Friday, August 19, 2022

लग्नाचा चौथा वाढदिवस

आज आमच्या संसाराला चार वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला मी काहितरी लिहीत आलोय. त्या त्या काळात आलेले समकालीन अनुभव लिखाणात उतरवत आलोय. पहिल्या वर्षी बाल्यावस्थेत असणारा माझा आणि विराचा संसार आता साऊ जन्माला आल्यापासून तारुण्याकडे वाटचाल करत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या संसाररूपी झाडाला लागलेल्या कादंबरी नावाच्या फळाने आम्हाला तृप्त केलंय. तिच्यासोबतचा व्यतीत होणारा प्रत्येक क्षण म्हणजे जणू भविष्यात आठवण काढून आनंद मिळवण्याची मोठी एफ.डी आहे.

साऊ जन्माला यायच्या आधी मी नवरा बायकोच्या प्रेमाबद्दल लिहायचो पण आता संसाराला चार वर्षे पूर्ण झाल्याने त्याचे नवनवीन पदर उलगडायला सुरुवात झाली आहे. लग्नानंतरचे पहिले वर्ष एकमेकांना समजून घेण्यात जातं, दुसरं वर्ष एकमेकांच्या आवडी निवडी, सवयी बऱ्यापैकी जाणून घेण्यात जातं, तिसऱ्या वर्षी न आवडणाऱ्या सवयींना बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि चौथ्या वर्षी मग जे आहे, जसे आहे तसेच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होते. मुळात दोन जीव हे भिन्न शरीराचे, मनाचे, विचारांचे परंतु संसार नावाच्या प्रक्रियेत ते घट्ट बांधले जातात. या प्रक्रियेत तयार होणारे प्रेम, राग, मत्सर, जिव्हाळा, संशय, लोभ, आदर, भीती, अपेक्षा, इभ्रत या सगळ्याच गोष्टीनी संसार उभा राहतो. या गोष्टी जशा संसार जोडायला कारणीभूत ठरतात तशाच त्या तोडायलाही कारणीभूत ठरतात. यातल्या प्रत्येक गोष्टीचे एक प्रमाण असावे लागते जर ते विसंगत झाले तर मग सांसारतले सार निघून जायला वेळ लागत नाही.

मुळात संसारातल्या नवरा बायको या व्यक्ती एक दोन वर्षात समजून घेण्याचा विषय नसून त्या आयुष्यभर शिकत राहण्याचा विषय असतो. ते दोघे एकमेकांसोबत कसे वागतात यासोबतच ती सून म्हणून आपल्या आई वडिलांशी कशी वागते आणि आपण जावई म्हणून तिच्या आई वडिलांशी कसे वागतो यावर संसाराची वीण अवलंबून असते. छोटे मोठे वाद झाले तरी दोघांनी सामोपचाराने घेतले की संसाराची वीण अधिक घट्ट विणली जाते. कधी कधी ती उसवतेही पण अशावेळी आपण प्रेमाच्या सुईत शांततेचा धागा ओवून ते शिवत राहायचं. जर असे न करता जर उगाच ताणत राहिलात तर फाटण्याची भीती वाढते. एकूणच काय तर संसार हे मुरायला घातलेले लोणचे असते ते जेवढे मुरेल तेवढेच रुचकर होईल.

संसाराच्या चार वर्षांनंतर मला माझी विरा जणू संसाररुपी रणांगणातली वीरांगना भासते. ती जेव्हा साऊला शिकवत असते तेव्हा मला तिच्यात सावित्रीमाई दिसते, ती दान धर्म करताना तिच्यात अहिल्यामाई दिसते, साऊवर संस्कार करताना तिच्यात जिजामाई दिसते, मी बाहेरगावी गेलो तरी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिच्यात रमाई दिसते आणि कधी रौद्र रूप धारण केले की लेकराला पाठीवर घेऊन लढणारी झाशीची राणीही दिसते. आपल्या समाजाला प्रचंड उंचावर घेऊन गेलेल्या या महान स्त्रियांचे विचार जर घरातल्या हरएक स्त्रीने संसारात झिरपवले तर प्रत्येक संसार सुखाचा आणि लेकरांची भविष्य घडवणारा ठरेल यात शंका नाही. मी आज समाजात बहू आघाड्यांवर काम करू शकतो यामागे माझे एकत्रित कुटुंब आणि संसाराची आघाडी समर्थपणे सांभाळणारी विरा आहे. 

विशाल गरड
१९ ऑगस्ट २०२२, पांगरी

No comments:

Post a Comment

भेटला विठ्ठल

कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच....