आज कॉलेजला जाताना स्टँडवर गॅरगॅरवाले बापू भेटले आणि लहानपणीच्या आठवणी हृदयातून वाहु लागल्या. जेव्हा पाच पैशांना गोळाहोता आणि पाच रुपयाला बर्फाची लादी तेव्हापासून बापू गल्लोगल्ली फिरुन गॅरीगॅर विकतात. रोज दुपारच्यावेळी आमच्या श्रीराम पेठेतील हनुमान मंदीराजवळच्या भिंतीला सायकल टेकवून `ए गॅरीऽऽगॅरऽऽ….’ अशा आरोळी सोबत पॉम पॉम आवाज आला की चारआणे, आठ आणे घेवून आम्ही बापूकडे धुम ठोकायचो.
बर्फ खिसताना त्याचे चार दोन कण चेहऱ्यावर पडले की गोळा खायची उत्कंठा जास्तच वाढायची. कधीतरी घरी कोणी पाहुणा आलाआणि त्याने जाताना हातात मोठा रुपया दिला की आम्ही सकाळपासूनच बापूची वाट बघत हनुमानाच्या देवळात बसायचो. कधी पैसेनसले की मग ग्लासात ज्वारी भरुन न्यायचो आणि बापू त्याच ग्लासात गोळा खिसून द्यायचे. बापूनीं हातात लाल गोळा दिला कीओठांची चुंबळ करुन मस्त मोठ मोठ्या फर्रक्या मारत एका हातावरून दुसऱ्या हातावर घेत घेत आम्ही त्यांच्या सायकलभोवतीघुटमळायचो कारण गोळा पांढरा पडला की बापूजवळ जावून उग तोंड बारीक करुन उभारलं की ते लगेच कलरची बाटली हातात घेवूनचार पाच चिळकांड्या गोळ्यावर शिपडायचे. हे जास्तीचे मिळालेले साखर आणि रंगाचे मिश्रण बोनस मिळाल्याचा आनंद देवून जायचे.
बापूंनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हाच्याकारात कसलीही तक्रार न करता ते आजहीबर्फाचे गोळे विकतात. “बापू , उन्हात जास्त फिरू नका” असे त्यांना काळजीने म्हणले की ते म्हणतात “आरं, जेवढं ऊन तापल तेवढाधंदा वाढतोय”. हल्लीच्या आइस्क्रीम पार्लर, डिप फ्रिजर आणि कॉर्न्याटोच्या जमान्यात ते बर्फाच्या गोळ्याचा इतिहास जीवंत ठेवूनआहेत. बापू तुम्हाला सलाम.
विशाल गरड
१९ एप्रिल २०२३, पांगरी