Saturday, August 8, 2020

एम्पीयस्सी MPSC

जानेवारी २००९ साली फॉर्म भरला होता. त्याचे हे ब्राउचर मी जपून ठेवले होते आज अचानक ते या स्वरूपात दिसले. कधीकाळी पाहिलेले स्वप्न आज या अवस्थेत दिसल्यावर वाईट वगैरे अजिबात नाही वाटले, खंत तर नाहीच नाही. कारण हे माझे सर्वस्व नाही जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हुकून चुकून जर या स्वप्नात यशस्वी झालो असतो तर कदाचित आज विशाल गरड या नावाला जग ज्या गोष्टींसाठी ओळखते ती गोष्ट घडवू शकलो नसतो. बाकी आईने यावर मिरच्या का ठेवल्या हे माहीत नाही मीही तिला विचारले नाही पण एम्पीयस्सी वाले मात्र याचे खूप भारी अर्थ काढू शकतील.

एम्पीयस्सी हे स्वप्न आहे असायलाही हवे त्यासाठी जीवतोड जिजान मेहनत पण करायला हवी मी सुद्धा काहीकाळ केली पण हे सगळे करत असताना प्रारब्धाने आपल्यासाठी काय नियोजन करून ठेवलंय याकडेही लक्ष असायला हवे. कोणती गोष्ट का करावी यापेक्षा ती कुठपर्यंत करावी हे ज्याला समजते तो आयुष्यात कशात ना कशात नक्कीच यशस्वी होतो. एम्पीयस्सीचा नाद अवश्य करा पण तो नाद कुठं थांबवायचा हेही निश्चित करा. एखादे स्वप्न थांबवणे लगेच दुसरे पाहणे आणि ते पूर्ण करणे हे सुद्धा जमायला पाहिजे कारण स्वप्न तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाहू शकतो पण ती पूर्ण करण्याची वेळ मात्र सर्वांना सारखीच असते.

वयाच्या २१ ते ३० वर्षाचा वेळ आपण कुठे, कशासाठी आणि कसा घालवतो यावरच आपला भविष्यकाळ ठरत असतो. 'पेशन्स' नावाच्या शब्दाला सुद्धा व्हॅलीडीटी असायलाच पाहिजे नाहीतर हा तारुण्याचा सुवर्ण काळ फक्त एक नोकरी मिळवायची म्हणून खितपत पडेल. तेव्हा या चक्रव्यूहात जाताना परतीचा मार्ग सुद्धा तयार ठेवा. दोस्तांनो जगात आणखीनही लै काय करण्यासारखे आहे. या एम्पीयस्सी नामक चक्रव्यूहात घुसून पुन्हा सहीसलामत माघारी येऊन दुसरा एखादा चक्रव्यूव्ह भेदून तिथे झेंडा फडकवणारा सुद्धा एक अभिमन्यू असतोच.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ ऑगस्ट २०२०

Thursday, August 6, 2020

तुंबलेल्या गटारी

मुंबईच्या गटारातून पाणी कमी कचरा आणि प्लॅस्टिक जास्त वाहत आहे. त्यातला कचरा काढणारे किती आणि त्यात कचरा टाकणारे किती आहेत याचा विचार केला की उत्तर मिळते. मुंबईत माती शोधून सापडत नाही मग या गटारी गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग आणि इतर तत्सम टाकाऊ पदार्थांनीच तुंबतात. ही घाण करणारे आपणच आहोत आणि अशी परिस्थिती झाल्यावर शिव्या घालणारेही आपणच आहोत. पाणी तुंबण्याची इतरही अनेक कारणे आहेत हे मला माहित आहे पण त्यापैकी गटारी तुंबने हे ही एक महत्वाचे आहेच.

कोण म्हणतंय गटार घाण असते उलट आपली घाण वाहून नेणाऱ्या त्या स्वच्छतेच्या दूत असतात. घाण तर माणूस आहे पण बिचाऱ्या गटारी बदनाम होतात. शहरात जेवढी महत्वाची तुमची घरे आणि दुकाने आहेत तेवढ्याच महत्वाच्या गटारी आहेत. हिवाळा आणि उन्हाळा त्यात कोंबत राहायचं आणि पावसाळ्यात मग बोंबलत राहायचं हे चालायचंच. खरंतर प्लॅस्टिक बॉटल मधले पाणी पिल्यावर जेव्हा आपण ती बाटली बेदरकार पणे रस्त्यावर फेकून देत असतो तेव्हाच मुंबईची तुंबई करण्यास हातभार लागलेला असतो. या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या एकदिवस माणसाला पाण्यात बुडवून मारतील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०६ ऑगस्ट २०२०

Monday, July 27, 2020

माझी पहिली डॉलर कमाई

मागच्या महिन्यात अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळासाठी मी ऑनलाईन व्याख्यान दिले होते. आज त्यांनी त्या व्याख्यानाचे स्वेच्छा मानधन पाठवले. हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा डॉलर मध्ये मिळालेलं बक्षीस आहे. लहानपणी अमेरिकेची नोट जरी कुणाकडे असली तरी ती बघायची प्रचंड उत्सुकता असायची. मी शाळेत असताना आमच्या एका नातेवाईकांकडून मिळालेली ती नोट मी कुतूहल म्हणून पाकिटाच्या आत जपून ठेवली होती. ती आजही तशीच आहे. फक्त वक्तृत्वाच्या जोरावर कधी डॉलर मिळतील अशी अपेक्षा केली नव्हती. भविष्यात अजून डॉलर कमवेल पण आज मिळालेल्या या पहिल्या डॉलर्सचा आनंद आयुष्यभर स्मरणात राहील. तसेच या डॉलरपेक्षा पांगरी सारख्या खेडेगावात बसून हे डॉलर देणारी माणसे कमवू शकलो याचा अभिमान वाटतोय.

आर्थिक विवंचना कुणाला नसते. या लॉकडाऊनमध्ये मलाही ती भासली. आमचे संस्थाध्यक्ष सोनवणे सर आणि काही मित्रांच्या मदतीमुळे अशा लॉकडाऊनच्या काळातही "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" हे पुस्तक छापू शकलो अन्यथा ही खर्चिक गोष्ट अशक्य होती. आपले काम प्रामाणिक आणि लोकहिताचे असेल तर नियती मदत आपोआप पोहोचवते म्हणतात ते खरे आहे. डॉलर स्वरूपात मिळालेली मानधनाची रक्कम आता मला पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापायला उपयोगी पडेल. भविष्यात जेव्हा माझ्या पुस्तकाच्या सर्व प्रति विकतील तेव्हा त्यातून मिळालेली नफ्याची संपुर्ण रक्कम विविध उपक्रमांतर्गत पुन्हा समाजालाच द्यायची आहे ही मी स्वतःच स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे जी आजवर पाळत आलोय आणि पुढेही पाळली राहील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०

Sunday, July 26, 2020

गोष्ट एका लॉकडाऊनची

शहरातील एका झोपडीवजा घरात राहणारा एक माणूस, घरात खाणारी सात तोंडं त्याच्या स्वतःसह बायको, म्हातारे आई वडील आणि दोन मुली व एक मुलगा. घरात कामावणारा हा एकटाच माणूस. रोज सकाळी एखाद्या भाकरीत मोकळी भाजी बांधून रोजगाराच्या शोधात चौकात उभा राहायचे. मिळेल त्या कामावर रोजंदारी करून दिवसाकाठी ३०० रुपये कमवायचे. मागच्या लॉकडाऊनमध्ये घरात होते ते सगळे संपले. आई वडिलांच्या औषधांच्या खर्चासह रोज किमान ५०० रुपये लागतात त्याला घर चालवायला पण सध्या वजाबाकीत सुरू आहे त्याचा संसार. कसे बसे दिवस काढून तो सोमवारपासून पुन्हा कुठेतरी काम करून तोंडाची आणि पोटाची भेट घालू इच्छित होता. दहा दिवसांच्या लॉक डाऊन आजच संपला होता म्हणून सकाळी लवकर उठून तो डब्बा घेऊन बाहेर पडला. तेवढ्यात शेजारच्या बंगल्यातील एका पोराने सोशल मिडियावर स्थानिक पत्रकारांनी टाकलेला प्रशासनाचा आजचा निर्णय वाचला आणि लगेच एका मित्राला कॉल करून बोलू लागला "काय यार, अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढवला राव" सगळ्या वेबसिरिझ बघून झाल्या, साऊथचे आणि हॉलिवूडचे तीन चार डझन पिक्चर बघून झाले, रोज नवनवीन पदार्थ ट्राय करून पण आता कंटाळा आलाय बाबा, आता नवीन काय बघावे याचे टेन्शन आलंय राव. लंय बोरिंग जाणार यार अजून पाच दिवस" कामाच्या आशेने हातात डबा घेऊन चाललेला तो माणूस त्या पोराचे बोलणे ऐकून तसाच माघारी घरी जातो. लेकरं विचारत होती पप्पा माघारी का आलाव ? मोकळ्या सिलेंडरवर रचलेल्या सरपणातली दोन लाकडं चुलीत घालत बायकोने शेवटचे तांदूळ शिजायला टाकले. म्हातारे वडील पाकिटातली शेवटची गोळी थर थरत्या हाताने बाहेर काढत होते. हातातला डबा खाली ठेवून डेऱ्यातले घोटभर पाणी पिऊन तो उत्तरला "अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढलाय" हे ऐकून पुढचे पाच दहा मिनिटे कुणीच कुणाला बोलले नाही. बायको डब्याकडे, लेकरं चुलीकडे आणि वडील गोळ्याच्या पाकिटाकडे एकटक बघत राहिले. त्या भयाण शांततेत शेजारच्या घरातील टीव्हीचा आवाज येत होता. "लॉकडाऊन मध्ये सेलिब्रिटी त्यांचा वेळ घरी कसा घालवत आहेत ते बघा." खरंतर मला एक सुंदर शॉर्ट फिल्म तयार करता आली असती या गोष्टीवर पण मी काय दाखवतो यापेक्षा हा लेख वाचताना तुमच्या डोळ्यासमोर जे उभा राहते ते मला जास्त महत्वाचे वाटते म्हणून हे लिखाण तुमच्यासोबत शेअर केले.

लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०

Friday, July 24, 2020

पुस्तक प्रकाशनाची संकल्पना

आजपर्यंत माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशन सोहळ्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आलोय. सर्वसामान्यांना प्रकाशनाचा मान देत आलोय, माझ्या मेंदूत शिजलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत आलोय; त्याला हा प्रकाशन सोहळा तरी कसा अपवाद ठरेल. "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय खूपच भन्नाट, प्रेरणादायी आणि तितकाच आल्हाददायी सुद्धा. लॉकडाऊनमुळे इच्छा असतानाही तुम्हाला आमंत्रित करू शकत नाही. हो पण २५ जुलैला सकाळी झालेला हा प्रकाशनाचा सोहळा मी दृकश्राव्य माध्यमात कैद करून त्याचदिवशी संध्याकाळी तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करेल. माझ्या यू ट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर तुम्ही या प्रकाशनाची चित्रफीत अवश्य पाहा. 

#व्हय_मलाबी_लेखक_व्हायचंय
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ जुलै २०२०

Wednesday, July 22, 2020

पाण्याचं सोनं करणारी 'सोनाली'

फोटोतल्या मागच्या ब्याकग्राऊंडवर जाऊ नका माझ्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव कोरणारी महाराष्ट्राची सुकन्या आणि माझी मैत्रीण सोनाली पाटील. ही एक जागतिक दर्जाची 'जलतज्ञ' आहे. तिने जल संवादक म्हणून जलसाक्षरता मोहीम सुरू केली. प्रवास शाश्वत विकासासाठी या प्रकल्पांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. डेन्मार्क येथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल टॅलेंट म्हणुन जगभरातून तिची निवड करण्यात आली. तिला युनायटेड नेशनचे पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी प्रशस्तीपत्रक मिळाले असून आजवर तिने इस्राएल मध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलंय तर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये धरण आणि पाणी पुनर्वापर प्रकल्पावर काम केले आहे. युरोप, नेपाळ, सिंगापूर येथे 'पाणी' या विषयावर  तिचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. ती सध्या पाणी आणि जागतिक हवामान बदल यावर पी.एच.डी करत आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात ती त्यांच्या टेंभुर्णी नजिकच्या शेतात राहतेय हे समजताच अरविंद आणि हनुमंतसह फोर्डमध्ये थेट तिचे शेत गाठले. जाण्याआधी अपॉइंटमेंट मागितली कारण आमची याआधीची भेट होऊन जवळ जवळ पाच वर्षे उलटली होती पण कर्तृत्वाचे उंच शिखर गाठूनही ती मात्र तशीच होती. म्हणाली "अरे ये रे केव्हाही अल्वेस वेलकम" देश विदेशात फिरलेल्या, अनेक पुरस्कार मिळवलेल्या, अशा प्रचंड हुशार मैत्रिणीला आपण केव्हाही भेटू शकतो हा मैत्रीला लाभलेला आपुलकीचा पुरस्कारच असतो. आयुर्वेदावरही तिचा अभ्यास तगडा आहे. तिच्या सोबत आपण जेवढा वेळ घालवू तेवढा वेळ आपणही शाश्वत विचार करायला लागतो हे माझ्या अनुभवातून सांगतो. बाकी आम्ही घरी गेल्यावर सोनूच्या माँ ने केलेल्या आदरातिथ्याने भारावून गेलो.

बऱ्याच वर्षांनी आज तिची भेट झाली. आम्ही बोलताना वारुळातून मुंग्यांची झुंड निघावी तशा नवनवीन कल्पना सोनूच्या मेंदूतून निघत होत्या. अशा व्यक्तिमत्वासोबतच तास दोन तासांची भेट म्हणजे संबंधित विषयातल्या पाच पन्नास पुस्तकांची उजळणी असते. सोनालीचे वडील भारत पाटील हे निवृत्त डि.वाय.एस.पी असून रिटायरमेंट नंतर त्यांनी गावाकडे सेंद्रिय शेतीवर मोठे काम उभारले आहे. सोनाली सुद्धा वडिलांकडून शेतीचे धडे घेता घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन सस्टेनेबल इंडिया या प्रोजेक्टवर काम करत आहे. ती करोडोची मालकीण आहे पण करोडो रुपये देऊनही मिळवता येणार नाही एवढा डाऊन टू अर्थ तिचा स्वभाव आहे. तिचे विचार गावकुसात जन्म घेऊन चंद्रावर जाणाऱ्या मुलीचे प्रतिनिधित्व करतात. भारतातल्या एक टक्के पोरींनी जरी सोनालीला फॉलो केले तरी प्रचंड मोठे कार्य घडू शकते. 

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०

पुस्तकाला आहे यांची प्रस्तावना

प्रस्तावना म्हणजे जणू पुस्तकाचा आरसा, व्यक्तिमत्व विकासावर आधारित पुस्तक लिहिलंय म्हणल्यावर त्याला प्रस्तावना सुद्धा तितक्याच ताकदीच्या व्यक्तिमत्वाची हवी. पुस्तक लिहितानाच एक नाव डोळ्यासमोर होते ते म्हणजे सचिन अतकरे. आजवर सोशल मिडियावर या माझ्या दोस्ताचे थेट काळजातून पाझरलेले लिखाण मी वाचत आलोय. पाणी फौंडेशन, कोल्हापूरचा पूर आणि आता कोरोना कालखंडात त्याने त्याच्या लेखणीतून समाजाला सकारात्मकतेचे सलाईन लावण्याचे काम केले. 

मी हट्ट धरल्यावर तो मला नाही म्हणूच शकत नव्हता याची खात्री होती मला. वुई विल हेल्प च्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदत करण्याच्या आणि त्याच्या ऑफिसच्या व्यस्त कामातून वेळ काढून सचिनने पुस्तकाचा अर्क काढलेली सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. सच्या, याबद्दल तुझे आभार वगैरे काही नाही बरं कारण अजून सोबत राहून खूप काम करायचंय आपल्याला. हम्म बाकी पुस्तकात छापलेल्या तुझ्या शब्दांना मात्र मनापासून धन्यवाद. तुझ्या प्रस्तावनेने 'व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय' या पुस्तकाचे वजन वाढले. या आमच्या सचिनची पुस्तकाच्या पीचवरची अकरापानी खेळी अवश्य वाचा.

#व्हय_मलाबी_लेखक _व्हायचंय
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०


सोनवणे सरांना अखेरचा सलाम.

​ सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...