जोपर्यंत आपल्या पोटी मुलगी जन्म घेत नाही तोपर्यंत मुली बद्दलच्या आपल्या संकल्पना वेगळ्या असतात. जेव्हा ती आपलं लेकरूम्हणून घरात येते आणि तारुण्याला बापपण देते तेव्हा तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण स्वर्गीय अनुभव देवून जातो. आज आमची कादंबरीउर्फ साऊ तीन वर्षाची झाली. कॉलेजवरून घरी गेलो की गाडीचा आवाज ऐकताच साऊ दारात येवून उभारते आणि मी घरात पाऊलठेवताच पळत येवून घट्ट मिठी मारते हा क्षण कधी संपुच नये असे वाटते. साऊ आता अस्सखलित बोलते त्यामुळे तिच्या का ? ला उत्तरेदेता देता माझी आणि विराची दमछाक होते.
लेकरं ही आई बापाचे अपडेटेड व्हर्जन असतात याची खात्री पटली आहे. बालहट्ट काय असतो याचीही अनुभूती आली आहे. गावाजवळनोकरी असल्याने आई बाबांसोबतच सध्या साऊ आज्जी, आजोबा, काका, मामा, मामी, आत्या, आत्याआज्जी यांच्या संस्कारात मोठीहोत असल्याचे समाधान आहे. माणसांनी भरलेलं घर असल्याने तिचा शब्दसंग्रह अतिप्रचंड झालाय. या माझ्या शरीररूपी कादंबरीवरलिहीत बसलो तर एक पुस्तकरूपी कादंबरी तयार होईल इतक्या साऱ्या आठवणी तिने मनाच्या पटलावर रुतवून ठेवल्यात.
कोणत्याही शर्यतीची सुरुवात एक, दोन, तीन म्हणून होते. माझ्या साऊचाही आता तिसरा वाढदिवस झाल्याने तिची शैक्षणिक स्पर्धासुरु झाली आहे. फक्त वर्गात पहिला नंबर म्हणजेच हुशार या संकल्पनेपासून तिला दूर ठेवायचा माझा प्रयत्न असेल. फक्त नोकरीआणि चांगलं स्थळ मिळावं या असल्या क्षुल्लक उद्देशाने मी तिला शिक्षण देणार नाही तर प्रचंड स्पर्धेच्या जगातही ती कर्तृत्वाने उठूनदिसेल असे शिक्षण देईल. प्रिय साऊ, तुला तिसऱ्या वाढदिवसाच्या बापाकडून हार्दिक शुभेच्छा ! लव्ह यू पिल्ला.
विशाल गरड
०५ एप्रिल २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment