monday, March 28, 2022

सायकल मार्ट

उन्हाळ्याचं दिवस व्हतं. आम्ही दवाखान्यातल्या वडाखाली खेळत व्हताव. एवढ्यात धनगरवाडीचं सुरेश मामा आमच्या घराकडं जाताना दिसलं म्हणून म्या लगीच घराकडं धुम ठुकली. चहा पाणी करून मामा घरा बाहीर पडताच त्येज्या म्हागं मीबी बाहीर आलो, लंय वाडुळ म्हागं फिरल्यावर गावाकडं जाताना सुरेश मामानं माज्या हातावर एक रुपायाचा मोठ्ठा ठोकळा टिकीवला. रुपाया हातात पडताच म्या पळतच अंबिका सायकल मार्टकडं निघालो. तिकडं जाता जाताच वडाखाली खेळत बसल्याल्या राहुल्या, सच्या, ईनुद्या, म्हाद्या, शऱ्या ह्येन्ला वरडून सांगितलं की "म्या बारकी सायकल भाड्यानं आणायला चाललोय" तीबी मग वाट बघत बसली.

तिकडं सायकलच्या दुकानात बाळासाहेब हातात रजिस्टर घिऊन बसलं व्हतं. तिथं जाऊस्तोर कुणी दुसऱ्यानं सायकल न्हिऊनी म्हणून पळतच दुकान गाठलं. लांबूनच बारकी सायकल बघून मला जाम आनंद झाला. ल्हाकत ल्हाकत पहिलं सायकल हातात घितली. बाळासाहेबांनी लगीच रजिस्टर उघडलं आन् घड्याळाकडं बघत रजिस्टरमदी विशाल गरड १२:१० लिहिलं. म्या बी घड्याळाकडं नजर टाकली आन् लगीच सायकलचा पायेंडेल मारलान दुसऱ्याच मिनटात वडाखाली पोचलो. तिथं गेल्या गेल्या पोरं सायकलची चक्कर मागायली पण म्या तेन्ला म्हणलं "थांबाय लका, मला तरी खिळू दया आधी" पोरांना तिथंच सुडून म्या तालमीपसून थेट दऱ्याबुवा पर्यंत जाऊन आलो. तिकडून आलो की दिवीच्या चौकातून एक चक्कर आणली मग गोडसे गल्लीतुन ईशीत आन् ईशीतुन पुन्हा वडाखाली आलो. आल्यावर राहुल्या मला म्हणला "ईसल्या, चल निळोबाला जाऊन यिऊ" पण लंय येळ लागलं म्हणून मी त्येला नकु म्हणलो.

दवाखान्यातल्या वडाखालीच राहुल्या, ईनुद्या आन् सच्याला सायकलची एक एक चक्कर दिली. लंय येळ झाल्यासारखं वाटलं त्येज्यामुळं पुन्हा अंबिका सायकल मार्ट मधल्या घड्याळात येळ बघायला गेलो. तास संपून जाईल हेज्या भेनं भेनं दून तीन चक्रा तर दुकानाकडंच झाल्या. आखीर बाळासाहेब म्हणलं "आजून पाच मिनिटं राहिल्यात, लांब जाऊ नकु न्हायतर दोन तासाचं पैशे द्यावं लागत्याल" हे ऐकून म्या शेवटची चक्कर मारायची म्हणून पुन्हा तालमीपशी जाऊन आलो. सायकल जमा करताना बाळासाहेबानं दुनी टायरची हवा हातानं दाबून चेक किली. म्या खिशातला ईकुलता येक रूपाया बाळासाहेबाच्या हातावर टिकीवला आन् त्येंनीबी पटमन रजिस्टरमदी माज्या नावापुढं १:१० लिहून जमेचा शेरा मारला. 

एक रूपायात एक तास सायकल खिळून माझं मन भरलं नव्हतं. आता पुन्हा कवातरी दोन रुपये साचलं की दोन तास सायकल खेळायची आसं ठरवून झपझप पावलं टाकून म्या घर गाठलं. दसऱ्याला आणि पाडव्याला अंबिका सायकल मार्टमदी येणाऱ्या नवीन सायकली बघून लंय भारी वाटायचं. पुढं निळूभाऊनं श्री गणेश सायकल मार्ट टाकलं आन् त्येज्या दुकानातल्या बारक्या सायकली फुकट चक्कर मारायला मिळायल्या. भऊच्या बँकीजवळच्या टपरीवर तास दोन तास बसलं की थर्माकॉलच्या डबड्यातली एक स्नेहल पेप्सी आन् सायकलची चक्कर हमखास मिळायची. गावात कुणी नवीन सायकल मार्टचं दुकान टाकलं की आमाला लंय अप्रूप वाटायचं. 

माझ्या बारक्यापणी रूपाया दोन रूपायात आभाळाएवढा आनंद दिल्याली आमच्या पांगरीतली अंबिका सायकल मार्ट, श्री गणेश सायकल मार्ट, दिपक सायकल मार्ट, जय भवानी सायकल मार्ट, वसीम सायकल मार्ट, मुन्ना सायकल मार्ट ही समदी दुकानं आज फकस्त आठवण म्हणून राहिल्याती. आज मी माझ्या दारात उभा आसलेल्या फोर्डमदी बसून शंभर किलोमीटर जरी फिरून आलो तरी एक रूपाया तासानं सायकल घिऊन मारलेल्या चक्करांची सर त्याला येणार न्हाई. हल्ली समद्या लेकरांच्या वाढदिसालाच त्येंचे मायबाप भारी भारी सायकली आणत्यात त्येज्यामुळं म्या वरी ल्हिवलेला ह्यो अनुभव आता तेंच्या वाट्याला कधीच येणार न्हाय पण त्येंला आपल्या येळच्या आनंदाची कथाबी ठाऊक आसावी म्हणून ही ईस पंचवीस वर्षाम्हागटल्या डोसक्यातलं शबुद मोबाईलवर टायपिलं. लेख आवडला तर द्या लेकरासनी वाचायला. गावरान भाषेत ल्हिवल्यामुळं तेंन्ला थोडा आवघड जाईन वाचायला पण काय करणार आईची भाषाबी जित्ती ठिवावीच लागल की म्हणुनशान ह्यो आट्टास.

विशाल गरड
२८ मार्च २०२२

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...